आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunila Budhisagar Article On Elizabeth Ekadashi Marathi Movie

एलिझाबेथ एकादशीच्या निमित्ताने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘एलिझाबेथ एकादशी’ पाहिलास स्वाती? अगदी उत्कृष्ट सिनेमा!’ गप्पा मारता मारता नीला म्हणाली. ‘होय मावशी, एकदम भारी पिक्चर? त्यातल्या मुलांनी मस्त धमाल केलीय!’ १० वर्षांचा ओंकार एक्साइट होऊन म्हणाला.
स्वाती हसून म्हणाली, ‘आवडला नं तुम्हा मुलांनाही? छानच आहे. मी पाहिला गेल्या आठवड्यात. सगळ्यांना तो सिनेमा आवडतोच. फक्त एवढेच की त्यात दाखवलेल्या समाजातल्या दोषांचा विचार आणि कृती किती जण करत असील कोणास ठाऊक.’
‘म्हणजे? जप्त केलेलं मशीन सोडवण्यासाठी मुलांनी केलेल्या धडपडीबद्दल ना?’ स्वातीच्या बोलण्याचा नीट उलगडा झाल्यानं नीलानं विचारलं.

‘तेवढंच नाही गं! अंतर्मुख करणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत त्यात. पैशाची अत्यंत निकड असतानाही प्रामाणिकपणा सोडायचा नाही, ही आईनं मुलांना दिलेली शिकवण तर आहेच; पण विशिष्ट कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे तोंडात शिव्या बसलेली मुलं ही मदत करणारीही असू शकतात. गणिकेचा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनाही माया, ममता असते हे किती जणांनी टिपलं असेल? अगं, ‘यंदाची वारी आम्हालाही चांगली गेली’ या एका गणिकेच्या वाक्याकडे किती जणांचं लक्ष गेलं असेल? त्यातून प्रकट होणारं वास्तव विचार करायला लावणारं नाही का?’ स्वाती अगदी तळमळीनं बोलत होती.

नीलानं ‘एलिझाबेथ एकादशी’कडे केवळ एक छान निखळ निर्मळ करमणूक एवढ्याच दृष्टीनं पाहिलं होतं. एवढे सारे मुद्दे तिच्या लक्षातच आले नव्हते. आणि स्वातीला अजूनही पुढे बरंच काही बोलायचं होतं. अस्वस्थ होऊन ती सांगत होती.

‘छोटा मुलगा कीर्तनात संतांच्या बरोबरीनं न्यूटन वगैरे शास्त्रज्ञांची नावं घेतो. खरंच, सनातन सत्य सांगणारी ही मंडळी पण त्यांनी सांगितलेल्या सत्याचा विचार न करता केवळ देव देव करत वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे लोक दुर्लक्ष करतात. जादूटोणा कायद्याला विघातक पद्धतीनं विरोध करणारी मंडळी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान तर करतातच; पण मुख्य म्हणजे समाजाच्या प्रगतीला खीळ घालतात, समाजाला मागे नेतात ही गोष्ट चीड आणणारी आहे,’ स्वाती मनात खदखदणाऱ्या गोष्टी त्वेषानं बोलत होती. नीला ऐकत होती. तिच्या जाणिवेत भर पडत होती. स्वातीचं बोलणं अजून संपलं नव्हतं.

मध्येच घोटभर पाणी पिऊन स्वाती पुढे बोलू लागली, ‘आणखी एक गोष्ट. पाच हजार रुपयांसाठी एखाद्या सालस कुटुंबाला करावी लागणारी यातायात आणि विठ्ठल मंदिरात चाळणीतून चाळून वेगळे करावे लागणारे नाण्यांचे ढीग, जमणाऱ्या नोटांच्या राशी यातील तफावत अस्वस्थ करते. अगं, अलीकडेच मी राष्ट्र सेवा दलाचं नळदुर्ग इथलं अनाथ मुलांचं वसतिगृह ‘आपलं घर’ पाहायला गेले होते. समाजाविषयी खरी तळमळ असणाऱ्या लातूरच्या आपत्तीच्या वेळी उभं केलेलं हे वसतिगृह तिथले कार्यकर्ते तितक्याच निष्ठेनं चालवत आहेत. विविध ठिकाणांहून आलेल्या मदतीमुळे सोयी चांगल्या झाल्या हे खरं; पण आता दैनंदिन खर्च भागवणं ही मोठीच समस्या आहे. सरकारी अनुदान कित्येक लाखांनी थकीत असतं. दीडशे-पावणे दोनशे मुलांचा खर्च कसा भागवायचा? पण त्यातूनही तिथल्या कार्यकर्त्यांनी अन् व्यवस्थापन मंडळानं मुलांच्या जेवणा-खाण्याचा दर्जा उत्तम राखलाय.
विविध अंगांनी विचार करून मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. पण एकीकडे आर्थिक मदतीची अशा सेवाभावी संस्थांना चणचण असते, तर दुसरीकडे एखाद्या देवस्थानी दिवसात ११ कोटी जमा झाल्याची, कुणी सोन्याचे-चांदीचे ताट दान दिल्याची बातमी येते. ‘एलिझाबेथ एकादशी’ पाहताना ही तफावत प्रकर्षानं जाणवली आणि अस्वस्थ वाटलं.

आता लग्नसराईचा मोसम आलाय. हौस म्हणून काही बाबतीत लोकांचा हात सैल सोडला जाईल. पण तोच हात तळमळीनं कार्य करणाऱ्या, सेवाभावी सामाजिक संस्थांना मदत करताना मात्र लगेच आखडता घेतला जातो. किंबहुना मिटलाच जातो. असं का? एवढं बोलून एक सुस्कारा टाकून स्मिता बोलायचं थांबली. नीला स्तब्ध झाली. नीलाच्या सख्ख्या भावाचं पुढच्याच महिन्यात लग्न होणार होतं.
स्मिताचा मुद्दा त्याला सांगून त्या दिशेनं कृतिशील पाऊल टाकायचं तिनं ठरवलं, अन् लगेच पर्समध्ये असलेले दोन हजार रुपये ‘आपलं घर’ला पोचवण्यासाठी तिनं स्मिताच्या हातात ठेवले. भाऊही सांगितल्यावर लग्नातल्या हौशी-मौजीच्या काही बाबी कमी करून ‘आपलं घर’साठी काही करेल, अशी तिची खात्री होती. मैत्रिणींनो, आपणही अंतर्मुख व्हायला हवं ना? आपण काय करू शकू यावर?
sunila0810@gmail.com