आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunila Buddhisagar Article About Tradition And Reality

वास्तुशांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सुखदा अपार्टमेंट’ या नूतन इमारतीमधील तीन फ्लॅटधारकांनी एकाच सुमुहूर्तावर आपल्या नवीन वास्तूत गृहप्रवेश केला. अनिकेत अन् अस्मितानं सर्वात वरच्या मजल्यावरच्या आपल्या प्रशस्त अशा 2BHK टेरेस फ्लॅटची वास्तुशांत मोठ्या थाटामाटात केली. संध्याकाळी त्यांच्या टेरेसवर झालेल्या जंगी पार्टीत अनेक ‘बडे’ आमंत्रित आले होते. फ्लॅटचं फर्निचर, इंटेरिअर डेकोरेशन अप्रतिम झालं होतं. अनिकेत-अस्मितेचे भरभरून कौतुक अभिनंदन होत होतं. सारा सोहळा सर्वांनाच मोहवणारा होता.

पुढे एक-दोन दिवसांच्या आवराआवरीनंतर सा-यांचं रूटीन सुरू झालं. समारंभात हसतमुखानं वावरणा-या अनिकेतचा संतापीपणा मूळ पदावर आला. त्यातच मद्यपानाची त्याची आवड हळूहळू सवयीकडे झुकू लागली. त्यामुळे प्रकृतीच्याही तक्रारी सुरू झाल्या. या सा-यामुळे अर्थातच अस्मिताची नाराजी, चिडचिड वाढू लागली. दोघांमधले खटके, वादावादी यामुळे मुलं भेदरून जायची. त्यांना असुरक्षित वाटायचं. ‘वास्तुशांत’ करूनही घरातील एकंदर वातावरण सदैव अशांतच झालं होतं.

पहिल्या मजल्यावरच्या मुकुंदरावांनी फ्लॅटची रक्कम कर्ज काढून उभी केली होती. ती अपुरी पडल्यानं त्यांच्या पत्नी सरलाबाईंनी आपल्या पाटल्या, बांगड्या विकून तूट भागवली होती. आता वास्तुशांतीच्या खर्चाची त्यांना चिंता होती. पारंपरिक संस्कारात वाढलेलं हे जोडपं चाकोरीबाहेरचा विचार करणं शक्यच नव्हतं. त्यांच्या मते घरात काही विघ्नं येऊ नयेत म्हणून वास्तुशांतीची पूजा करणं ही तर अत्यावश्यक बाब होती. सारासार विचार करणा-या त्यांच्या थोरल्या मुलानं सुचवलं की, पूजा करावी, पण फक्त जवळचे १०-१५ लोकच बोलवावेत. सर्व नातलगांना बोलावणं अन् आहेर देणं-घेणं या गोष्टी टाळाव्यात. पण रीत सोडून वागण्याची त्यांची तयारी नव्हती. शेवटी कुठून तरी जास्त व्याजानं दुसरं कर्ज काढून समारंभ पार पाडला. फार थाटात जरी नाही तरी यथासांग अन् रीतसर. परिणाम व्हायचा तोच झाला. कर्जाच्या हप्त्यात ते कुटुंब पार अडकत अडकत गेलं.

मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च, अधूनमधून अद्भवणारी आजारपणं या सा-याला तोंड देता देता मुकुंदराव अन् सरलाबाईंचा जीव मेटाकुटीला आला. थोड्याच वर्षांत मुलीचं लग्नही करावं लागणार होतं. त्यासाठी लागणारा पैसा ते कसा उभा करणार होते, कोणास ठाऊक! मुलगा म्हणत होता तसा थोडक्यात, आवश्यक तेवढा विधीच फक्त केला असता तर बरं झालं असतं, ही गोष्ट आता त्यांना मनातून पटू लागली होती.

तिस-या फ्लॅटमधल्या निहार आणि निरुपमाचे विचार पहिल्यापासून वेगळे होते. नवीन वास्तूत राहायला येण्याच्या दिवशी त्या वास्तूत चौरंगावर गणपतीची मूर्ती त्यांनी ठेवली. कर्दळीचे खुंट, आंब्याची पानं, फुलं यांची आरास केली. रांगोळी काढली, समई लावली अन् स्वत:च्याच मनाने भक्तिभावाने पूजा केली. बस्स! एवढाच विधी. पण कसली गडबड नाही, गोंगाट नाही. शांत अन् मंगलमय वातावरणामुळे पूजा एकाग्रतेनं झाली.
नातलग अन् मित्रमंडळींना नंतर सवडी-सवडीनं ग्रुपनुसार बोलवावं असं त्यांनी ठरवलं होतं. बिल्डिंगची सगळी कामं अद्याप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे गवंडी, प्लंबर, सुतार या लोकांचा वावर चालू होताच. या सा-या कामगार मंडळींना निरुपमानं प्रसादाला बोलावून पोटभर खाऊ घातलं. त्या सा-यांची आस्थेनं चौकशी केली. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी थोडी मदत दिली. या अप्रुपाईनं, सन्मानाच्या वागणुकीने त्या सा-यांची मनं सुखावली. या कुटुंबाला त्यांनी मनापासून आशीर्वाद दिले.