आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunila Budhhisagar Article About Makar Sankranti Festival

हळदी-कुंकू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांची शिक्षणं संपून ती नोकरीसाठी परगावी निघून गेल्याने विकासबरोबर त्याच्या बदलीच्या गावी जायला वासंतीला काही अडचण नव्हती. हे नवं गाव तालुक्याचं असलं तरी अजून विकसित नसल्यानं खेडेगावासारखंच होतं. झाडी, शेतं, मोकळी हवा हे सारं फारच आवडलं वासंतीला. गावाच्या एका टोकाला मिळालेलं घर जणू फार्महाऊसच! आजूबाजूला १५-२० बैठ्या घरांची वस्ती. शांत, निवांत दिनक्रम, शेजार-पाजारच्या घरातून पदार्थाची नित्य देवाणघेवाण, मोकळेपणा या गोष्टींची वासंतीला मजा वाटे. शहरांप्रमाणे लोकांमध्ये तुटकपणा नव्हता. आपुलकीनं विचारपूस होती. हे सारं फार सुखावणारं होतं. पहिल्या वर्षातच वासंती या गावात छान रमली.

गावातल्या बायकांचं मंडळ होतं. भिशीचे ग्रुप्स होते. मुलांप्रमाणे गावातल्या मुलीही शिकून पुढे जात होत्या. शहरगावी जाऊन इंजिनिअरही होणार्‍या काही होत्या. घरोघरी आधुनिक सुखसोयी आणि बाहेर निसर्गरम्य परिसर. वासंतीचे दिवस मजेत चालले होते.

गौरी-गणपती, नवरात्र, संक्रांत, चैत्रगौर, श्रावण शुक्रवार अशा वेगवेगळ्या निमित्तानं हळदी-कुंकू होई. मैत्रिणींचं एकमेकींकडे त्यानिमित्ताने वरचेवर जाणं-येणं होई. महिलांच्या एका ग्रुपनं फुगडी, झिम्मा, गोफ, गाठोडं यांसारख्या कित्येक पारंपरिक खेळांचा कार्यक्रम फार सुंदर बसवला होता. तो पाहताना वासंतीला आपण लहानपणी जागवलेल्या हरतालिका, कुणाच्या मंगळागौरीच्या रात्री आठवायच्या. त्या रम्य स्मृतीत वेगळाच आनंद वाटायचा.

दुसर्‍या वर्षापासून मात्र वासंतीला या सार्‍यात ‘तोच तो’पणा वाटायला लागला. तिचं आधीचं आयुष्य शहरात गेलं होतं. काही वर्षं नोकरी केल्याने आत्मविश्वास, स्वतंत्र विचारसरणी तिच्या अंगवळणी पडली होती. शहरात वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक, साहित्यिक दर्जेदार कार्यक्रम तिने पाहिले होते. काही आयोजितही केले होते. या छोट्या गावाची नवलाई ओसरल्यावर वासंतीला त्या व्यापक जगाची आठवण होऊ लागली. इथल्या रुटीनमध्ये एक प्रकारचा तोचतोचपणा येऊ लागला होता. पण इथल्या मैत्रिणींशी तिचं छान जुळलं होतं. त्यांनाही शहरातल्याप्रमाणे व्यापक, संपन्न अनुभव कसा मिळू शकेल, याचा विचार करताना तिला एक कल्पना सुचली.

ते संक्रांतीचे दिवस होते. वासंतीनं एके संध्याकाळी तिळगूळ समारंभ आयोजित केला. मात्र, हळदी-कुंकू प्रसंगी काही वस्तू लुटतात, त्याऐवजी तिनं सुगम संगीताचा आनंद लुटायचं ठरवलं. अमृता ही नावाजलेली गायिका तिची मैत्रीण होती. तिला तिच्या साथीदारांसह वासंतीनं आमंत्रित केलं. गावातल्या सख्यांना तिनं ही संगीताची मेजवानीच दिली, म्हणा ना!
तो कार्यक्रम ऐकला मात्र, सारा श्रोतृवर्ग भारावून गेला.

वासंतीला सार्‍या जणी भरभरून धन्यवाद देऊ लागल्या. “तुमच्यामुळे आज आम्हाला असं काही वेगळं अन‌् दर्जेदार मिळालं हो! नाही तर आमच्या गावात सदा तेच अन‌् तेच!’ असे अनेकांचे उद‌्गार ऐकून वासंतीला आपण केलेल्या आगळ्या प्रयोगाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

मैत्रिणींनो, आपणही हळदी-कुंकवाच्या त्याच त्या पद्धतीत विचारपूर्वक बदल करू या का? संक्रांतीच्या लुटीत अनावश्यक, किरकोळ वस्तूंची घरात अडगळ वाढवण्यापेक्षा चार-सहा जणींनी एकत्रितपणे तिळगूळ समारंभ करून अशा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटता येईल. किंवा आणखी एक कल्पना म्हणजे, वृत्तपत्रातल्या चांगल्या लेखांची, कवितांची कात्रणं काढून त्याच्या झेरॉक्स प्रतींची छानशी, छोटीशी पुस्तिका तयार करून देता येईल. कुठे सापडलेलं सुंदरसं चित्र त्याच्या कव्हरवर चिकटवता येईल. नवीन पाककृतींचीदेखील पुस्तिका करता येईल. देण्या-घेण्यात मिळालेले, घरात पडून असणारे ब्लाउजपीसेस असतात, त्याच्या छोट्या पिशव्या शिवून घेऊन त्यावर ‘कॅरी बॅग टाळा’ असा संदेश लिहून वाटता येईल.

आणि हो, महत्त्वाचं म्हणजे हळदी-कुंकवाला फक्त ‘सवाष्णींना’च बोलावण्याची पद्धत तर आता बदलायलाच हवी. इतर स्त्रियांना हळदी-कुंकू लावताना हात आखडता घेणं आता कमी झालं आहे; पण ते बंदच व्हायला हवं. एवढं तरी पुढचं पाऊल आपण नक्कीच टाकू शकतो. होय ना?
सुनीला बुद्धिसागर | सोलापूर
sunila0810@gmail.com