आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Bhatewara Article About Modi Govt. Hindu Rashtra

हिंदू राष्ट्रनिर्मितीचे धोकादायक प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले, तेव्हापासून रा. स्व. संघाच्या विविध शाखांनी अन् संघाच्या हितचिंतकांनी आपला आवडता जुना खेळ पुन्हा सुरू केला आहे. 2025मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100व्या वर्षात पदार्पण करणार आहे. सलग दहा वर्षे मोदी पंतप्रधान राहिले, तर संघाच्या शतक महोत्सवापर्यंत भारताचे रूपांतर हिंदू राष्ट्रात हमखास होईल, असे स्वप्न कट्टर संघ स्वयंसेवकांनी उराशी बाळगले आहे. दिल्लीचे तख्त मोदींच्या हाती आल्यापासून घटना अशा घडत आहेत, की संघाची या स्वप्नाच्या दिशेने आगेकूच सुरू झाल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे.
गोव्यात भाजपचे मनोहर पर्रीकर राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील परिवहनमंत्री सुदिन ढवळीकर व त्यांचे बंधू दीपक यांनी नुकतीच उघडपणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचे हिंदू राष्ट्राच्या निर्मितीच्या दिशेने मार्गक्रमण होत असल्याची ग्वाही दिली. आपण हिंदू ख्रिश्चन असून भारत हिंदू राष्ट्र असल्याचीच आपली भावना आहे, असा फ्रान्सिस डिसुझा या गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवेदनाचा मथितार्थ होता. गोव्याच्या सागरतीरावर देशी-विदेशी महिलांना बिकिनी घालण्यास बंदी घालावी, अशी मागणी ढवळीकरांनी महिन्यापूर्वीच केली होती. पबमध्ये जाणार्‍या महिलांवर आक्रमक हल्ला चढवणार्‍या प्रमोद मुतालिकांनी याच वृत्तीचे काही वर्षांपूर्वी कर्नाटकात प्रदर्शन घडवले होते. तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विश्वविख्यात टेनिसपटू व हैदराबादची कन्या सानिया मिर्झाची आपल्या नवनिर्मित राज्याच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी नुकतीच नियुक्ती केली. त्याला भाजपचे विधानसभेतील गटनेते के. लक्ष्मण यांनी कडाडून विरोध केला. ‘पाकिस्तानची सून तेलंगणाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कशी होऊ शकते?’
असा सवाल के. लक्ष्मण यांनी विचारला अन् थेट सानियाच्या भारतीयत्वाबद्दलच शंका प्रदर्शित केली गेली. काश्मीरसाठी राज्यघटनेत समाविष्ट कलम 370 रद्द करावे, समान नागरी कायद्याची भारतात अंमलबजावणी व्हावी, यांसारख्या वादग्रस्त विषयांच्या चर्चेलाही मोदी सरकार आल्यापासूनच तोंड फुटले आहे. अशा सर्व प्रकरणांत भाजपने हात झटकण्याचा प्रयत्न जरूर केला; मात्र देशाला विश्वास वाटेल, अशा पद्धतीने विषयांचा प्रतिवाद केलेला नाही.
ब्रँड मोदी नेतृत्वाच्या अंकित असलेल्या गुजरात सरकारने तर हिंदू राष्ट्र संकल्पनेबाबत टोकच गाठले आहे. रा. स्व. संघाच्या अजेंड्याचा पुरस्कार करणारी व इतिहासाचे संदर्भ बदलणारी जी पुस्तके गेल्या दोन दशकांपासून संघाच्या शाखांमध्ये वाटली जात होती, त्यांचा आता रीतसर शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमातच समावेश करण्याचा घाट गुजरात सरकारने घातला आहे. या तमाम पुस्तकांचे लेखक आहेत रा. स्व. संघाचे स्वयंसेवक दिनानाथ बात्रा. नव्वदच्या दशकात विद्याभारतीच्या (शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेली रा. स्व. संघाची शाखा) शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी बात्रांनी मूलत: हिंदी भाषेत काही पुस्तके लिहिली. गुजरात सरकारने वर्षभरात त्यातल्या 9 पुस्तकांचा गुजराती भाषेत अनुवाद करवून घेतला. संघ प्रचारकांचा गौरवपूर्ण उल्लेख या पुस्तकांमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. या पुस्तकांचे 42 हजार संच आता गुजरातच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये वाटले जाणार आहेत. बात्रा या पुस्तकांद्वारे विद्यार्थ्यांना सांगतात : ‘स्वतंत्र देशाकरिता ज्यू लोकांनी 1700 वर्षे संघर्ष केला. त्यातून जगाच्या नकाशावर इस्रायल देश निर्माण झाला. विभाजित व्हिएतनाम व कोरियाचे पुन्हा अखंड देशात रूपांतर झाले, मग अखंड भारत पुन्हा का तयार होणार नाही? तुम्हाला कल्पना आहे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, तिबेट, बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश (म्यानमार) हे अखंड भारताचाच भाग आहेत. मग भारताचा नकाशा तुम्ही कसा काढणार?’ ‘शिक्षा में त्रिवेणी’ पुस्तकाद्वारे बात्रा महाशय विद्यार्थ्यांना सुचवतात : ‘पाश्चात्त्य संगीत, परिधाने, संस्कृती इत्यादींपासून दूर राहा. वाढदिवस साजरा करताना केकवरच्या मेणबत्या विझवण्याऐवजी हिंदू मंत्रांचा जप करा, धार्मिक भजनांमध्ये रुची वाढवा.’ बात्रा स्वत:ला क्रमिक पुस्तकांचे सोशल ऑडिटर मानतात. ते म्हणतात : ‘अनेक वर्षे भारतीय शिक्षणव्यवस्थेने खर्‍या इतिहासापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवले आहे. आता देशभर विद्यार्थ्यांना खरा इतिहास शिकवला गेला पाहिजे, त्याचा प्रारंभ गुजरात सरकारने केला आहे, त्याचे अनुकरण देशातल्या अन्य राज्यांनीही आता केले पाहिजे.’