आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेकिंगच्या दुर्बिणीतून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहल, भटकंती, प्रवास, गिर्यारोहण, पदभ्रमण, निसर्गभ्रमण... प्रत्येकाची गंमत वेगळी. गिर्यारोहण त्यातल्या त्यात जरा कौशल्यपूर्ण. गडकिल्ले पायाखाली तुडवण्याची एकदा चटक लागली की, ती आयुष्यभरासाठीच माणसाचा ताबा घेते.

लहानपणापासूनच निसर्गरम्य स्थळी फिरण्याची आवड असल्याने मी बरीच भटकलेय. ट्रेकिंग म्हणजे पदभ्रमण किंवा जंगलभ्रमण मात्र फारसे नव्हते केले. नुकतीच यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अमरावती शाखेद्वारे आयोजित आमझरी ते मेमना असे मेळघाटात १४ किमीचे ट्रेकिंग मी करून आले होते. त्यामुळे निसर्गस्थळाची सहल व जंगलात पदभ्रमण यांतील फरक व आनंदही समजला. तेव्हाच यापुढे ट्रेकिंगची संधी सोडायची नाही, असे ठरवूनच टाकले. त्यामुळे यूथ होस्टेलच्या दोन दिवसांच्या नरनाळा ट्रेकची बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचताच मी, माझा मुलगा व माझी बालमैत्रीण वर्षा यांच्यासह नाव नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण केली. (हो, यूथ होस्टेलचा ट्रेक म्हटलं की, नंबर लागतो की नाही याची काळजी, कारण प्रत्येक ट्रेकला जागा कमी पडते हा अनेकांचा पूर्वानुभव.)
ठरल्याप्रमाणे आदल्या दिवशी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विशाल प्रांगणात सर्व सहभागी जय्यत तयारीनिशी, डोळ्यात एक नवीन उमंग घेऊन जमले होते. बसही सर्वांना सामावून घेण्यास उत्सुक होती. यवतमाळ, वाशिम, जळगाव, धुळे, अकोला, अमरावती येथून लोक सहभागी आले होते. संख्या इतकी वाढली होती की, दोन मारुती कार जास्तीच्या कराव्या लागल्या. त्या लोकांबद्दल आम्हाला खूपच हळहळ वाटली. कारण बसमधील प्रवासात आमचा संपूर्ण ग्रूप चांगलेच एंजॉय करणार होता.

आयोजकांनी आवश्यक त्या सूचना देऊन बसमध्ये बसविले. दुपारी दोन वाजता आमची बस नरनाळ्यासाठी सुटली. यूथ होस्टेलच्या ट्रेकला जाताना व येतानाचा प्रवास ही खरी धमाल असते. त्यामुळे सर्वच अपरिचित जवळ येतात. सर्व सहभागींना खुलविण्याची संधी या प्रवासातून आयोजक अतिशय खुबीने राबवितात. विजय पांडे सरांनी बसचा ताबा घेतला आणि विविध चुटकुले, कॅम्पेन साँग, गोष्टी, गाणी, अंताक्षरी अशी धमाल सुरू झाली. एकापेक्षा एक सरस
गाणी प्रत्येकाच्या पोटलीतून बाहेर निघत होती. अगदी स्वरचितसुद्धा. गंमतजंमत करत आम्ही नरनाळ्याच्या पायथ्याशी शहानूरला केव्हा पोहचलो याचा पत्ताच लागला नाही. आमच्या बसमध्ये सीए, वकील, डॉक्टर, प्रोफेसर, इंजिनिअर, विकास अधिकाऱ्यापासून विद्यार्थीही होते. एकमेकांशी अपरिचित असूनही अंताक्षरीच्या निमित्ताने बसमधील प्रवासात सर्व जण एकमेकांशी समरस झाले होते.
बसमधून खाली उतरताच तेथील दृश्य पाहून आम्ही अगदी हरखून गेलो. हिरवीगार वनश्री आमचं स्वागत करायला उत्सुक होती. भुरभुर पाऊसही आमच्या दिमतीला होताच.

नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी शासनाच्या वतीने पर्यटकांना राहण्यासाठी उत्कृष्ट व आल्हाददायक निवासाची व्यवस्था केलेली आहे. गेल्या गेल्या चहा, नाष्टा झाल्यावर तेथील एका गोल शेडमध्ये आयोजकांनी आमचा परिचय घेतला. यूथ होस्टेलच्या पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ट्रेकबद्दल महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. एव्हाना रात्रीचे आठ वाजले होते. जठराग्नी प्रदिप्त झालेला असल्याने सर्वांनी सुग्रास भोजनावर ताव मारला. जेवल्यावर बराच वेळ सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आनंद आम्ही लुटला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, उर्वरित लेख...