आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्याग्रहाच्या शताब्दीला धर्मांधतेचे सावट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक काळाच्या स्वतःच्या अशा काही समस्या असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी माणसाच्या हाताशी काही शाश्वत विचारधारा हव्या असतात. गांधी विचारांचा वारसा नेमकेपणाने इथे उपयोगी पडतो. आपण जर ‘पोस्ट ट्रुथ’च्या जमान्यात जगत असू, तर सत्याचे शाब्दिक खेळ क्रमप्राप्तच असतात आणि अशा काळात सत्याचे प्रयोग करणारा महात्मा अधिक जवळचा आणि कालसुसंगत ठरतो...

सुमारे शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट. अर्थात, १९१७ची. सक्तीची निळेची शेती आणि राज्यकर्त्यांची दमनशाही समजून घ्यायला एक माणूस बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात गेला होता. शेतकऱ्यांशी संवाद साधला, समस्या समजून घेतल्या आणि सत्याग्रहाला सुरुवात केली गेली. देशाच्या इतिहासात गांधी नावाच्या ‘शककर्त्याचा’ तो उदय होता. या एकाच आंदोलनाने श्रीमान गांधी संपूर्ण भारताचे ‘बापूजी’ झाले.

ही घटना फक्त भारतीय राजकारणामध्ये एका महानायकाचा उदय, एवढीच मर्यादित नव्हती. या आंदोलनाने सत्याग्रहाच्या माध्यमातून सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि महिला असा चेहरा नसलेला वर्ग इतिहासाला दखलपात्र झाला होता. सामान्य माणसाच्या इतिहासाला सुरुवात करणाऱ्या चंपारण्य सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष. आणि अगदी त्याच वर्षी सुमारे ३०० वर्षांची झारशाही संपुष्टात आणण्यासाठी संपूर्ण रशिया पेटून उठलेला होता. लोक रस्त्यावर उतरलेले होते. फेब्रुवारी आणि ऑक्टोबरमध्ये घडून आलेल्या रशियाच्या ‘जुळ्या क्रांतीचा’ प्रणेता होता, व्लादिमिर लेनिन. पुढील कित्येक दशके जगातील क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या ‘रोड टु रेवोल्युशन’ या लेनिन यांच्या क्रांतिकारी मांडणीचेही हे शताब्दी वर्ष. युरोपभर पसरलेल्या महायुद्धाला जागतिक महायुद्धाचे परिमाण दिले, ते वुड्रो विल्सन या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने. अमेरिकेची युरोपच्या युद्धात उतरण्याची घोषणा होण्याचे वर्ष हेही २०१७. हीच घटना पुढे अमेरिकेला जागतिक महासत्तेकडे घेऊन गेली. तो महासत्तेचा केंद्र गेली शतकभर अमेरिकेतच निर्विवाद स्थिरावला.

या तीन घटनांच्या पाठोपाठच फक्त आठ वर्षांनी आणखी एक महत्त्वाची घटना घडली, जर्मनीच्या कारागृहात बसून एक राजकीय कैदी आपले आत्मचरित्र लिहीत होता. त्या वेळेस हे कोणाच्याही लक्षात आले नाही की, हे त्याचे पुस्तक त्याला जर्मनीचा चॅन्सलर बनवणार आहे. तो जर्मनीचाच नव्हे, तर जगातील सर्वात क्रूरकर्मा म्हणून आकाराला येणार आहे. १९२५ आणि १९२६च्या मध्ये दोन खंडातून प्रकाशित झालेले त्याचे ‘माइन काम्फ’ हे आत्मचरित्र लिहिणारा कैदी होता, अडॉल्फ हिटलर. त्याने जोपासलेल्या वंशश्रेष्ठत्वाच्या अहंकारातून संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धात ढकलले गेले. वरील चारही घटना विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच घडल्या. पण त्यांनी शतकाचा चेहरामोहरा बदलला. बोल्शेविक (बहुजनांची) क्रांतीनंतरच्या जगातल्या प्रत्येक सशस्त्र क्रांतीसाठी लेनिन हाच नायक होता. ती स्फूर्ती आणि ऊर्जा भारतीय स्वातंत्र्ययुद्धातसुद्धा आपणाला पाहायला मिळते. हिटलरची क्रूरता आणि तीव्र वांशिक द्वेष फक्त जर्मनीपुरता किंवा ज्यू द्वेषापर्यंतच मर्यादित न राहता, तो जगभर पाझरत राहिला. त्याची टोके एकविसाव्या शतकातही पाहायला मिळतात. भारतातील बऱ्याच नेत्यांनी हिटलरचे जाहीर समर्थन केले आहे, त्यातच सारे येते. या साऱ्या पार्श्वभूमीवर विसावे शतक आणि त्याची एकविसाव्या शतकासाठी निर्माण झालेल्या उपलब्धी याचा अन्वयार्थ लावता येऊ शकतो. याच पार्श्वभूमीतूनच शतकाचा सर्वोत्तम नायक म्हणून गांधीजींचा उदय आणि महासत्ता म्हणून अमेरिकेची निर्मिती झालेली पाहायला मिळते.

आपण भूतकाळाचा वर्तमानासाठी कसा अन्वयार्थ लावणार आहोत, हे सध्या खूप महत्त्वाचे झाले आहे. माणूस नेहमीच भूतकाळ खांद्यावर घेऊन जगत असतो. त्यात कधी अभिमान असतो, तर कधी अपमान. कधी सूडाची तीव्र भावना असते, तर कधी पुढच्याला लागलेल्या ठेचेमधून आलेले शहाणपण. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या बऱ्याच समस्यांची मुळे आपल्याला विसाव्या शतकात सापडतात. विसावे शतक हे वसाहतवादाच्या शेवटाचे होते. भूगोलाचा नकाशा बदलू पाहणारे होते, तसेच मानवी मर्यादा नाकारू पाहणारेही होते. या शतकाने दोन विश्वयुद्धे पचवली. क्रूरकर्मा हिटलरचा गॅसचेंबरमधील नरसंहार पाहिला.
 
पुढची काही दशके जगाने शीतयुद्धाच्या भीतीच्या छायेत काढली. बर्लिनची भिंत पडताना पाहिली. त्याचसोबत बलाढ्य महासत्ता सोविएत रशियाचे विघटनही पहिले. हिरोशिमा- नागासाकीसारख्या मानवी विनाशाला साक्ष असलेल्या या शतकाने जागतिक महासत्तेची लालसा घेऊन वाढणारे अशियाई देशही पाहिले. तेलाचे राजकारण आणि पर्यावरणाचा बिकट प्रश्नही याच शतकाचा. धर्मांध आणि राक्षसी दहशतवाद हीसुद्धा विसाव्या शतकाचीच निर्मिती.

या साऱ्या घटनांचा अन्वयार्थ २१व्या शतकाचा ग्लोबल माणूस काय लावतो, यावरच त्याचे भविष्य अवलंबून आहे. एकीकडे वैश्विकतेच्या गप्पा ठोकायच्या आणि दुसरीकडे टोकाचे संकुचित राहायचे, हा साऱ्याच जागतिक नेतृत्वांनी स्वीकारलेला, नव्या काळाचा फंडा आहे. आणि याला कोणतेच नेतृत्व अपवाद नाही. तुम्ही स्वतःला जर जागतिक नागरिक मानत असाल तर एक दिवस तुम्ही कुठलेच असणार नाही, असं वक्तव्य इंग्लंडच्या पंतप्रधान तेरेसा मे यांनी नुकतेच करणे किंवा अगदी ‘अमेरिका फर्स्ट’ हे ठासून सांगणे म्हणजे, याच विधानाचे हे अमेरिकी व्हर्जन अाहे. जागतिकीकरणाच्या जमान्यात हा उलटा प्रवास म्हणजे पुन्हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अनुभवलेल्या कट्टर राष्ट्रवादाकडे घेऊन जाणारा  धोका आहे.

वस्तुत: या शतकात मुक्त बाजारासोबतच संवादही मुक्त झाला आहे. ही समाजमाध्यमांनी केलेली संवाद क्रांती माणसाच्या भविष्यावर दीर्घ परिणामकारक ठरणार आहे. यासाठी मानवी समूहाला मागील शतकातील गांधीविचार निश्चितच मार्गदर्शक ठरतील. चंपारण्य आंदोलनाची शताब्दी साजरी करत असतानाच भारतीय अनुषंगाने गांधी आणि त्यांच्या विचारांतून निर्माण झालेल्या शक्यतांचाही इथे विचार करायला हवा. अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून तब्बल तीस वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्ययुद्ध हे संपूर्ण जगासाठी अनोखे स्वातंत्र्ययुद्ध होते. जगभरात सगळीकडेच अनागोंदी आणि दहशतीच्या बळावर बलाढ्य सत्ता उलथवून टाकल्या जात असताना गांधी नावाचा माणूस सविनय कायदेभंगाची मुहूर्तमेढ या देशाच्या मातीत रोवत होता. स्वातंत्र्यानंतर त्या युद्धाचा नायक राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनत नाही, हेही जगातील अनन्यसाधारण उदाहरण आहे. फाळणीतील निर्घृण कत्तलीची भळभळती जखम घेऊन जगणाऱ्या या महात्म्याचा मात्र दुर्दैवाने काही वर्षांतच निर्घृण खून केला जातो; पण तरीही जनमानसातून गांधी नावाचे गारूड संपत नाही. तो विचार जगभर पाझरत राहतो.

या देशात त्यांचा खून करूनही गांधींना संपवता येत नाही, हे लक्षात आल्यावर प्रतीकांच्या आडून गांधींना संपविण्याचा व्यवस्थित प्रयत्न सुरू आहे. प्रतीकांच्या भुलभुलैयातून गांधीविचार सोयीस्कर दूर केले जाणार नाहीत, याची काळजी आपणच घ्यायला हवी आहे. एकीकडे गांधींचा अनुनय करत आहोत, असा भास निर्माण करायचा; आणि दुसरीकडे त्यांचा निर्घृण खून करणाऱ्याला हुतात्मा संबोधायचे, हा दुहेरी डाव आता लपून राहिलेला नाही. म्हणूनच अशा काळात गांधी विचारांचा नामजप करण्याऐवजी आचरणाची आवश्यकता जास्त आहे. स्वातंत्र्याच्या पुढील तीस वर्षांत आणीबाणीला सामोऱ्या जाणाऱ्या भारतात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांतीचे आंदोलन उभे राहिले, याचा पाया गांधीजींचा सत्याग्रहच असतो. अलीकडच्या काळातील गणेश देवींचे ‘दक्षिणायन’ हा याचाच एक कल्पक भाग. थोडक्यात, गांधींचे विचार इथल्या मातीत आणि माणसात मुरलेले दिसतात. धर्मांध शक्ती आणि विद्वेषाचे राजकारण जगभरात डोके काढत असतानाच, गांधींचा विवेकी विचार सर्वांसाठीच मार्गदर्शक ठरत आहेत.

प्रत्येक काळाच्या स्वतःच्या अशा काही समस्या असतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी माणसाच्या हाताशी काही शाश्वत विचारधारा हव्या असतात. त्यासाठी माणसाला स्वतःचे असे एक कालसुसंगत तत्त्वज्ञान निर्माण करावे लागते. गांधी विचारांचा वारसा नेमकेपणाने इथे उपयोगी पडतो. त्यामध्ये जशी कल्पकता आहे, तशीच विश्वसनीयताही आहे. आपण जर ‘पोस्ट ट्रुथ’च्या जमान्यात जगत असू, तर सत्याचे शाब्दिक खेळ क्रमप्राप्तच असतात आणि अशा काळात सत्याचे प्रयोग करणारा महात्मा अधिक जवळचा आणि कालसुसंगतही ठरतो.
 
shinde.sushilkumar10@gmail.com
लेखकाचा संपर्क - ९६१९०५२०८३
बातम्या आणखी आहेत...