आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunita Nimase Article About Women Self Help Group, Divya Marathi

मिळून सार्‍याजणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांत बचत गटांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना, सवलती मंजूर झाल्या. तेव्हापासून बचत गट ही संकल्पना देशात मोठ्या प्रमाणावर मूळ धरू लागली आहे. या बचत गटांसाठी काम करणार्‍या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, बँका पुढे येऊन वेगवेगळ्या मार्गांनी या बचत गटांना सहकार्‍याचा हात पुढे करू लागल्या. त्यानंतर खर्‍या अर्थाने ज्यांचा कुठल्याही उद्योगाशी, आर्थिक व्यवहाराशी, बँकांशी कधी संबंधही आला नव्हता, ज्यांनी कधी घराचा उंबराही ओलांडला नव्हता, किंवा मनात खूप इच्छा असूनही ती साधी व्यक्त करण्याचे धाडस, आत्मविश्वास त्यांच्यात नव्हता, अशा सर्वसामान्य महिला या बचत गटांच्या चळवळीत सहभागी झाल्या. मोठ्या आत्मविश्वासाने देशाच्या अर्थकारणात त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला.

हा प्रवास तसा मोठा होता, अवघडही होता. समाजव्यवस्थेशी निगडित बदल घडवणारी ती एक क्रांती होती. तळागाळापर्यंत ती योजना पोहोचवून आकार घेणारी ही चळवळ शासन, बँका, निरनिराळ्या संस्था यांच्या सहकार्याने मोठी होत गेली. हक्कांसाठी, प्रसंगी, संघर्षालाही सामोरे जावे लागले.

बचत गटांची बांधणी, त्यांना बँकेशी जोडणे, व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित करणे, बँकांकडून व्यवसाय कर्ज घेऊन व्यवसाय उभा करणे, मालाचे मार्केटिंग करणे ही सर्व प्रक्रिया चर्चा करण्यापुरती किंवा एक चर्चेचा विषय म्हणून चांगली वाटते. पण ती अमलात आणणे ही तितकी सोपी बाब नाही. त्यासाठी बचत गटाची बांधणी अतिशय चांगली असावी लागते, सर्व सदस्यांचा एकमेकींवरचा विश्वास, काम करण्याची तळमळ, शिस्त यातूनच बचत गट व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. बँकांशी असलेले त्याचे व्यवहार, शिस्त, संपर्क यावर बँकेचा विश्वास संपादन केला, तर नक्कीच बँकेचे सहकार्य मिळते. वेगवेगळ्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण व व्यवसायास आवश्यक माहिती मिळते. त्यात केंद्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग मंडळाकडून वेगवेगळ्या व्यवसायांचे प्रशिक्षणही मोफत मिळते.

व्यवसायास आवश्यक असलेला प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्याकडूनच काढून मिळतो. शिवाय व्यवसायासाठी मिळणार्‍या कर्जावर अनुदानही मिळते. त्याचप्रमाणे सुवर्णजयंती, शहरी व ग्रामीण योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड, शासकीय तंत्रनिकेतन अशा अनेक संस्थांकडून महिलांना शासकीय योजनांचा फायदा मिळू शकतो. अनेक बचत गटांनी या योजनांचा फायदा घेऊन व्यवसाय उभे केले आहेत. प्रशिक्षण कार्यक्रमात तर आम्ही अगदी वेगळा विचार करून रिक्षा ड्रायव्हिंग प्रशिक्षण महिलांच्या एका गटाला दिले.
काहींनी केटरिंगसारखे व्यवसाय निवडले. दिवाळीचे फराळ, द्रोण तयार करणे, पापड-कुरडया, पर्स, पिशव्या तयार करणे, ब्यूटी पार्लर, टेलरिंग असे पारंपरिक व्यवसाय करणार्‍या हजारो महिला आज आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार झाल्या आहेत. कित्येक कुटुंबं महिलांच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. मुलांना शिक्षण देण्याबरोबरच घरातली आजारपणं, लग्न यांसारख्या खर्चाला महिलांचा हातभार लागतो.

हे सर्व करत असताना बचत गटांच्या बँकांमध्ये आम्ही फक्त व्यवसाय, कर्ज यापुरती चर्चा मर्यादित न ठेवता या महिलांमध्ये स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची जाणीव, जागृती झाली पाहिजे हे बघतो. वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक तपासण्या, तसेच योग्य आहाराचे महत्त्वही महिलांना त्यामुळे वाटायला लागले आहे. याबरोबरच गटचर्चांच्या आणि वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून स्वसंरक्षणावर प्रामुख्याने भर दिला जातो. आपल्या गावात, परिसरात कोणावर अन्याय होत असेल, तर त्याविरुद्ध सगळ्या जणींनी एकत्र आल्याने लढ्याची ताकद त्यांच्यात निर्माण होत आहे. बचत गटांमुळे महिला संघटित झाल्या आहेत. आणि त्याचा फायदा त्यांना त्यांची राजकीय कारकीर्द घडवताना होतो. या महिला घराबाहेर पडल्यामुळे समाज, राजकारण आणि त्याचे फायदे-तोटे त्यांनाही समजू लागले आहेत. राजकारणातील आरक्षणाचा फायदा या सर्वसामान्य महिलांना मिळू लागला आहे. त्यांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आहे.
(लेखिका महिला बचत गट, यशस्विनी अभियानच्या जिल्हा समन्वयक आहेत.)