आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunita Piprikar Article About Child And Parents Relation

'मैत्री'ची SSC

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली किशोरवयीन मुलं हाताबाहेर जाऊ नये म्हणून पालकांकडून होत असलेला शिस्तीचा भडिमार आणि दुसरीकडे पालकांच्या सूचनांना कंटाळलेली मुलं...
मात्र परस्पर संवादाच्या माध्यमातून ही कोंडी फोडता येऊ शकते. त्यासाठी सर्वच पालकांनी जाणून घ्यावी अशी ही ‘एसएससी’...


मासूम या गाजलेल्या हिंदी सिनेमामध्ये एक प्रसंग आहे. सहलीला आलेल्या आपल्या मुलांना एकत्र खेळताना बघून सईद जाफरी नसीरुद्दीन शाहला म्हणतो, ‘यार, जो मजा अपने बच्चों को जवान होते हुए देखने में आता है वो अपनी खुद की जवानी में भी नहीं आता!’
तेव्हा फारसं महत्त्वाचं न वाटलेलं वाक्य, आज स्त्री जागरण मंचाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यशाळांमधून टीनएजमधली मुले आणि त्यांच्या पालकांना भेटताना सारखं आठवत राहातं. गोंधळलेली मुलं आणि धास्तावलेले पालक बघताना वाटतं, ‘अरे, सांग रे जरा यांनाही, कशी शोधायची ही मजा?’
नववीपर्यंत सारखे रागावणारे ऊठसूट शिक्षा करणारे आमचे सर आम्ही दहावीत गेल्यावर अगदी शांत झाले. प्रत्येक गोष्ट समजावून सांगू लागले. गप्पा मारू लागले. आश्चर्य वाटले. पण विचारणार तरी कोण?
एके दिवशी एका संस्कृत सुभाषिताचा अर्थ सांगताना म्हणाले, ‘मुलाला सोळावं वर्ष लागलं आणि वडिलांची चप्पल मुलाला यायला लागली की तो त्यांचा मित्र झाला! म्हणजे तुम्ही सर्वच आता माझे मित्र झाला आहात. मग आता तुम्हाला माझ्या आयुष्यात बरोबरीचे स्थान आहे. तुमच्या लक्षात आले ना, बघा मी आता तुम्हाला रागावणे बंद केले आहे. कारण मित्राला कसं रागावणार? आजपासून आपली मैत्री! आता आपण मिळून अभ्यास करायचा बरं का!’ शाळा सोडून कित्येक वर्षं झाली पण लक्षात राहिले ते सर आणि त्यांचा तो शब्द ‘मैत्री!’ किशोरवयात एक निराळाच थरार उमटवला होता मनावर त्या शब्दानं!

कवी मंगेश पाडगांवकरांनी वर्णन केल्याप्रमाणे ‘वर्षं सोळा सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात,’ अशी ती अवस्था होती. घरी प्रत्येक गोष्टीत सूचनांचा भडिमार ऐकण्याचा आणि त्यामुळेच मित्रमैत्रिणींचा सहवास अधिक प्रिय आणि आश्वासक वाटण्याचा तो काळ होता. त्यांच्या त्या मैत्री शब्दानं जणू काही एक जादू केली आणि सरांच्या विषयात हायेस्ट मार्क मिळवण्याचा निश्चय पक्का झाला व तडीसही गेला. आज सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात तर मैत्री हे एक चलनी नाणं आहे. आबालवृद्ध सर्वांनाच यानं वेड लावलंय. ऊठसूट येणारे मैत्रीचे संदेश, चित्रपट, गाणी, नित्य बनणारे नवीन ग्रुप, गळ्यात गळे घालून काढलेले फोटो यामुळे सर्वत्र मैत्रीचे उमाळे दाटले आहेत. फक्त कमी आहे ती आश्वासकतेची!
पूर्वी पालक आणि मुल यांच्यात एक विशिष्ट अंतर होतं. पालक हे आयुष्यभर पालकच असायचे. मुलांना उपदेश करणे हे एकमेव संवादाचे उदाहरण. अर्थातच हा संवाद एकतर्फी असणे गृहीतच होते. त्याही काळी ‘ऐकावे पालकांचे करावे मनाचे’ अशी आज्ञाधारक (?) मुलं होतीच.
आज परिस्थिती खूपच बदलली आहे. स्वतःची चड्डीही न सावरता येणाऱ्या मुलाचं मत घेणं पालकांना महत्त्वाचं वाटतं. किंबहुना आतापासून त्याला किती ठाम मत आहे याचं कौतुकही असतं. त्यामुळे जन्मल्यापासूनच आमचं कसं मैत्रीचं नातं आहे, आम्ही कसं सगळ्या विषयांवर मोकळेपणाने बोलतो याचाही अभिमान जाणवतो. अशा मोकळ्या वातावरणात वाढलेली मुलं आमच्या शिबिरात येतात तेव्हा कमालीची गोंधळलेली असतात. कारण लहानपणापासून फ्रीडम देणारे आईबाबा अचानक पारंपरिक भूमिकेत जातात ते त्यांना अनाकलनीय वाटतं.
आता हेच बघा आपले काही मित्रमैत्रिणी गप्पा मारतायत. ऐकू या का?
रितू : काय रे प्रतीक, आज एकदम फ्लॉप मूडमध्ये?
प्रतीक : वैतागलोय मी या सूचनांच्या स्टेनगनला. गाडी हळू चालव. घरी लवकर ये. व्यायाम करायला पाहिजे. रात्री जागरण नको. खोली आवरा.चारचौघात नीट वागा जरा. उगाचच पोक काढू नको. कशाला हवेत महागडे मोबाइल?
रितू : अरे तुम्हा मुलांचं तरी एवढ्यावर भागतं. आमचं तर ऐक.असले कपडे घालू नको. असली फॅशन नको. केस मोकळे सोडू नको. कुणाचा फोन होता? सारखं मोबाइलवर काय बोलायचं असतं एवढं?
हे आपले तरुण मित्र कंटाळले आहेत खरंच! आईबाबांची अचानक बदललेली भूमिका लक्षातच येत नाहीये.
आता दुसरी बाजू बघू या.
रितूची आई : आजूबाजूला इतक्या विचित्र घटना घडतात. काळजी वाटत राहाते सारखी. म्हणून जरा काही सूचना करायला गेले तर केवढा फणकारा आला तिला! आपल्या वेळी केवढी बंधनं! मान वर करून विचारायची काही हिंमत नव्हती आमच्यात. आजकालच्या मुलींना मोकळीक दिली तरी काही म्हणून ऐकून घेत नाही. सारखी वादावादी!
प्रतीकची आई : त्यांचा अभ्यास, खाणंपिणं, आवडीनिवडी व्यवस्थित सांभाळून वर मूडही संभाळा. वैताग आलाय मला. थोरामोठ्यांचा आदर राहिला नाही. धाक वाटत नाही. आजकालच्या मुलांना आईवडिलांचे लाड हवे फक्त. त्यांचं ऐकून घ्यायला नको काही.
ओळखीची वाटतात ना ही पात्रं! आपणच आहोत हे सगळे. रणांगणावर उभ्या असलेल्या या दोन पक्षात समन्वय साधण्याचं खूपच महत्त्वाचं आणि अवघड काम कार्यशाळेत होतं. खरंच समजूतदार असतातच ही मुलं. हुशार, गोड आणि प्रामाणिकही. पौगंडावस्थेवरल्या अवघड वळणवाटांनी थोडीशी बावरलेली. जाताना हात हातात घेऊन थँकयू म्हणताना हळूच हे सगळं आमच्या आईबाबांनाही सांगा हे सर्व, असंही सुचवून जाणारी.

आज आमच्या या मुलांच्या पालकांना आपल्या मुलांशी असलेल मैत्रीचं नातं तोडू नका, हे आवर्जून सांगावंसं वाटतं. यासाठी लक्षात ठेवूया ही मैत्रीची SSC.
S - space
म्हणजे अवकाश. थोडंसं स्वातंत्र्य.
त्यांनी त्यांच्या खोलीत हवा तसा पसारा करण्याचं, अंघोळीची वेळ ठरवण्याचं स्वातंत्र्य. मर्यादित स्वरूपात कपडे, फॅशनचं स्वातंत्र्य. त्यांचे बदलते मूड्स त्यांनाच सांभाळू देण्याचा अवकाश. अवाजवी कौतुक किंवा येताजाता खडूस ताशेरे झोडणे टाळणं, चौकशी आयोगावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण. सूचनांची स्टेनगन कपाटात. मुलांच्या बंडखोर बेशिस्त वर्तनाला सहन करणे, स्वीकार करणे. पण कधीही मान्यता न देणं, हा एक उपाय होऊ शकतो.
S - support
म्हणजे आधार.
एखाद्या व्यक्तीचा आधार मला तेव्हाच घ्यावासा वाटतो जेव्हा ती व्यक्ती मला बरोबरीचे स्थान देते. सन्मानपूर्वक आपले मानते. माझ्याशी समजुतीने बोलते. मला कधीही आज्ञा करत नाही. तू बरोबर वागलास तरी आणि चुकलास, अपयशी झालास/झालीस तरीही मी तुझ्या मागे सदैव उभा/उभी असेन, हा विश्वास देते. गुणदोषासहित आपले मानते. लोक काय म्हणतील यापेक्षाही तू मला अधिक महत्त्वाचा/ची आहेस, हे दाखवून देते आणि विनाअट प्रेम करते.
C - concern
म्हणजे काळजी.
काळजी म्हणजे अविश्वास नाही, काळजी म्हणजे माझं मूल मी समजून घेईन. त्याचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे हे जाणून घेईन. त्याची अन्य कोणाशी तुलना करून त्याचा अपमान करणार नाही. किशोरवयात होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक बदल समजून घेण्याचे प्रयत्न करीन. त्याची निर्णयक्षमता भक्कम होण्यासाठी आधार देईन. त्याला स्वतःची शक्तिस्थळं आणि कमकुवत बाजू कळाव्या यासाठी प्रयत्न करीन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी अपुरी स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा मुलावर कधीही लादणार नाही.

आपल्या आणि मुलांच्या नात्यातला विश्वास कसोटीला लावणारी ही पौगंडावस्था! सभोवतालच्या वातावरणाचा धसका न घेता अर्थपूर्ण संवादातून ही एसएससी विशेष गुणवत्तेसह पास करूया. कारण जन्मदाते हेच खरे मित्र मुलांचे... जन्मभराचे!

लेखिका या औरंगाबाद मधील स्त्री जागरण मंच सदस्य आहेत.

sunita.pimprikar@gmail.com