आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रार्थना हीच माझी शक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान असताना केवळ चित्रपटांमध्ये किंवा टीव्हीवरच पोलिस पाहायचे. अनेक आव्हानांना तोंड देणा-या त्या व्यक्तीचा मनोमन आदरच वाटायचा. असं कधीच वाटलं नव्हतं की, मीदेखील एखाद्या पोलिस अधिका-याची बायको होईन.
माझे पती पोलिस अधिकारी असल्याचा मला निश्चितच अभिमान आहे. घरीच पोलिस; मग भीती कसली, असं अनेकांना वाटत असेल. पण, मलाही भीती वाटते. खूप काळजीही वाटते. ही अनामिक भीती माझ्यासाठीची नसते. सतत गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी झपाटल्यागत काम करणा-या माझ्या पतीच्या प्रकृतीची, त्यांच्या सुरक्षिततेची, एका पोलिस आयुक्तांची मुलं म्हणून बाहेरच्या जगात वावरणा-या माझ्या चिमुकल्यांसाठीची ही भीती असते. भीती म्हणण्यापेक्षा काळजी म्हणणेच योग्य राहील. कधी तरी मनाला हुरहूर लागली की मग दोन मिनिटं प्रभूंसमोर बसून मी प्रार्थना करते, अगदी एका सामान्य गृहिणीप्रमाणेच. एक आई, एक पत्नी तेव्हा देवाकडे एकच मागणं मागत असते; माझ्या पतीला, माझ्या मुलांना सुखरूप ठेव.
कधीकधी एकटेपणा जाणवतो. चारचौघांमध्येही आपण एकटे असल्याचा भास होतो. पण, मग मनाला सावरावं लागतं. पत्नी आणि आईच्या भूमिकेतून किंचित बाहेर पडत एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आपला पती आहे, याचं भान जपावं लागतं. कामाचा व्याप प्रत्येकालाच असतो, जगाचा तो अघोषित नियमच बनत चालला आहे. सुरेश नेहमीच कामात व्यस्त असतात. कुणी दु:खी आहे, कुणावर अन्याय होतोय हे त्यांना पाहावत नाही. जबाबदारीचे पद असल्याने शिस्त आणि काटेकोरपणा त्यांच्या स्वभावातच भिनला आहे. हे सारं जसं त्यांना जपावं लागतं, अगदी तसंच मीही जपण्याचा प्रयत्न करते. मला वाटते, पत्नी कुटुंबाचा आधारस्तंभ असते. ज्याप्रमाणे घराचे बांधकाम करताना त्याचे पिलर बळकट असतील, तरच ते घर भक्कमपणे उभे असते. त्याचप्रमाणे जर कुटुंबातील स्त्री किंवा पत्नी पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभी असेल, तर कुटुंबातही उत्साह आणि आनंद कायम राहतो. मी हे माझे कर्तव्यच समजते.
सुरेश एक वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याने ते कुटुंबाला फारसा वेळ देऊ शकत नाहीत. पण एक पती, एक वडील या नात्याने मला त्यांचा अभिमान आहे. घरी जेव्हा केव्हा त्यांना वेळ मिळेल, तेव्हा ते घरात, मुलांमध्ये पूर्णपणे गुंतलेले असतात. आपले वडील आपल्याला का वेळ देत नाहीत, इतर मुलांच्या वडिलांप्रमाणे ते आमच्या शाळेतल्या स्नेहसंमेलनाला का येत नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न मुलांना छळत असतात. मग मुलांनाही कधी कधी समजवावे लागते. तेव्हा मलाच आई आणि वडील या दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात. एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी सुरेश गेले, की मला धडकी भरते. भीती वाटते. पण त्यांच्यावरील विश्वासामुळे ही भीती आणि धास्ती क्षणात नाहीशीही होते. आपणच खचून गेलो, तर त्यांना आधार कोण देणार, या विचाराने मी स्वत:च अधिक खंबीर होण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आमचे लग्न जुळले, तेव्हा पती पोलिस अधिकारी असल्याने सुरुवातीला असुरक्षिततेची भावना मनात निर्माण झाली होती. माझ्यापेक्षा माझे
पालकच याबाबत खूप काळजीत होते. परंतु सुरेश यांच्यात दडलेला चांगला माणूस त्यांनी पाहिला आणि लग्नाला चटकन होकारही दिला.
एक पत्नी, एक आई म्हणून अनेक आघाड्यांवर काम करताना माझी मुळीच दमछाक होत नाही. आमचा एक मुलगा सतत आजारी असतो. त्याचा २४ तास सांभाळ करावा लागतो. अशा वेळी दुसरा मुलगा आणि सुरेश यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा विचार येतो. मनात विचारांचे काहूर माजले, तरी त्यावर प्रेमाची फुंकर मारत मला देव सतत शक्ती देतो. आलेल्या प्रत्येक प्रसंगाशी दोन हात करण्याचे बळ देतो. आमचे दोघांचेही नातेवाईक, आप्तेष्ट हजारो किलोमीटर दूर राहतात. अशा वेळी आमची दोन मुलं आणि आम्हीच एकमेकांचे आधार बनतो. जवळचे मित्र-मैत्रिणी वेळप्रसंगी धावून येतात. सुरेश यांची ज्या शहरात बदली होते, त्या प्रत्येक शहरात मी इतर पोलिस अधिका-यांच्या पत्नीसोबत एक फ्रेंड्स‌ ग्रुप तयार करते. तसा तो अमरावतीतही आहे.
सुरेश यांना बाहेरचे किंवा हॉटेलमधील जेवण आवडत नाही. त्यांना दाक्षिणात्य पदार्थ आवडतात. त्यातही ते मी केलेले असतील, तर ते खूप आवडीने खातात व तितक्याच उत्स्फूर्तपणे त्याला दादही देतात. मला माझ्या कामाची पावती मिळते. मनावर आलेली मरगळ दूर होते. पुन्हा नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते.
सुरेश यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर ते खूप मनमिळाऊ आणि दुस-यांना मदत करणारे आहेत. कामाचा कितीही ताण वाढला, कितीही दडपण आले तरी ते घरी त्याची जाणीवही होऊ देत नाहीत. घरी आले, की ते एक पती आणि वडिलांच्या भूमिकेत वावरत असल्याने कुटुंबात त्यांची हजेरी म्हणजे आम्हाला मिळालेली पार्टीच असते.
आम्हाला राहुल (१५ वर्षे) आणि रोहन (१० वर्षे) ही दोन मुले आहेत. राहुल आजारी आहे. तो अनेकदा रात्रभर जागतो. रात्री त्याच्या जवळच बसून राहावे लागते. रोहनची शाळा सकाळची असते. अशा वेळी रोहनची तयारी, त्याला शाळेसाठी तयार करण्याचे काम सुरेश आवडीने करतात. कधी कधी तर ते त्याला डबाही तयार करून देतात. त्याला जो पदार्थ डब्यात हवा असेल, तो तयार करून देतात. सुरेश यांना बागकामाची खूप आवड आहे. मुलं शाळेत गेल्यावर ते घरातील बागेत आपला वेळ घालवणे पसंत करतात. हे सारं पाहिलं, की आपलं दु:ख आपोआपच सुखापुढे ठेंगणं वाटायला लागतं. सारं दडपण, ताण कधी दूर पळाला, हे समजतही नाही.
(शब्दांकन : अनुप गाडगे, ‌अमरावती)