आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशाला हवा प्रेमदिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम शब्दांत व्यक्त करणं कठीणच. ती तर हृदयातून स्वयंस्फूर्तीने हळुवार उमललेली भावना. पाऊस पडताच धरतीच्या गर्भातून अलगद कोंब बाहेर यावा, इतकी नैसर्गिक. मग ती व्यक्त करण्यासाठी वर्षातून एखादा ठरावीक दिवस, वेळ, स्थळ कशाला हवं? ती काय ठरवून सांगण्याची गोष्ट आहे? ते तर मनाच्या नकळत नजरेतून, बोलण्यातून, देहबोलीतून आपोआप व्यक्त होत असतो.
 
खूप वर्षांपूर्वी जेव्हा ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीचा जमाना होता, त्या वेळी मी अमोल पालेकरचा ‘आदमी और औरत’ हा चित्रपट पाहिला होता. अभिनेत्रीचं नाव नाही आठवत. ती गरोदर, दिवस भरत आलेले असतात. नवरा आवश्यक साधनसामग्री सोबत देऊन तिला पायी रस्त्याने तालुक्याच्या गावी दवाखान्यात जाण्यासाठी रवाना करतो. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला काम सोडून तिच्यासोबत जाणं शक्य नसतं. ती एकटी जंगलातून जात असताना सहप्रवासी म्हणून अमोल पालेकरशी ओळख होते. सुरुवातीला दोघेही एकमेकांना हाडहूडच करतात. पण हळूहळू त्याला तिच्या एकंदर परिस्थितीची जाणीव होते अन‌् तिला सुखरूप दवाखान्यापर्यंत नेणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, हेही पटतं. बरं, त्याचं वागणंही काही फार प्रेमाचं, हळुवार नसतं. तिला अति श्रमाने ग्लानी आली की हा ‘ए औरत, ए औरत’ करून गदागदा हलवणार, तिच्या तोंडावर पाण्याचे सपासप शिपके मारणार. पण तिला, तिच्या पोटातल्या बाळाला धक्का लागणार नाही, म्हणून जपणारही. त्या निर्मनुष्य, एकाकी जंगलातून दोघेही एकदाचे तालुक्याला पोहोचतात. दवाखान्यात तिला भरती करण्यासाठी त्याला बरीच कसरत करावी लागते. त्यानंतरही तिची सुखरूप सुटका होईपर्यंत हा काळजीने तिथेच थांबतो. दुसऱ्या दिवशी तिचा निरोप घ्यायला व तिच्या नवऱ्याला निरोप देण्यासाठी पत्ता विचारायला तिच्याकडे जातो, त्या वेळी ती सद‌्गदित कंठाने म्हणते, “ए आदमी, हम नहीं जानत तेरा नाम क्या है, तेरा गांव क्या है, लेकिन भगवान के पास तेरे लिये दुआ मांगत.”

काय नातं असतं हो त्या दोघांमध्ये? ना ते पतीपत्नी होते, ना बहीणभाऊ, ना प्रियकरप्रेयसी. केवळ माणसामाणसामध्ये निसर्गतः जे नातं असायला हवं अगदी तेवढं सुंदर. पण आपल्याला तर प्रत्येक नात्याला लेबल हवंच असतं. माणुसकीच्या नात्याने, शुद्ध भावनेने कोणी एकमेकांशी चांगलं वागूच शकत नाही, असं वाटून आपण लगेच त्याचा अर्थ लावायला लागतो आणि त्यांच्या मनात नसलं तरी आपण त्यांच्यात एक नातं निर्माण करतो.

आमच्या परिचयातील मुलाची गोष्ट. त्याची एक बालमैत्रीण. दोघेही पाळण्यात असतानापासून एकमेकांच्या सोबत. दोघांमध्ये मैत्रीचे, स्नेहाचे घट्ट बंध. त्यांना काहीही कळत नव्हते, तेव्हाच त्यांच्या नात्यातले, ओळखीचे लोक त्यांची काहीबाही गंमत करायचे. त्या वेळी माझी आई त्यांना टोकायची. ती निरागस, निष्पाप मुलं, त्यांची मनं शुद्ध, निष्कपट असताना आपणच त्यांच्या मनात या भावना पेरतो आणि त्यांची मैत्री नासवून टाकतो. त्यांना अजिबात असं काही चिडवू नका. मोठं झाल्यानंतर त्यांच्या मनात परस्परांबद्दल प्रेम निर्माण झालं तर हेकटपणाने विरोध करणे योग्य नाही, पण असं काही बोलून त्यांचं सुंदर नातं नासवू नका. त्याच्या आईनेही ते समजून घेतले आणि त्याचे तंतोतंत  पालन केले. आता दोघेही पन्नाशीला पोहोचलेत, पण त्यांच्यामध्ये अतिशय छान निकोप मैत्री आहे.

प्रेम प्रत्येक नात्याची नैसर्गिक गरज आहे. ज्या नात्यातलं प्रेम आटलं त्याचं आयुष्य संपलं. मग ते रक्ताचं असो वा मैत्रीचं. आमचा एक दहावीपर्यंतचा मित्र, आता व्हाॅट्सअॅप ग्रुपमुळे एकमेकांशी नव्याने ओळख झाली. एकदा त्याने ग्रुपवर लहानपणी त्याच्या घराजवळ भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या बाईची आठवण सांगितली. ती जे गाणं म्हणत होती, ते अगदी पूर्ण जसंच्या तसं त्याने लिहिलं. ते गाणंही फारसं अर्थपूर्ण नव्हतं. असंच ट ला फ जोडलेलं. पण त्याच्या ते पूर्ण लक्षात होतं. वरून टिप्पणी केली, “फार प्रेमळ होती.” मी आश्चर्याने विचारलं, “कोण? ती भिकारीण?” माझा सूर थोडा चेष्टेचाच होता. त्यावर तो म्हणाला, “इकडेतिकडे कोणी नाही असं बघून हळूच माझ्या गालावरून प्रेमाने हात फिरवायची. तिचा तो खरखरीत स्पर्शही त्या वेळी अगदी नाजूक, प्रेमळ होऊन जायचा.”

माझ्या काळजात चर्र झालं. चेष्टेचा सूर पार मावळला. कारण त्याची आई तो तीन वर्षांचा असतानाच गेलेली. त्या प्रेमाला आसावलेला तो त्या भिकारणीच्या स्पर्शात प्रेम शोधत होता. आणि कदाचित तशाच वात्सल्याला पारखी झालेली ती स्त्रीही त्या लेकराला प्रेम लावून आपली वात्सल्याची भूक भागवत होती. पत्नी, दोन गोंडस मुले असा सुखी संसार असूनही आमचा मित्र त्या भिकारी स्त्रीच्या स्पर्शाने आजही हळवा होतोय. ही प्रेमाची किमया! असं नाही की, प्रेम फक्त लहानपणीच हवं असतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि वयाच्या प्रत्येक वळणावर प्रेम हवं असतं. मृत्युपंथाला लागलेल्या जर्जर झालेल्या व्यक्तीसाठी प्रेम म्हणजे जणू वाळवंटातली हिरवळ. माझ्या नात्यातले एक काकाकाकू वयाच्या मानाने लवकर थकले. खरं म्हणजे मनाने आधी, मग शरीराने. मुलगा व सून नोकरी करणारे. हे दोघेही आर्थिकदृष्ट्या परावलंबी. त्याचं प्रतिबिंब सुनेच्या वागण्यात दिसायचं. स्वाभिमानी काकूंच्या मनाला ते फार लागलं. त्यांनी अंथरूणच धरलं. मी त्यांना बरं नाही म्हणून भेटायला गेले. मला काहीच कल्पना नव्हती. सहज त्यांच्या केसांवरून मायेने हात फिरवत विचारलं, ‘कसं वाटतंय काकू?’ गलितगात्र झालेल्या त्या जिवाचा माझ्या स्पर्शाने बांध फुटला अन् माझा हात धरून त्या ओक्साबोक्शी रडायला लागल्या. प्रेम शब्दांत व्यक्त करणं कठीणच. ती तर हृदयातून स्वयंस्फूर्तीने हळुवार उमललेली भावना. पाऊस पडताच धरतीच्या गर्भातून अलगद कोंब बाहेर यावा, इतकी नैसर्गिक. मग ती व्यक्त करण्यासाठी वर्षातून एखादा ठरावीक दिवस, वेळ, स्थळ कशाला हवं?
असेल जर दोन हृदयांमध्ये प्रेमाची घट्ट वीण
तर खरे प्रेम व्यक्त करायला कशाला हवा प्रेमदिन? 
 
sunitabm225@rediffmail.com 
बातम्या आणखी आहेत...