Home »Magazine »Madhurima» Supt Vajrasan

ओटीपोटावरील चरबी कमी करण्यासाठी - सुप्त वज्रासन

मधुमती निमकर, मुंबई | Jan 06, 2012, 06:20 AM IST

या आसनामध्ये वज्रासनातील पायांची स्थिती तशीच ठेवून पाठ जमिनीवर टेकवून, पाठीवर झोपल्याप्रमाणे शरीरस्थिती धारण करावी लागते, म्हणजेच वज्रासनात पाठीवर झोपावे लागते. म्हणूनच या आसनाला ‘सुप्त वज्रासन’ (झोपलेल्या स्थितीतील वज्रासन) म्हणतात.
सावधानता : तीव्र पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, ताठर घोटे व गुडघे तसेच तीव्र पोटदुखी, हायड्रोसिल, हर्निया इ. विकार असल्यास हे आसन करणे टाळावे.
* पूर्वस्थिती : वज्रासनात बसावे.
 कृती :
* मांडीवरील हात एकेक करून काढावा व पावलांच्या मागे, बोटे पावलांच्या दिशेकडे करून, दोन्ही तळहात जमिनीवर ठेवावेत.
* हात जमिनीवर ठेवताना कमरेपासून मस्तकापर्यंतचे शरीर मागच्या बाजूस न्यावे. हळूहळू दोन्ही कोपरे जमिनीवर टेकवावेत. नंतर मान व गळा यांचे स्नायू ढिले करून डोके जमिनीच्या दिशेने न्यावे व झोपल्याप्रमाणे जमिनीवर टेकवावेत व हात शरीराच्या दोन्ही बाजूस जमिनीवर ठेवावेत.
* यानंतर उजव्या हाताचा तळवा डाव्या खांद्याखाली व डाव्या हाताचा तळवा उजव्या खांद्याखाली अशा रीतीने ठेवावा की हातांच्या घडीचा उशीप्रमाणे उपयोग करून डोक्याचा मागील भाग त्यावर अलगद ठेवावा व झोपल्याप्रमाणे शांत पडावे. हीच सुप्त वज्रासनाची अंतिम स्थिती होय.
* याच स्थितीमध्ये डोळे मिटून लक्ष श्वासावर केंद्रित करावे.
* श्वासस्थिती : नेहमीप्रमाणे श्वासोच्छ्वास चालू ठेवावा. पोट व छाती यांच्यावर आलेल्या ताणामुळे सुरुवातीला श्वसनक्रिया चालू ठेवणे कठीण जाते. तरीही जाणीवपूर्वक श्वास चालू ठेवावा.
* आवर्तने : सुरुवातीला 3 ते 5 श्वासांपर्यंत अंतिम स्थिती राखून 3 वेळा आसन करावे. चांगला सराव झाल्यानंतर हे आसन दीर्घकाळही ठेवता येते.
* आसन सोडताना : ज्या क्रमाने आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये पोहोचलो त्याच्या उलट्या क्रमाने हळूहळू पूर्वस्थितीत यावे.
या आसनाने होणारे लाभ :
*  पोटाच्या आवरणातील स्नायू पूर्णपणे ताणले गेल्यामुळे पोटाचे आवरण लवचीक बनते.
*  जठर, लहान व मोठे आतडे, यकृत, प्लीहा, पित्ताशय इ. महत्त्वाच्या अवयवांच्या ठिकाणचा अनावश्यक रक्तसंचय कमी होतो व त्यांची कार्यक्षमता वाढते.
*  ओटीपोटावरील चरबी कमी होते. अपचन, मलावरोध, गॅसेस, आम्लता, पोटास तडस लागणे इ. त्रासांमध्ये याचा उपचार म्हणून उपयोग होतो.
*  गुडघे धरणे, संधिवात इ. प्रौढ वयात सुरू होणा-या तक्रारींना प्रतिबंधक म्हणून याचा अभ्यास उपयोगी पडतो.
*  श्वसनक्षमता वाढते. दमा, लघुश्वास इ. श्वासदोषांमध्ये उपचार म्हणूनही हे आसन लाभदायक ठरते.
*  पश्चिमतानासनात शरीराच्या पश्चिम म्हणजेच पाठीमागच्या बाजूवर ताण व खेच निर्माण होतो. याउलट सुप्त वज्रासनामध्ये शरीराच्या पूर्व म्हणजेच वरच्या भागावर ताण व खेच निर्माण होतो. या परस्परविरोधी क्रियांमुळे पश्चिमतानासन व सुप्त वज्रासन ही दोन्ही आसने एकमेकांना पूरक ठरतात. त्यामुळे एकानंतर लगेचच दुसरे आसन केल्यामुळे ताण व खेच याचा जास्तीत जास्त फायदा मिळतो.Next Article

Recommended