आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी जॉर्ज ऑर्वेलच्या डुकरांसोबत राहतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या संस्कृतीचे किंवा त्या समाजाच्या मूल्यांचे पतन कोणी अध्यक्ष किंवा पंतप्रधान करत नसतो, तर त्यांना त्या पदांपर्यत पोहोचविणारा समाज करत असतो. आता व्यवस्थेचा दुबळेपणा लपून राहिलेला नाही. म्हणून कोणत्याच भयानक कृत्याचे पातक फक्त राज्यसत्ता, धर्मसत्ता किंवा अशा समांतर व्यवस्थेवर मारून आपली सुटका करून घेता येणार नाही. त्यामागच्या विकृत प्रवृत्तीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.
 
एक लेखक म्हणून मी प्रचंड अस्वस्थ आहे. मी माणूस म्हणून प्रचंड दुबळा आहे, ही जाणीव करून देणारा हा काळ आहे. भूमिका तर फार दूरची गोष्ट आहे. पण संवेदनशील माणूस म्हणून माझी जागाही अद्याप मला सापडलेली नाही. ती सध्या सापडेल, याची सुतराम शक्यता दिसत नाही. मग मी जॉर्ज ऑर्वेलच्या डुकरांसोबत राहतो. डुकरांसारखेच जगतो. उदयप्रकाशचा मोहनदास माझ्यापैकीच एक. जुझे सरामागोचे आंधळे मीच असतो. चाचपडतो. ठेचकाळतो. रक्ताळतो. अशा अवस्थेत बांदेकरांचा परश्या ठाकर मला काहीतरी सांगतोय. पण मी मात्र ठार बहिरा. आता मी अस्वस्थ वर्तमान आणि धूसर भविष्याच्या मध्यात कुठेतरी लटकतोय. सत्य आणि कल्पना यातला फरक मिटून जावा, इतका जबरी वर्तमान जगायची सक्ती माझ्यावर केली जातेय. आणि लेखक म्हणून रोजची मरणे जगत जगत मी मरतोय.

मला जाणवत राहतेय की, काळ मोठा कठीण आला आहे. मानवी मूल्यांच्या पडझडीचा हा काळ आहे. मानवी इतिहासात विकृतीच्या टोकावर पोहोचलेल्या दुबळ्या माणसाच्या विलक्षण परावलंबी असण्याचा हा काळ आहे. बाजाराला शरण गेलेल्या दुबळ्या व्यवस्थांना अंतिम घरघर लागलेली आहे. माणूस इतका हतबल कधीच झाला नसेल. ही कोणती व्यवस्था आकाराला आली आहे, जी जबरदस्तीने त्याची ओळख हिसकावून घेते आहे? अशा निर्णायक वेळी हाताशी कोणतीच विचारधारा नसावी, ही भयाण शोकांतिका आहे. अतित्वात असलेल्या बहुतेक विचारधारांचा ‘रिलेव्हन्स’ संपत चाललेला आहे. नव्या युगाच्या समस्यांना त्याच काळातील उपाय हवे असतात. अशा वेळी काही धूर्त लोक व्यवस्थांना हाताशी धरून सामान्य माणसांना भुलविण्यासाठी ‘विकासाच्या’ नावाखाली सुलभीकरणाची गंमत बाहेर काढतात. म्हणूनच ‘गरिबी हटाव’ किंवा ‘अच्छे दिन’ ही राजकीय भूमिकेपेक्षा जनतेसाठी बनवलेली सुलभीकरणाची लोभस ट्रिक असते. लोक बळी पडतात, हा इतिहास आहे. अशा वेळी अमर्त्य सेन किंवा नॉम चोम्स्कीसारखे विचारवंत आवाजी स्वरांत कालबाह्य ठरवले जातात. या अनाम पोकळीत माणसाचे आयुष्य अधिकच निरर्थक बनवले जाते.

अशा संवेदनाहीन आणि ठार बहिऱ्या काळात सत्याची तोडमोड केली जाते. नैतिकतेचे संदर्भ हातोहात बदलले जातात. यातूनच समाज कमालीचा कृतिहीन बनतो. मांस की माणूस, यामध्ये बहुसंख्य माणसांना अखलाखच्या बाजूने उभे राहता येत नाही. शेतकरी मरतो आहे आणि तरीही माझ्या घरची चूल पेटलेली आहे. म्हणूनच या शेतीमातीच्या स्मशानची धग माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. अयोध्येतील राम समजणाऱ्यांना ह. ना. आपटेंचा ‘काळ तर मोठा कठीण आला’मधला रामजी अजून समजलेलाच नाही, की समजून घ्यायचाच नाही? तामीळनाडूतील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या मातीत केलेले आंदोलन हे कृषिप्रधान भारताचा राक्षसी चेहरा समोर आणण्यास पुरेसं आहे. कामगार एखाद्या कल्पित कादंबरीतील किंवा चित्रपटातील पात्र असल्याप्रमाणे उखडून टाकला जातोय. रोहितसारखा विद्यार्थी आत्महत्या करतो किंवा पेरुमल मुरुगनसारखा लेखक स्वतःतील लेखकाचा मृत्यू जाहीर करतो. भारत माता की जय किंवा वंदे मातरम आता कोणाच्या ओठांतून बाहेर आले, यावरच त्याचा अर्थ उरला आहे का? साऱ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या गोष्टी घडत असताना यात मी कुठे असतो? माणसांची शरीरे पांघरून जनावरे आपल्या आडोशाला कधीपासून आली, हे समजलेच नाही. हे सारे तुमच्या गावात आहेत, की तुमच्या घरात, की खुद्द तुमच्यातच? हा एकूण सर्वांनाच भ्रमित करणारा काळ आहे. अशा वेळी झुंडींचा आवाज सत्य आणि ते म्हणतील तो त्याग आणि नैतिकता म्हणून स्वीकारले जाण्याचा धोका निर्माण होतो. माणूस असण्याची वीण उसवण्याच्या काळात आपण आपल्यातील जनावर असण्याच्या प्रक्रियेला समांतर चाललो आहोत का, याचा विचार प्रत्येक संवेदनशील मनाने करायलाच हवा.

माणसाने कधी नव्हे ती बधिर शांतता पांघरली आहे. विचारवंतांच्या खुनाचे सत्र सुरू झाले आहे. लेखकांच्या लेखण्या किंवा कलाकारांची कला अक्षरश: पायदळी तुडवली जाईल. माणसे धर्मासाठी भांडतील. भाषेसाठी भांडतील. मातीच्या वीतभर तुकड्यासाठी भांडतील. प्रेतांचा खच पडेल आणि त्यातूनच बाजार नावाची एक शक्तिमान व्यवस्था दिवसेंदिवस बळकट होत जाईल. मी बहिरा आहे, मुका आहे, आंधळा आहे, असे म्हणून आपण फार काळ तगून राहू शकणार नाही. हे कोणालाच का समजत नाही. की समजून उमजून घेतलेली ही कृतिशील निद्रा आहे. शेवटी बाजाराला आकार नसतो. गंध नसतो. बाजाराला ना रूप असते, ना मानवी चेहरा. ‘प्रॉफिट’ नावाचे इंधन शोधत बाजार वाढत जातो आणि मग वस्तू आणि माणूस यातला भेद हळूहळू कमी होत जातो. माणसांचे वस्तूकरण करणारा हा काळ आहे. एक अमानवी कोडगेपण आपल्या जगण्याचाच भाग बनत चालले आहे.

आपले जगणे प्रचंड विरोधाभासाचे बनत चालले आहे. एकीकडे बहुतांश लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. आणि ज्यांनी पोटापाण्याचे प्रश्न सोडवलेले आहेत, त्यांनीसुद्धा मानवासाठी काही विशेष केल्याचे आढळून येत नाही. उलटपक्षी त्यांनी अखंड मानवी समूहालाच विकृतीकडे घेऊन जाण्याचा चंग बांधला आहे. अशा वेळेस विद्वानांची भूमिका, लेखकांचे साहित्य आणि एखाद्या कलाकाराची डोळस अभिव्यक्ती या आवाजी आणि अभिनिवेशी वर्तमानात कधी विरघळून गेली, हेही समजत नाही. आता तुम्ही अवश्य बोला, पण अर्थात आमच्याच सोयीचे. तुम्ही जरूर लिहा, पण आम्हाला हवे ते, ही अदृश्य ‘टर्म अँड कंडिशन’ प्रत्येक लेखकाच्या पानापानावरून फडफडताना दिसते आहे. कधी धमकी दिली जाते, तर कधी लाभाची आमिषे. यासाठी पद्धतशीर झुंडी कार्यरत झाल्या आहेत. म्हणून इथल्या अस्थिर आणि अस्वस्थ वर्तमानासाठी फक्त सत्तांतरालाच जबाबदार न धरता त्यामागचे आपले विकृत चेहरे तपासून घेणे गरजेचे आहे. इथल्या पालिकेच्या निवडणुकीपासून ते अलीकडे जगातील बहुतेक देशांमध्ये आकाराला आलेले नेतृत्व आणि त्यांचा ‘बिहेविअर पॅटर्न’ विलक्षण समान आहे. त्यासाठी फ्रान्सच्या मॅरिन ली पेन आणि योगी आदित्यनाथ यांसारखी प्रातिनिधिक नावे पुरेशी आहेत. एखाद्या संस्कृतीचे किंवा त्या समाजाच्या मूल्यांचे पतन कोणी अध्यक्ष किंवा पंतप्रधान करत नसतो, तर त्यांना त्या पदांपर्यत पोहोचविणारा समाज करत असतो. आता व्यवस्थेचा दुबळेपणा लपून राहिलेला नाही. म्हणून कोणत्याच भयानक कृत्याचे पातक फक्त राज्यसत्ता, धर्मसत्ता किंवा अशा समांतर व्यवस्थेवर मारून आपली सुटका करून घेता येणार नाही. त्यामागच्या विकृत प्रवृत्तीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. अतिविक्राळ मताधिक्याने होणाऱ्या सत्तांतराला इव्हिम मशीन नव्हे तर भ्रमिष्ट मतदार कारणीभूत आहे. हा पराभव एकप्रकारे इथल्या वर्षानुवर्षे जपलेल्या संस्कृतीचाच आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर येल विद्यापीठाचे प्रो. टिमोथी स्निडर यांनी केलेले भाष्य या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ‘Americans are no wiser than the Europeans, who saw democracy yield to fascism, nazism, or communism.’ आणि हे भीतियुक्त भविष्य दुर्दैवाने आपल्यासहित जगाला लागू पडते आहे.  

निर्मितीपासूनच माणसाने हजारो आव्हाने पचविलेली आहेत. त्यातूनच मानवी संस्कृती आकाराला येत असते. पण हा काळ माणसाचा तो अवकाश नाकारतो आहे. त्याला अधिक लेचापेचा करतो आहे. अस्तित्वहीन करतो आहे. असा शतखंडित माणूस हीच या भयाण युगाची मांडणी आहे. १९३५च्या दरम्यान अमेरिकेच्या राजकारणातील गडबड पाहून असाच एक साहित्यिक सिंक्लेर लेविस, म्हणाला होता, ‘इट्स नॉट हॅपन हियर’. असली नौटंकी आणि राक्षसी संहार या मातीत आम्ही कदापिही होऊ देणार नाही. मग आजसुद्धा घोर निराशेच्या टोकदार वर्तमानात इथल्या लेखकांना, विचारवंतांना आणि कलावंतांना अशाच ठाम भूमिका घ्याव्या लागतील. सगळीकडेच सबगोलंकार परिस्थिती असताना इथल्या मातीत खोलवर रुजलेल्या मूल्यांवर श्रद्धा ठेवून सामान्य माणसालाच भूमिका घ्याव्या लागतील. स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर सामान्य माणसाचीच तर भूमिका महत्त्वाची असते. 
 
shinde.sushilkumar10@gmail.com
लेखकाचा संपर्क - ९६१९०५२०८३
बातम्या आणखी आहेत...