आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या घुसमटीचा रंग लाल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नातेसंबंधांचा पोत, नातेसंबंधांची वैशिष्ट्यं, त्यातले गुंते आणि ताण-तणाव परिस्थितीनुसार बदलत जातात.म्हणजे शांत, सुस्थितीतल्या समाजात आकारास येणाऱ्या चौकटीबाहेरच्या नात्यांना जितक्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यापेक्षा कैकपटीने मोठे आव्हान संघर्षभूमीत आकारास येणाऱ्या नात्यांना, त्या नाते सांभाळणाऱ्या स्त्री-पुरुषांना पेलावे लागते. त्यातल्या नक्षलवादी चळवळीत आपखुशीने वा परिस्थितीवश सामील स्त्री-पुरुषांमधल्या आकारास येत जाणाऱ्या नातेसंबंधांचा हा चित्तवेधक आलेख...
पाठीवर जवळपास १५ ते २० किलोचं ओझं, साथीला २५, कधी आठ, कधी १२ जणांची टोळी. राहुटीचा ठिकाणा नाही. दररोजची किर्रर्र जंगलातील ३५-४० किलोमीटरची पायपीट. ऊन, वारा, पावसात भिजलेली त्यांची जिंदगानी आणि त्यावर आदिम प्रेरणांचा दबाव. या दबावातून निर्माण होणारं कुतूहल. पुरुषपणाचं, स्त्री-पुरुष संबंधांचं. वास्तवाच्या धगीत तावूनसुलाखून निघणारं...

पावसाळ्यात अंकुर फुटण्याच्या दिवसांत सारी सृष्टी मिलनोत्सुक असते. खरं तर आपला अंश टिकवण्यासाठी सृष्टीने दिलेल्या प्रेमाच्या भुलीत भुलण्याचे दिवस हे. या दिवसांत जमिनीचा एखाद उदास तुकडाही फुलतो, बहरतो; मग मानवी मन रूपी जमिनीचे काय…? शेवटी मातीच ती. फळायला, बहरायला अासुसलेली… तत्त्व, निष्ठा, विचार यांच्याशी बांधलं गेलं, तरीही शरीर-मनाच्या या नैसर्गिक मागण्यांशीही इमान राखावंच लागतं. मग त्यासाठी जुलूम, जोर, जबरदस्ती सोसायची तयारी असते...

पावसाळ्यात जंगलात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचा प्रवास दुरपास्त. जंगलातील दाटी, चिखल, रोगराईची भीती यामुळे हे ‘वर्षावासी’ होण्याचे दिवस. गौतम बुद्ध आणि त्यांचे सहकारी या काळात ‘वर्षावास’ घेत असत. वर्षावास म्हणजे, पावसाळ्यात भिक्खु एका ठिकाणी निवास करत. जीवन जगण्याचा सदुपदेश आणि आचारविचारांची शिकवण देत.

अशा या वर्षावास काळात वर्षावासाची संधी साधून सर्व ‘दलम’चे एकत्रित ट्रेनिंग कॅम्प घेतले जातात. यात बाहेरून एखाद्या मोठ्या लिडरला बोलावले जाते. सोबतच काही सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असते. खाण्यापिण्याची रेलचेल असते. बऱ्यापैकी विश्रांतीचा, मौजमजेचा हा काळ असतो. इथे खऱ्या अर्थाने स्वत:चे स्वत:जवळ असणे अनुभवले जाते. या अनुभवात बहुतांशदा आपल्या सोबत असणाऱ्याला वा असणारीला हाक दिली जाते. दोन मनांच्या, दोन शरीरांच्या संवादाची ती सुरुवात असते…

या पडावात ब्रिटिशांच्या विरोधात आदिवासींनी जो उद्रेक घडवून आणला, त्याची आठवण म्हणून ‘भूमकाल आठवडा’ साजरा केला जातो. यातील एक प्रमुख दिवस ‘भूमकाल दिवस’ असतो. हा दिवस चळवळीतल्यांसाठी क्रांतीचा राष्ट्रीय सणच जणू; मग त्यासाठी नाच-गाणे, अंगार, शृंगार सारेच सभोवताल घडत असते...

खरं तर तात्पुरत्या जगण्याच्या त्यांच्या या जीवनपद्धतीत प्रेमाची शक्यता कमीच असते. कारण प्रेम म्हणजे ध्येयाशी इमान न राखणे, प्रेम म्हणजे बहिष्कृत होणे, प्रेम म्हणजे ‘दलम’मधून बाहेर पडणे, प्रेम म्हणजे डिमोशन, प्रेम म्हणजे प्रेमापासून दूरवरच्या नाहीशा करणाऱ्या प्रवासाला लागणे…

अशा परिस्थितीत शक्यतोवर, सारे प्रेमापासून दूर राहण्यातच भलाई मानणारे. कुठे तर प्रेम होऊ नये, अशी प्रार्थनाही… जयू करायची तशी. जयू माझी मैत्रीण. दिसायला सुंदर. स्वभावाला घाबरीघुबरी. वडिलांचा प्रचंड धाक. इतका की, वयात आल्यावर तिच्या सुकुमार तारुण्याची साद वडिलांच्या धाकापायी तिने दडपून दडपून टाकली. पण, जेव्हा तिचं मन तिच्या विरोधात बंड करायला लागलं, तेव्हा ती अक्षरश: प्रार्थना करायला लागली की, देवा मला प्रेमबिम असं काही होऊ देऊ नको रे… नकोसच होऊ देऊ. जणू काही प्रेम जीवघेणा आजार आहे...

आपल्या वडिलांची इज्जत-अब्रू आपल्या हातात आहे. आपल्या वडिलांचा आपल्यावर विश्वास आहे आणि त्यासाठी म्हणून कित्येकदा थरथरत्या हातांनी आपलं काळीज कापत, ती तिची श्रद्धा असलेल्या देवासमोर नतमस्तक होताना पाहिलंय मी. प्रेमाचा इतका हा आतंक असतो या आतंकीत दुनियेत...

…पण इथेही या उपर बचावाचे तीन शिल्लक मार्ग असतातच. प्रेमाच्या भानगडीत पडू नये, यासाठी मनाची मनाला प्रार्थना. अगदीच नाइलाज झाला, तर आपल्या प्रमुखाला सांगून, दयेपोटी एकत्र राहूच दिले तर… पण प्रेम करणाऱ्यांना एकत्र ठेवणं, ही पॉलिसी नसल्याने पर्याय संपतात. शेवटचं उरतं, ते केवळ आपल्या हव्याशा माणसासोबत पळून जाणं. सर्व सीमारेषेपार… पण पळून जाऊनही रीतीभातींनुसार संसार वाट्याला येईलच, असे नाही. वाट्याला येते, ती नुसती भावनिक कुतरओढ आणि एकमेकांसोबतची फरफट. स्वीकारलेली म्हणून निभावण्यासाठी ओढत असल्यासारखी... नुसतीच ओढतोड...

इथे स्त्री-पुरुष संबंधांबाबतल्या शरीर भुकेला मान देणारी तत्त्वप्रणाली राबवली जाते. तिला आपसी-सलोख्याने न्यायही दिला जातो. पण त्यात प्रेम, लग्न, मुलं असा सांसारिक पसारा नसतो. गरजेसाठी, गरजेपोटी एकमेकांचा संग सोबत बस! संबंधाआधी, संबंधानंतर कुठलीही भावनिक गुंतवणूक नाही. भावनिक गुंतवणुकीसाठी त्यांना त्यांची चळवळ, त्यांचे मिशन. त्यासाठी ते यंत्रासारखे सदा कार्यरत.

याचसाठी सारे सांसारिक पाश कापूनच ‘दलम’मध्ये प्रवेश दिला जातो. पहिली अटच ही की, त्याने आपली नसबंदी करून घेणे. नसबंदी केल्यानंतरच त्यांचा रीतसर ‘दलम’मध्ये स्वीकार होतो. आता या नसबंदीला कधी गावातून डॉक्टर नेले जातात. काही तर डॉक्टरांच्या मदतीविना स्वत:च स्वत:ची नसबंदी करून घेतात. काही पुढे दीर्घकाळ त्याचे बरेवाईट परिणाम भोगत अायुष्य ढकलतात...

दुर्गेश मट्टामी. पंधरा वर्षांचा नुकताचवयात आलेला हा युवा. या वयात आपल्या सभोवतालचे आकर्षण जबरदस्त असते, कुटुंबातले ज्येष्ठ वयात आलेल्यांना विशेष जपतात ते याचसाठी. बांधावरून सुटलेल्या पाण्यासारखा फोर्स असतो, विचारात. त्याला विशिष्ट दिशा नाही लाभली, तर तो सैरभैर सुटलेल्या पाण्यासारखा बेजबाबदारपणे वावर आणि माणसाचं नुकसान करीत सुटतो. हे जसे आपण पाहणारे जाणून असतो, तसे या वयातील मुलांना हेरणारेही जाणून असतात...
कुटुंबातील भावनिक सुरक्षितता, आर्थिक सुरक्षितता जगण्याला बळ देते. कुटुंबाशी बांधून ठेवते. जबाबदारीचे भान देते. फार बेफिकीर, बेमुर्वत, बेजबाबदार राहू देत नाही. लगेच कानपिचक्या देत सरळ मार्गावर आणते. हे सारं फार प्रेमापोटी आणि हवंहवंसं. पण प्रत्येकाच्या आयुष्याला ही चंदेरी किनार लाभेलच, असे नाही. बहुतांश मुलं ही यापासून वंचित असतात. दुर्गेश मट्टामी हा असाच वंचितांच्या प्रदेशातील एक राहगीर. गर्देवाडा या नक्षलप्रभावित क्षेत्रातील मुरेवाडा या गावात राहणारा. दुर्गेशला अगदीच लहान असल्यापासून आपल्या सभोवती दिसलेत, ते केवळ बंदुकधारी. त्यांचा वर्दीतला धाक. त्यांचे गाणे. हे सारं कळत नकळत त्याच्या मनावर कोरलं गेलं. तसतसा, तो त्या ओढीने स्वत:ला तयार करीत गेला. मातीला स्वत:च आकार देत गेला.
नक्षल प्रभावित क्षेत्रातील जवळपास सगळ्याच कुटुंबात सुशिक्षितता नसल्याने, सामाजिक-सांस्कृतिक भान नसल्याने बहुतांश मुलं ही या बंदुकीच्या सावलीत वाढतात. त्यामुळे बंदुकीचं जबरदस्त आकर्षण असतं त्यांना. वर्दीही हवी असते. सत्ता, शक्ती दोन्हीसाठी काहीही करायची मानसिकता बनलेली असते.

याच मानसिकतेत वाढलेला दुर्गेश वयाच्या १५व्या वर्षी २००१ला ‘तुकडी-चार’मध्ये सामील होतो. सामील होताना तिथल्या अटीनुसार अगदी घाईनेच कुठलाही पुढचा विचार न करता आपले नसबंदीचे ऑपरेशन करून घेतो. वर्दी, बंदूक, गाणं या धुंदीत रक्ताची हौस भागवतो. ही हौस, त्याला तीन वर्षांतच ‘दलम’च्या कमांडर पदापर्यंत नेऊन पोहोचवते…

पण, जेव्हा कधी तो थांबतो, तेव्हा एकच प्रश्न तो सतत विचारत राहतो की, आपल्याला खरचं हेच स्थैर्य हवं होतं का?? अभुजमाड या सौंदर्याने नटलेल्या पर्वतरांगेतील सगणी. अगदी याच कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीत वाढलेली कोवळ्या वयातील पोर. पण परिस्थितीच्या विवंचनांना कंटाळलेली. आणि त्या उत्तराच्या शोधात आपलं घर, आपली माणसं यांना सोडून दुर्गेशच्या दलममध्ये २००३ला सामील झाली. दोघांमध्ये पाच वर्षांचं अंतर. कोवळ्या वयातील पोरकेपण काय असतं, हे अनुभवलेला दुर्गेश अगदी सुरुवातीपासून तिला जपायचा. सगणीला जपताना तो कधी तिच्यात गुंतत गेला, त्याला कळले नाही. इथे हे गुंतणे केवळ शरीराचे नव्हते, त्यांची मनेही गुंतली होती. आता त्यांना एकमेकांसोबत राहायचं होतं, सर्वसामान्यांसारखा संसार करायचा होता. मुलं(?) जन्माला घालायची होती… पण या सगळ्याला व्यवस्थेचा विरोध होता. शेवटी सारा रोष पत्करून, ‘चलो दिल की दुनिया कहीं और बसाएंगे’ म्हणत, दुर्गेश सगणीला घेऊन त्यांच्या सर्व सीमा पार करत निघून जातो …कायमचा!

अंगाराच्या फुलांची ही दास्तान. कादिरही तसाच त्यांच्यातला एक. त्याच वयातला. विशेष म्हणजे, कादिर उत्कृष्ट नेमबाज. तेव्हा नेमबाजीत त्याच्या हात पकडणारा बस्तर भागात दुसरा कुणी नाही. बस्तर छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित इलाका. इथलीही सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती नक्षलप्रभावित. पण कादिर परिस्थितीला स्वीकारून होता. फार परिस्थितीविरोधी भूमिकेच्या समर्थनार्थ नव्हता तो. पण मग म्हणूनही हेरला गेला होता बहुतेक…गावातल्या या भागात नक्षलवाद्यांकडून आपल्या चळवळीकडे, आपल्या मिशनकडे आकर्षित करण्यासाठी मनोरंजनाच्या काही तुकड्या पाडलेल्या असतात. तुकड्यांमध्ये प्रत्येक ‘दलम’चे कार्यकर्ते असतात. नाच-गाण्याची आवड असणाऱ्यांना, दिसायला सुंदर असणाऱ्यांना यात विशेष प्राधान्य दिले जाते. चेतना नाट्यमंडळ असेच एका तुकडीचे नाव. नाच-गाण्याच्या या तुकडीत कौसी ही ‘नर्मदा दलम’मध्ये काम करणारी सुंदर युवती. तिचे कामच आपल्या सौंदर्याने इतरांना आकर्षित करणे हे होते. आकर्षित झालेल्यांना पुढे ‘दलम’मध्ये सोयीस्कररीत्या ढकलणे सोपे जाते, हा उद्देश. कादिर उत्कॄष्ट नेमबाज आहे, हे त्यांना माहीत होतं आणि यासाठी तिने कादिरला हेरलं होतं...

गावात दुसरी मनोरंजनाची साधनं नाहीत. जी काही आहेत, ती स्वनिर्मित. पण आताशा नाट्यमंडळी गावा-गावांत जाऊन लोकांचं मनोरंजन करतात. यात एक उद्देश हाही की, आम्ही तुमच्यासाठी आहोत. तुमच्या संरक्षणार्थ, तुमच्या अधिकारांसाठी लढणारे आहोत. दुसरा उद्देश हाही की, हे सारे आमच्या समवेत आहेत बघा, तुम्हीही या!

चेतना नाट्य मंडळीतील कौसी कादिरला लुभवायची फार. तिचे असे सततचे लुभावणे त्यालाही आवडून जायचे. अगदी सुरुवातीला त्याच्या जिवाला सवय जडेपर्यंतचे तिचे साखर प्रयत्न त्याच्या जिवाला भूल पाडून गेले. तो अखेर आपण कौसीशिवाय राहू शकत नाही, पर्यंत पोहोचला. त्यालाही कळत होतं, तिचा स्वीकार म्हणजे तिच्या सोबत येणाऱ्या बंदुकीचाही स्वीकार. इथे कादिरने आपल्या मनाचा पराभव स्वीकारत कौसीसाठी सहर्ष बंदुकीचा स्वीकार केला… एक निर्भीड आकर्षण, या निर्भीड अरण्यात घेऊन जाणारे. जिथे जाण्याचा मार्ग तर आहे, पण परतीचे सारे दरवाजे बंद... कादिरने आपल्या प्रेमासाठी, या धगीत उडी घेतली. धगीतल्या या संबंधाचे हे वास्तव, वेड्या वयाचा वेडा ध्यास तो… बहुतांश वेळा याच वयात पकडले जातात, हे सारे. याच वयात बळी पडतात. बळी प्रेमासाठी, बळी पैशांसाठी, बळी वर्दीसाठी, बळी बंदुकीच्या ताकदीसाठी, बळी सत्तेसाठी...

विचारांचा झंझावात हा असा, जो घेऊन जातो तिथपर्यंत, जिथे बंदुकीच्या नळीतून इथे सत्तासंघर्ष नसल्याचे दाखवले जाते… खरंय???

commonwomen@gmail.com
(प्रसिद्ध कवयित्री, स्त्रीवादी लेखिका, कार्यकर्त्या, मुक्त पत्रकार)
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटो...