आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Bhatewar Artical On Delhi Chief Minister Arvind Kejriwal

सडकछाप'आप'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंदोलनाचे तेज घेऊन भारतीय राजकारणाच्या मैदानात उतरलेले अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाने चालवलेल्या नवनव्या प्रयोगांचे काल-परवापर्यंत सर्वांना कौतुक वाटत होते. भारतीय प्रजासत्ताक दिनाला अवघे सहा दिवस उरले होते. अशा वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सवंगड्यांनी देशाच्या राजधानीत जो सडकछाप तमाशा घडवला, त्यातून एकच संदेश सर्वांना मिळाला; परिवर्तनाच्या लाटेवर स्वार झालेल्या नेत्यांच्या हाती सत्ता सोपवली, तर त्यांना ती जबाबदारीने सांभाळता येत नाही! असे नेते फार तर अराजक घडवू शकतात.
खरं तर आम आदमी पक्षाने देशातला भ्रष्टाचार दूर करण्याची ग्वाही दिली. व्यवस्थेत बदल घडवण्याचा संकल्प जाहीर केला. सार्वजनिक जीवनाच्या शुद्धीकरणाची साद घातली. त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून दिल्लीकरांनी त्यांना सत्तेच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. दारुण पराभवानंतरही काँग्रेसने आपला अहंकार बाजूला ठेवून त्यांना पाठिंबा दिला. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. केवळ दिल्लीच नव्हे, तर सा-या देशाच्या राजकारणात आता सकारात्मक बदल दिसू लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली. केजरीवालांच्या मस्तकात मात्र या यशाची नशा इतकी चढली, की ‘होय, मी अराजकवादी आहे’ असे बेजबाबदार विधान करत ते दिल्लीच्या रस्त्यावर उतरले. ‘आप’ सरकारच्या दोन मंत्र्यांचा अहंकार जपण्यासाठी, त्यांनी थेट गृह मंत्रालय आणि केंद्र शासनालाच वेठीला धरले. या एका कृतीमुळे दिल्लीकरांच्याच नव्हे तर सा-या देशाच्या ‘आप’विषयीच्या आकांक्षा क्षणार्धात धुळीला मिळाल्या. केजरीवालांचे सरकार इतक्या लवकर भ्रमनिरास करील, अशी अपेक्षा कोणी केली नव्हती.
चार-पाच पोलिसांच्या निलंबनासाठी केजरीवाल आणि त्यांच्या सवंगड्यांनी हा तमाशा घडवला. त्यात त्या पोलिस अधिका-याचाही समावेश होता, ज्यांच्याशी ‘आप’ सरकारचे अतिउत्साही कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी मध्यरात्री हुज्जत घातली. भारतींच्या उपस्थितीत ‘आप’ च्या कार्यकर्त्यांनी आफ्रिकन महिलांशी असभ्य वर्तन केले. बळजबरीने त्यांची वैद्यकीय तपासणी करायला भाग पाडले, पोलिसांना दमदाटी करून त्यांच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप केला, असे गंभीर आरोप कायदामंत्री भारती आणि त्यांच्या समर्थकांवर झाले. आफ्रिकन महिलांच्या वैद्यकीय तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यानंतर सोमनाथ भारती व त्यांच्याकडे मंत्रिपद सोपवणा-या केजरीवालांनी, खरं तर या महिलांची बिनशर्त माफी मागायला हवी होती. त्याऐवजी पोलिस यंत्रणा भ्रष्ट आहे, देशाच्या गृहमंत्र्यांकडे प्रत्येक पोस्टिंगसाठी पैसे पोहोचवले जातात, असे बिनबुडाचे आरोप करत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सोडून केजरीवाल मैदानात उतरले. रात्रभर रस्त्यावर झोपले. दिल्लीच्या राजपथाचे रूपांतर इजिप्तच्या तहरीर चौकात करण्याचा मनसुबा त्यांनी रचला. आपल्या बेजबाबदार आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी पोलिस यंत्रणेलाही केले. देशात राज्यघटना अस्तित्वात आहे. राज्यकारभार कायद्यानुसार चालतो. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित आहे. सत्ता हाती आली म्हणून कोणाच्याही घरावर राजरोस छापे घालण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा, कायदा धाब्यावर बसवण्याचा अधिकार कोणालाही नाही. याची जाणीव असूनही जपानच्या पंतप्रधानांच्या विशेष उपस्थितीत साजरा होणा-या प्रजासत्ताक दिनाचे संचलन रोखण्याचा घाट केजरीवालांनी घातला; ज्याचे देशातला कोणताही सुजाण नागरिक समर्थन करणार नाही.
देशातला आम आदमी अनेक कारणांनी आज अस्वस्थ आहे. राजकीय नेते, सरकारी अधिकारी अन् उद्योगपती या त्रिकुटाने संगनमताने देशाची लूट चालवली आहे, असे अनेकांना वाटते. व्हीआयपी संस्कृतीविषयी लोकांच्या मनात घृणा आहे. सरकारी यंत्रणेचा वचक नसल्यामुळे देशाच्या विविध भागात गुन्हेगारी अन् भरमसाट वेगाने महागाई वाढते आहे. दिल्लीत महिलांचे दैनंदिन जीवन सुरक्षित नाही. पोलिस यंत्रणेवर लोकांचा विश्वास नाही. ही स्थिती बदललीच पाहिजे, असे लोकांना मनोमन वाटते. विधानसभा निवडणुकीत दिल्लीकर जनतेने ‘आप’च्या नवख्या उमेदवारांवर त्यासाठीच विश्वास व्यक्त केला. अपघाताने का होईना, दिल्लीची सत्ता केजरीवालांच्या हाती आली. पाणी, वीज स्वस्तात पुरवणा-या लोकरंजनाच्या घोषणांची अंमलबजावणी करण्यास सुरुवातीला त्यांनी हात घातला; मात्र पक्षातला अंत:कलह आणि स्वत:विषयीचा वृथा अहंकार यामुळे लवकरच त्यांची पकड ढिली होऊ लागली. राज्यकारभार चालवणे वाटते तितके सोपे नाही, हे अवघ्या 15 दिवसांत त्यांच्या लक्षात आले. मग क्षुल्लक कारणांचे निमित्त साधून त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग पत्करला. दररोज कॅमे-यांच्या झोतात वावरण्याचा अट्टहास अंगाशी आला. ‘आप’कडे आस्थेने पाहणा-या जनतेचा भ्रमनिरास झाला. लोकसभा निवडणुकीतून नेमके काय निष्पन्न होईल, याची आज कोणालाही कल्पना नाही. निवडणुकीनंतर केंद्रात अस्थिर सरकार सत्तेवर आले तर ते नव्या अराजकाला निमंत्रण देणारे ठरेल, अशी भीती आहे. त्यापूर्वीच राजकीय शुद्धीकरणाच्या नव्या प्रयोगाचा गर्भपात व्हावा, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. प्रस्तुत लेख प्रकाशित होईपर्यंत, केजरीवालांच्या ‘इच्छे’नुसार बहुधा सत्तेतून त्यांचे उच्चाटन झालेले असेल; मात्र ताज्या आंदोलनाचा लाभ त्यांना आगामी निवडणुकीत मिळण्याची शक्यता दिसत नाही. दिल्लीच्या निवडणुकीतला चमत्कार पुन्हा घडणार नाही. कारण कोणताही चमत्कार वारंवार घडत नसतो.
suresh.bhatewara@gmail.com