आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunila Buddhisagar Article About Unwanted Rituals

जुन्याचा अट्टहास किती दिवस ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहिणी अपर्णाच्या घरी गेली तेव्हा रविवार म्हणून अपर्णाने घर आवरायला काढलं होतं. देऊन टाकायच्या वस्तू एकीकडे ठेवल्या होत्या. त्यात होतं जुन्या काळातलं एक नक्षीदार सागवानी पेटीचं, पितळी लंबक असलेलं किल्लीचं घड्याळ अन् एक पितळी जड असा फिरकीचा तांब्या.

‘हे काय अपर्णा! अशा वस्तू आता दुर्मिळ आहेत. छान पॉलिश करून ठेवल्या तर शोभून दिसतील. आणि तू या देऊन काय टाकतेस!’
‘अगं, मग काय करणार?’ अपर्णा तिची बाजू सांगू लागली. ‘स्नेहलच्या लग्नात खूप छान वस्तू भेट मिळाल्या आहेत. मग नव्या, जुन्या सगळ्याच वस्तू कुठे म्हणून ठेवणार? त्या व्यवस्थित राखणंही जमत नाही.’
‘ते बरोबर आहे म्हणा! पण अपर्णा, जुन्या प्रथा-परंपरांबद्दलसुद्धा असाच विचार केला पाहिजे असं मला वाटतं.’
‘म्हणजे काय?’ अपर्णाने विचारलं.
रोहिणी आपलं म्हणणं स्पष्ट करू लागली, ‘अगं, आता भिशी, महिला मंडळांचे कार्यक्रम, व्याख्यानमाला, संगीताचे कार्यक्रम असे भरपूर उपक्रम असतात. लहान मुलांचे वाढदिवस, कुणाची एकसष्टी, पंचाहत्तरी अशा प्रसंगीही लोक मनोरंजनपर, उद््बोधक असे कार्यक्रम ठेवतात. मग हळदी-कुंकू, मंगळागौर, डोहाळजेवण अशा प्रथा सांभाळल्याच पाहिजेत का? हंऽ, आता हौस असणार्‍यांकडे वेळ, एनर्जी, पैसा असेल किंवा कल्पकतेला, कलात्मकतेला वाव देऊन व्यक्त व्हायचं असेल तर गोष्ट निराळी. पण एरवी दोन बाबी विचारात घ्यायला हव्यात, असं मला वाटतं.’ ‘कोणत्या?’ अपर्णा म्हणाली.

‘एक म्हणजे जुन्या प्रथांच्या कार्यक्रमांपेक्षा, विचार देणार्‍या उपक्रमातून जास्त समाधान मिळतं. याचा अनुभव घेऊन पाहायला हवा. दुसरं म्हणजे वर्षानुवर्षे जपत आणलेल्या परंपरा सध्याच्या काळात योग्य आहेत का, वयानुसार आपली ताकद कमी होत चालली तरीही त्या चालू ठेवण्याचा अट्टहास असावा का, याचा विचार मनातल्या ठाम कल्पना बाजूला सारून करायला हवा.’ अपर्णा म्हणाली, ‘खरंच गं, तू सांगतेसय ते बरोबर आहे. परवा कमलताईच्या बोलण्यावरून मलाही असंच वाटून गेलं. सगळे रीतिरिवाज करताना श्रम झाले तरी मनाला समाधान वाटतं असं म्हणत सासरचे सगळे कुळाचार सांभाळणारी कमलताई, पण ‘आमचा जन्म सगळा यातच जायचा’ ही खंत तिच्या मनात अधूनमधून उमटतेच. आणि आता या गोष्टींचा आग्रह धरणारी तिच्या घरातली मंडळी हयात नाहीत, हिनंही साठी ओलांडली, होत नाही तरी या गोष्टी सोडून द्यायला ती तयार नाही. शिवाय सुनांवर आम्ही काही लादणार नाही, असं तोंडानं म्हटलं तरी सगळं व्यवस्थित व्हावं अशी इच्छा असतेच.’

‘हे बघ, आपणच एकेक पाऊल उचलूया आता,’ रोहिणी सुचवू लागली. ‘तुझ्या स्नेहलला मंगळागौरीसाठी रजा मिळणं अवघड आहे ना? मग पहाटे उठून पूजा उरकून ऑफिसला जाण्याची धावपळ करायलाच हवी का? तुलाही जास्त दगदग झेपत नाही. मग केलीच पाहिजे का मंगळागौर? आणि या उच्च शिक्षण घेतलेल्या कित्येक मुलींना अशा गोष्टीत खरं म्हणजे फारसा रस असतोच असं नाही. रीतीरिवाज चालूच ठेवण्याच्या आपल्या पद्धतीनं चाकोरीबाहेरचा विचारच करायला आपण त्यांना सवड देत नाही.’
‘तुझं म्हणणं ठीक आहे गं. पण स्नेहलच्या सासूबार्इंना काय वाटेल?

‘का ऽऽ ही म्हणणार नाहीत. परवाच भेटल्या तेव्हा म्हणत होत्या, ‘मला काही असले समारंभ फारसे पटत नाहीत. पण स्नेहलची आई हौसेनं करत असेल तर त्यांचा हिरमोड कशाला करायचा, असं वाटतं.’ हे ऐकून अपर्णाच्या मनावरचं ओझं उतरलं. लेकी-सुनांना नवी आव्हानं पेलण्यासाठी, नवा विचार करण्यासाठी जुन्या बंधनातून त्यांना मोकळं करणं तिला पटलं.
sunila0810@gmail.com