आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunila Buddhisagar Article About True Spirit Of Bhakti, Divya Marathi

प्रसन्नतेचं इंगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरवर्षीच्या नेमाप्रमाणे यंदाही नवरात्रात नऊ दिवस ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन पूजा करण्याची मंगलाबाईंची अतोनात इच्छा होती. पण नुकत्याच त्या मोठ्या आजारातून बाहेर आल्या होत्या. वयाची सत्तरी ओलांडल्यानं ताकदही कमी झाली होती. अशा अवस्थेत तास-दोन तास रांगेत उभं राहणं त्यांना झेपणार नाही, असं त्यांच्या सुनेचं - सुचेताचं म्हणणं होतं. नऊ दिवस उपास तर मुळीच करायचा नाही असं डॉक्टरांनीच बजावल्यामुळे त्यांनी नाइलाजानं मान्य केलं होतं. पण दररोज त्याच देवीला जाण्याचा हट्ट त्या मुळीच सोडणार नव्हत्या.
घटस्थापनेच्या दिवशी सुचेता रिक्षानं त्यांना ग्रामदेवताच्या दर्शनाला घेऊन गेली. दरवर्षीप्रमाणेच असलेली गर्दी मंगलाबाईंना अशक्तपणामुळे जास्तच भासत होती. दर्शनासाठी रांगेत तासभर त्या निर्धारानं उभ्या राहिल्या. मन भक्तिभावानं भरलेलं होतं. त्यामुळे हळदीकुंकवाचा चिखल दृष्टीआड झाला होता. रांगेतून हळूहळू पुढे सरकत गाभा-यापाशी आल्या तेव्हा पुजारी पटापट पुढे सरकण्याची अखंड घाई करत होते. काही जणांच्या हातातलं पूजेचं साहित्य देवीच्या चरणावर जेमतेम टेकवलं जात होतं, तर काहींचं परस्पर बाजूच्या टोपलीत जात होतं. पुजा-याच्या व पोलिसांच्या घाईमुळे रेटारेटीत कुणालाही नमस्कारदेखील शांत चित्तानं करता येत नव्हता. मंगलाबाईंनी ओटीचं सामान पुढे केलं आणि डोळे मिटत हात जोडले, तोच ३-४ सेकंदातच देवीचा प्रसाद त्यांच्या हातात देऊन पुढे ढकलण्यात आलं. म्हणजे, तासभर रांगेत उभं असताना मनात दरवळत असलेला भक्तिभाव प्रत्यक्ष देवीच्या दारात पोचल्यावर मात्र झटकला गेला होता. क्षणभर मंगलाबाईंचं मन खट्टू झालं, पण दरवर्षीचा आपला नेम आज तरी पार पडला, या विचारानं त्यांनी समाधान मानून घेतलं.

रांगेतून बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांना थकवा जाणवायला लागला. किंचित भोवळ आल्यासारखंही वाटलं. घरी आल्यावर जेवून दुपारची विश्रांती झाल्यानंतरही उठून काही करण्याची ताकद उरली नव्हती. दुस-या दिवशीही अशक्तपणा होताच. आता मात्र ‘त्या’ देवीला न जाता घरापलीकडच्या गल्लीत असलेल्या देवीच्या देवळातच जायचं असं सुचेतानं ठामपणे सांगितलं. मंगलाताईंनी निमूटपणे मान्य केलं.

घरापास्नं जवळ असलेलं ते देऊळ छोटंसंच, टुमदार अन् स्वच्छ होतं. बाजूला झाडांची दाट सावली होती. देऊळ जरा आडबाजूला असल्यानं गर्दी मुळीच नव्हती. रांगेत उभं राहण्याचा प्रश्नच नव्हता. मंगलाबाईंना स्वत:च्या हातानं पूजा करता आली. इतकंच नव्हे तर त्यांनी संपूर्ण आरतीही केली. तिथे असलेल्या भक्तांनी टाळ्यांची साथ दिली, तेव्हा सारे तल्लीन झाले. देवीचा शांत, प्रसन्न मुखवटा मनसोक्तपणे डोळ्यात साठवता आला. दर्शनाची आस निवली. मन तृप्त झालं.

‘किती मंगल वाटतं नाही इथे!’ सुचेताच्या शब्दांनी मंगलाबाई भानावर आल्या. ‘रोज इथे यायला आवडेल मला,’ या तिच्या म्हणण्यानं तर त्या चकितच झाल्या. ‘अरे वा! आधुनिक विचाराची असलेली तू हे म्हणते आहेस हे नवल अन् भाग्यच म्हणायचं,’ त्या उद्गारल्या.
सुचेता किंचित हसली अन् म्हणाली, ‘रोजची धावपळ अन् टेन्शन यापासून दूर अशा शांत, प्रसन्न वातावरणात थोडा वेळ मनाला विसावा द्यायला कोणालाही आवडेल आई. माझ्या मताच्याही बहुतेकांचा याला विरोध नसतोच मुळी. प्रेम, वात्सल्य, आनंद याप्रमाणे ‘भक्ती’ ही भावनाही अनुभवावी अशी आहे. फक्त भक्तीचं रूपांतर कर्मकांडात होऊ नये, त्याचं अवडंबर माजू नये एवढंच म्हणणं असतं माझं. जसं केशर, जायफळ याच्या स्वादानं पक्वान्न रुचिसंपन्न होत असलं तरी ते थोड्या प्रमाणातच घालावं. आरोग्याला ते चांगलं असलं तरी प्रमाण जास्त झालं तर त्याचेही दुष्परिणाम असतात ना? शिवाय अधू शरीराला काठीचा, अशक्तपणाला टॉनिकचा आधार घ्यावा लागतो हे खरं, पण खडखडीत बरं असताना आपण तो वापरत नाही. कधी दु:खानं, संकटानं मन अधू असताना आपण भक्तीचा आधार घेतो, तरी त्यातून बाहेर आल्यावर कर्मकांडानं देवाला कितपत धरून ठेवावं? बरोबर ना?’

कालच्या आणि आजच्या देवळातल्या अनुभवाची तफावत मंगलाबाईंना जाणवत होतीच. स्थानमाहात्म्य अन् पूजेचे षोडशोपचार यापेक्षा शांत, स्वच्छ परिसर अन् मनाची एकाग्रता अधिक प्रसन्न करते, याचा प्रत्यय त्यांना आला होता. सुचेताचा मुद्दा आज त्यांना पटला. गर्दीच्या देवस्थानाला यापुढे न जाण्याची त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली.