आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय समाजाला नि:शब्द करणारी सिंधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अनेक देशांची विभाजने, फाळण्या झाल्या. देश विभाजन हे केवळ राजकीय वा भौगोलिक असत नाही. त्याचा सर्वाधिक परिणाम होतो, तो त्या देशातील संस्कृतीवर! विभाजनाने त्या देशातील धर्म, जात, भाषा, प्रांत विभागले जाऊन माणसांची मने पण दुभंगतात. भारत-पाकिस्तान विभाजन केवळ हिंदू-मुस्लिम असे धर्मविभाजन नव्हते. हिंदी, सिंधी, उर्दू, पंजाबी, काश्मिरी असे भाषासमूह त्यात विभागले गेले. सिंधी भाषेबाबत बोलायचे झाले तर बहुसंख्य सिंधी पाकिस्तानात राहिले. कारण विभाजनात सिंध, बलुचिस्तान प्रांत पाकिस्तानात समाविष्ट झाले. विभाजनात हजारो विस्थापित भारतात आले. त्यात सिंधी भाषिकांची संख्या मोठी होती. ते भारतात येऊन प्रामुख्याने राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रात स्थायिक झाले. जगात ४ कोटी सिंधी भाषिक असून भारतात त्यांची संख्या सुमारे ३० लाख इतकी आहे. भारतीय राज्यघटनेने सिंधीस भारतीय भाषा म्हणून आठव्या परिशिष्टात मान्यता िदली आहे. तिच्या विकासाच्या भारत सरकारच्या अनेक योजना नि प्रयत्न आहेत.

संस्कृत भाषेपासून सिंधी जन्मली. भाषाशास्त्रीय दृष्टीने ही इंडो-आर्यन भाषा. व्राचड पैशाची ही जुनी अपभ्रंश प्राकृत भाषा. आजच्या सिंधी भाषेची मुळं त्या भाषेत आढळतात. पौर्वात्य भाषांपैकी सिंधी भाषेत ‘कुराण’चा पहिला अनुवाद झाला. इस्लाम धर्मप्रसारास त्यामुळे गती आली, असे मानले जाते. सिंधी भाषा हिंदू धर्मीय बोलतात. पण ते देवनागरी लिपीचा वापर करतात. उलटपक्षी जे मुस्लिम सिंधी बोलतात, ते मात्र अरेबिक नक्श लिपीत लेखन करतात. सिंधी भाषेची अनेक बोलीरूपे विविध प्रांतात प्रचलित आहेत. त्या सिंधी भाषेच्या उपभाषाच होत. सिराइकी, विचोली, लाडी, थडेली, लासी, कच्छिकी ही सारी सिंधी भाषिक रूपे होत.

या भाषा भारत-पाकिस्तानातील सिंध, राजस्थान, गुजरात, कोहिस्तान, बलुचिस्तान इत्यादी प्रांतात बोलल्या जातात. संस्कृत, प्राकृत, अरबी, फार्सी शब्द सिंधीत आढळतात. कमी संकट व मूळ रूपरक्षण या दृष्टीने ती जगातील शुद्ध राहिलेल्या भाषांपैकी एक होय. सिंधी साहित्याचा प्रारंभ मौखिक परंपरेतून झालेला आहे. या साहित्यात लिखिताची परंपरा इसवीसन पूर्व तिसर्‍या शतकापासून मानली जाते. परंतु पुरावे मात्र सोळाव्या शतकापासूनचेच उपलब्ध आहेत. मोहोंजोदडो उत्खनतात जी लिखित रूपे हाती आली, ती सिंधीची आदिरूपे म्हणून दावा केला जातो. सिंध प्रांत मोगलांनी ताब्यात घेतल्यापासून तिचे अरेबिक रूप विकसित झाले. शेख जमाली, छतो, राजो दरवेश हे सिंधीचे प्राचीन कवी होत. अकराव्या शतकात सिंधी कवी मिर्झा जानी बेगनी ‘महाभारत’ सिंधीमध्ये आणले. अकबराच्या दरबारी कवीत होता. सिंधीतील प्रेमकाव्य परंपरा त्याने निर्माण केली, असे मानले जाते. सिंधी प्राचीन काव्यात उमर-मारूई, लीला-चणेसर, मुमल-राणो, नूरी-तमाची, सुहिणी-मेहर, ससी-पुनहुन अशा अनेक प्रेमकथा आजही परंपरेने सांगितल्या जातात. लैला-मजनू, हिर-रांझा अशा परंपरेतल्याच या प्रेमकथा होत.

लोकसाहित्य परंपरेनंतर सोळाव्या शतकातील सािहत्याने सिंधीच्या पहिल्या साहित्यिक कालखंडाचा प्रारंभ झाला. हा प्रभाव काळ १९व्या शतकापर्यंत टिकून होता. सुमारे तीनशे वर्षांचा सिंधी साहित्याचा पहिला कालखंड मिश्र संस्कृतीचा होता. भारतीय, इस्लामी, सूफी परंपरेची काव्य या काळात लिहिली गेली. शाह अब्दुल लतीफ, सचल सरमस्त, सामी हे या काळचे प्रमुख कवी. ‘वाई’ हा काव्यप्रकार त्या काळात प्रचलित होता. सचल यांनी तो ‘काफी’ रूपात सिंधीत आणला. गेल्या शतकात उस्मान अली अंसारी, महमद सादिक राणिपुरी, कल्याण बुलचंद अडवाणी यांनी सचल यांचे हे काव्य संकलित, संपादित करून प्रकाशित केले आहे. साहित्य अकादमीने लिप्यंतरण करून काही काव्य प्रकाशित, प्रसारित करून प्राचीन सिंधी काव्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे आज आपण ‘वाई’, ‘काफी’ काव्य सिंधी काव्य परंपरा म्हणून वाचू, समजू शकतो.

विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा सिंधी साहित्य इतिहासाचा दुसरा कालखंड. गद्य शैली विकास, साहित्य प्रकार प्रसार म्हणून या काळाचे महत्त्व आहे. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश, ख्रिश्चन मिशनरींनी संकलित, संपािदत गद्य ग्रंथांचा विकास झाला. ब्रिटिशांनी व्याकरण, शब्दकोश तयार करून सिंधी भाषेस चालना दिली. इतकेच काय, सिंधी भाषेत भारतात लिपीचा असलेला वाद ब्रिटिशांनी देवनागरी व अरेबिक मिळून तयार नव्या लिपी निर्मितीने सोडवल्याचे दिसून येते. आज भारतात सिंधी भाषा व साहित्याचा जो प्रसार, प्रचार, विकास होतो आहे, त्याचा पाया ब्रिटिशांच्या या प्रयत्नांनी घातला गेला, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. यातून सिंधी भाषेत शिक्षण घेण्याची परंपरा निर्माण झाली. वाथेनकृत ‘ग्रामर अँड व्होक्यॅब्युलरी ऑफ द सिंधी लँग्वेज’ (१८३६), ईस्टवीकचे ‘व्होकॅब्युलरी ऑफ सिंधी लँग्वेज’ (१८४३), कॅप्टन जॉर्ज स्टॅक निर्मित ‘इंग्लिश-सिंधी शब्दकोश’ (१८४९) आणि ‘सिंधी-इंग्लिश शब्दकोश’ (१८५५) या ग्रंथांनी सिंधीस ज्ञानभाषा बनविण्याची परंपरा सुरू केली. स्वातंत्र्यपूर्व काळात सिंधीत कथा, कांदबरी, काव्य, निबंध, बालसाहित्य, चरित्र असे वैविध्यपूर्ण साहित्य लिहिले गेले.

कौरोमल चंदनमल खिलनानी, मिर्झा कलीच बेग, दयाराम गिदुमल, परमानंद मेवाराम, हिरानंद शौकिराम, निर्मलदास फतेहचंद हे या काळातील प्रमुख लेखक. सिंधी गद्य विकासात मोलाची भर घातली ती मात्र होटचंद गुरुबक्षाणी, जेठमल गुलराजाणी, भेरूमल अडवाणी आणि लालचंद जगतियानी या लेखक चतुष्ट्यांनी. सिंधी कवी किशिनचंद खत्री यांनी सिंधी कवितेस आपल्या ‘सिमुंडी सिंपू’ (सागर शिंपले) या काव्यसंग्रहाद्वारे प्रेमकवितेतून बाहेर काढून सिंधी काव्य वर्तमानाशी जोडले. शेख अयाझ, नारायण श्याम या कवींनी ही परंपरा पुढे चालविली आणि विकसितही केली.

स्वातंत्र्योत्तर काळात ज्या सिंधी साहित्यकारांनी लिहिले, त्या लेखनावर विभाजनाचे शल्य सर्वत्र पसरलेले आढळते. स्वातंत्र्यपूर्व काळातील दंगली, अत्याचार, अन्याय, सांस्कृतिक ससेहोलपालट याचे खेदकारी वर्णन सन १९६० पर्यंतच्या साहित्यात प्रकर्षाने झाल्याचे दिसून येते. निर्वासितांच्या छावण्या दुसर्‍या महायुद्धातील छळछावण्यांपेक्षा कमी नव्हत्या, हे सिंधी कथा, कादंबर्‍या, काव्य, आठवणी वाचताना जाणवते. तरी सिंधी समाज संयम व कष्टाने आज उभा असलेला पाहतो, तेव्हा त्यांच्या विजिगीषू वृत्तीची दादच देणे भाग पडते. या समाजाने व्यापार व उद्योग यांना जीवन मार्ग म्हणून स्वीकारले. आजचे सिंधी साहित्य त्याचे प्रतिबिंब दाखवते. नाटक, नवी कविता, प्रवासवर्णन यातून सिंधी आधुनिक समाज समजत जातो. गोबिंद माल्हींचे कथात्मक सािहत्य याचीच साक्ष.

सोभो ग्यानचंदांनी सिंधी साहित्यात मार्क्सवादी विचारधारा रुजवली. आनंद खेमाणींच्या ‘नोव्हेंबर जी आखरी रात’(१९७६)मधील कथातून जाणिवांचा संघर्ष लक्षात राहतो. विष्णु भाटि यांच्या कथा वाचताना मराठी वाचकांना चंद्रकांत काकोडकर आठवले नाही तरच आश्चर्य! ईश्वर चंदर, श्याम जयसिंघानी आधुनिक काळातील बहुप्रचारित लेखक. तीर्थ ‘वसंत’, राम पंजवानी, लेखराज अझीझ यांच्या कथा, कादंबरी, काव्यास साहित्य अकादमी पुरस्कार लाभले ते साठोत्तरी कालखंडात. त्यामुळे साठ्ठोत्तरी साहित्यिक म्हणून सिंधी साहित्यात त्यांना मोठी प्रतिष्ठा आहे. ‘कनवर’(कादंबरी), ‘सुराही’(कविता) सिंधी आधुनिक साहित्याचे ऐवज मानण्यात येतात, ते त्यांच्या बहुप्रचारित भारतीस विविध भाषी भाषांतरांमुळेही. आज सिंधी आधुनिक साहित्य मोठ्या प्रमाणात हिंदीत भाषांतरित होत असून त्यामुळे सिंधी साहित्य हे भारतीय साहित्याचा अविभाज्य भाग बनले आहे.

सिंधी भाषा भारतीय झाली असली तरी तिचा म्हणून एक दुखरा कोपरा आहे. ती अद्याप कोणत्याही भारतीय प्रदेशाची राजभाषा होऊन शकली नाही. घटनामान्य संस्कृत व्यवहारातली प्रचलित भाषा न राहिल्याने तिचे राजभाषा होऊ न शकणे समजण्यासारखे आहे. पण भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरा, मनुष्य समुदाय असून, प्रचलित असून, तिचे राजभाषा न होणे याचे एकमात्र कारण सिंधी भाषिकांचे अल्पसंख्य असणे अन्् समाजाचेच विखुरलेपण. भारतीय समाजात सिंधी बांधव तुटल्या बेटाचे जीवन जगत आहेत. भारत ‌विभाजनात हिंदू म्हणून भारतात आलेल्या सिंधींचे नि मुसलमान म्हणून भारतातून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय मुसलमानांचे परागंद जीवन एकच टाहो फोडतंय... ज्या उमेदीने आम्ही आलो, त्या उमेदीनेच आम्हाला कायमस्वरूपी निर्वासन दिले. सिंधी बांधव अंगाच्या कपड्यांनिशी भारतात आले. निर्वासित छावण्यांत वर्षोनुवर्षे राहिले. छावण्यांचीच पुढं गावं झाली. मुंबईतलं उल्हासनगर, कोल्हापूरचं गांधीनगर उदाहरण म्हणून सांगता येईल. या देश, समाजाने त्यांना काहीच दिलं नाही. ते रस्ते, टपरी, रेल्वे, कोपरे हेरत छोट्या-मोठ्या वस्तू-चीजा विकत काटकसर करत स्वावलंबी झाले. तुम्हाला "मागणारा' सिंधी शोधून सापडणार नाही. नोकरी तो अपवादाने करतो. अल्प फायदा घेऊन व्यापार करण्याचं त्यांचं कसब! या कौशल्याने ते स्वावलंबी झाले आणि स्वाभिमानी तर मूळचे ते होतेच. तुम्हाला तुमचा अन्य भाषा, धर्मी, जातीय मित्र सांगता येईल. सिंधी मित्र, मैत्रीण, नातलग अपवाद! हे काय समाज वास्तव आहे? आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की त्यांनी स्वतंत्र राहून स्वकष्टाने समृद्ध होऊन दाखवलं?

भारताचा आंतरभारती संस्कृती म्हणून विचार करताना प्रत्येक भारतीयाने भविष्यकाळात सिंधी बांधवांशी सख्य, सौहार्द, सहअस्तित्व भावनेने ते भारतीय समाज संस्कृतीच्या मध्य प्रवाहात कसे येतील, ते पाहिले पाहिजे. आपण त्यांना समजून घेणं म्हणजे केवळ भाषा, साहित्याचा इतिहास जाणणं नव्हे! माणूस म्हणून सिंधी बांधव भारतीय होणे म्हणजे आंतरभारती संस्कृतीचा विकास होणे! सार्‍या सिंधी समाजाची व्यथा व्यक्त करणारी, निष्प्रश्न करणारी सिंधी कवी हरि दिलगीर यांची एक कविता आहे... "पागलों का नगर'. जागेअभावी काहीच ओळी उद‌्धृत करतो. कवीचे प्रश्न तुम्हाला माझ्याप्रमाणेच मूक, अपराधी बनवतील. ही आहे सिंधी माणसाची जगण्याची ताकद व भाषा, साहित्याची संपन्नता... सामर्थ्य!
पागलों का नगर यह, पागलों का करें क्या?
हम भी पागलों के साथ, पागल बन जाए क्या?
वे बहुत बकते है, हम भी बके क्या?
वे अंधे, वे बहरे, हम भी बन जाएँ क्या?
आँखों को फोड दे? कानों को काट ले क्या?
सभी हुए निर्लज्ज, सभी बने बेहया,
संकाचे का दामन, हम भी छोडे क्या?
सिंधी संस्कृतीची सभ्यताच मुळी संयम, सज्जनता होती. मोहोन जो दडो काळापासून सिंधींनी जपलेला संकोच कोश नव्हे! असेलच तर ते स्वयंविकासाचं रहस्य-सूत्र! आपण त्यांच्याकडून एवढं जरी शिकलो तर ते आंतरभारती आदानप्रदानाचं अनुकरणीय उदाहरण ठरेल.

सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com
बातम्या आणखी आहेत...