आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आगं शारदे! हिकडं ये की!’ कुजबुजल्या आवाजात रमानं हाक दिली तशी दुडुदुडू धावत शारदा बाहेर येत ‘काय गं?’ असं हातानं खुणवत म्हणाली. ‘आगं चल बिगीन. गल्लीच्या कोपर्‍यावर लई चांगला बेंडबाजा आलाय, तू बी चल बघाया, चल चल,’ म्हणत दुघीबी परकर सावरत दणक्यानी कोपर्‍यावर जाऊन उभ्या राहिल्या. केसांच्या झिपर्‍या वार्‍याने उडून तोंडावर आलेल्या, डोळे बारीक, अंगठ्याचं नख तोंडात आणि एका पायावर भार देऊन कमरेवर हात ठेवून शारदा नि रमा बँड ऐकत ऐकत गुंगून गेल्या की किती वेळ गेला कुणास ठाऊक.

धपकन पाठीत धपका बसला. शारदी तोल जाऊन पुढंच वाकली. बघतीया तर काय? मागं रागानं लाल झालेली आई दंडाला धरून वढतिया. ‘अगं शारदे, येडी का खुळी तू. सगळ्या घरात हुडीकलं आन्् तू हित हायस व्हय? आगं तुजं उद्याला लगीन हाय. आज तुझ्या सासरघरी देवदेवकाचं कार्य हाय. म्हणूनशान तेंनी बँड लावलाय. तू कशापाय बघाय आलीस, अगं हे तुजं सासर होणारेय.’

आईनं ओढत ओढत तिला घरात नेलं. तेल लावून चपचपीत विचरून घट्ट आंबाडा घालून दिला. वर शेवंतीचा गजरा घालून देऊन चमकी जरीचं लुगडं चापून चोपून निशिवलं.
शारदा व रमा भानावर आल्या. दोन्ही एकमेकीकडं चकाकत्या नजरेनं बघायला लागल्या.
रमाकडं नसलेला लाकडी भावला आपल्याकडं आल्यावर कसा आनंद वाटतोया, असा आनंद शारदीच्या चेहर्‍यावर दिसाय लागला.
लगीन म्हणजे काय तर नवीन कोईमतुरची लुगडी नेसायला, बुचड्यावर बक्कळ गजरं घालायला, छान छान दागिने घालायला मिळणार. गुळमाट श्याव आणि बुंदीचा लाडू खायाला मिळणार. चमकतेल बाशिंग बांधणार. रात्री पेंगस्तवर सार्‍या गावातून मिरवणूक काढणार. काय मज्जा. शारदीच्या मनात आनंदाला उधाणच आलं जणू.
तरी रमा तिच्या परीस वयानं जराशिक डगळच. ती म्हणाली, ‘शारदे, अगं सगळं खरं, पर दादला बघितलीयास का कोंचा हाय त्यो? बहुतेक बापुसाबच आसावा. मला तर त्यो तुझ्यापरास लय मोठाच वाटतुय म्हणणास?’
‘अग आसुंदे. मोठा असला तरी काय फरक पडतोया. आपलं सगळं सुखसोबाळ झालं म्हणजे झालं.’
शारदीच्या मनात आता लग्नाच्या फायद्याखेरीज कोणताच विचार नव्हता. नवरदेव कोणता हेही पाहायची जरुरी भासत नव्हती.
हा हा म्हणता दुसरा दिवस उजाडला. हळदी, घुघुळ, घाणा, गावदेवीला िनवद काय न काय? त्यात शारदेची न रमाची जास्त बोलाचाली झालीच नाही.

बघता बघता हळदी आहेर कुलदैवताला आवतण एकामागं एक कार्यक्रम पार पडत आले. शारदीला लालभडक काठाचं हिरवजर्द लुगडं निशिवलं. बुचडा घालून ताजा शेवंतीचा गजरा घातला. चमकतेल बाशिंग बांधलं तोवर मांडवात सगळ्या गावाची मूठमूठ अक्षता घेऊन गर्दी जमली. भट सकाळधरनं तारस्वरात मंत्र म्हणत होता. त्यानं घटका भरली म्हणलं की मामा आत जानवस घरात आला आणि त्यानं तिला उचिललं आणि मांडवात आणलं. मधी अंतरपाट धरला गेला. मामाच्या कडंवरनं खाली उतरताना बाशिंग तिरकं झालं. शारदी ते सरळ करायच्या नादात हाय तवरच आक्षता पडल्या सुदिक.

जेवणावळी झाल्या. रुकवत उचिलताना लईच मज्जा आली. बापसाबची आई जाम इरसाल, तर शारदीची आई काय कमी बेरकी न्हाय. हाहा म्हणता इनीइनी दणक्यानं उखाणं घ्युनघ्युन एकमेकीवर कुरघोडी कराया लागल्या.
सगळा, मांडव नवरानवरी सोडून त्या इनीइनी कडंच बघाया लागला. नाव घेऊन दमल्या तरी माग सरायला एकबी तयार हुईना. शेवट बापसाबच उठलं, दोनी हातानं बाशिंगाच्या मंडवळ्या मागं धरल्या आणि आपुणच लांबलचक नाव घेतलं. आता सगळं काय बाय ध्यानात न्हाय आलं पर ‘हांड्याव हांडं सात, त्यात हुती परात... अन् शेवटी शारदी माझी राणी,’ असं नाव घेतलं.
एवढा मोठा पुरूस गडी. इतकं लांबलचक नाव कसं काय घेतुया? आम्हाला आचिटच वाटलं. तोंडाचा आ करून, ऐकीतच राहिलो जणू. पर बाकी एक खरं. बापसाबनं असल्या फक्कड रुबाबात नाव घेतलं म्हणता सगळ्या जणी गपशिरी गप्पा झाल्या. मुकाट्यानं रुखवताच्या दुरड्या उचलून घरात नेऊन कोपर्‍यात रचल्या.

बघताबघता मांडव मोकळा झाला. बापसाब उठून माडीवर गेलं. शारदीला कुठं जावावं कायच उमगंना. मांडवात बारक्या पोरानी ताकतुंबाचा खेळ मांडलेला. तिला बी एक खांब पकडून खेळावं वाटत हुतं. पर आई, आजी चुकल्यामाकल्यानी दिलेली ताकीद डोळ्यापुढं येत हुती. ती तिथंच ठुबाल्यावाणी टुकूरटुकूर बघत बसली. बघताबघता डोळ्यावर झापड येऊन तिचा डोळा लागला. ती हळूच तिथं कलंडली.
अर्धा एक तास असाच गेला. भवतीनं हळूहळू हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. डोळे उघडून बघतीया तर सगळ्या सख्ख्या चुलत, आत्ते, मावस ननंदा भवती उभ्या राहून तिला तसं झोपल्यालं बघून खुदूखुदू हसत्यात.

ती जागी झालेली बघितल्यावर सासूनं हिसक्यानं दंडाला धरून तिला घरात नेलं. घसघसा तेल चोपडलं. गच्च बुचडा घालून वर शेवंतीचा जरतारी चमकीचा गजरा बशीवला. तोंड धुवायला लावून कपाळभर मळवट भरला. कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मधल्या बोटान गालावर काजळाचा ठिपका लावला.
तवर मांडवात एक एक करून गॅसबत्त्या जमा व्हायला लागल्या होत्या. जसं कडुसं पडलं तसं दारात फुलानी मढवलेली घोड्याची बग्गी येऊन उभी रािहली.

बापसाब माडीवरन खाली आलं. ननंदांनी त्या दोघांना लालभडक गुळमाट च्या करून दिला. शारदीनं जिवावर आल्यावानी त्यो कप कसाबसा संपिवला. पटक्याचा शेमला उडवत बापसाब बग्गीत जाऊन बसले. हिलाबी पाठोपाठ बग्गीत बसायला सगळ्यांनी सांगितलं. पर हिचा पाय कुठवर पोहोचतोय. शेवटी बापसाबनच खाली वाकून तिला झाटशिरी वर उचललं आणि शेजारी बशिवलं. शारदीच्या नाकातोंडात नासक्या गुळाचा आन् नवसागरचा हुगीर वास घापशिरी शिरला. तिचा जीवच गुदमरला. श्वास घेण्यासाठी दोनी हातानं मंडवळ्या बाजूला केल्या तवर कुत्र्याच्या पिलावळीसारखी बारकी, शेंबडी, अंगातल्या कुडत्याला बटन नसलेली तर ढुंगणाला चड्डी नसलेली पोर हुऽऽरोऽऽरो करत बग्गीत चढून जागा मिळंल तिथं बसली. ननंदाजावांनी आपली पोरं या दोघांच्या मांडीवर आणून बसिवली.

अगदी पाय तुटायची वेळ आली. कुणाला जरा सरक, खाली उतर म्हणावं तर तेंच्या आयांना राग यायचा. अपमान वाटायचा ही भीती. ती अगदी गलितगात्र होऊन तशीच दाटणीत बसली.
समोर बँड वाजत होता. दोनी बाजूनं गॅसबत्त्या झुलत जात होत्या. बँडच्या तालावर गल्लीतली पोर नवटाक मारून अंगात आल्यासारखं विक्षिप्त हातवारे करून नाचत होती. परतेक ठिकाणी लोक थांबून थांबून वरात बघत होती.
‘बापसाबनं लगीन एकदम फर्मास केलं,’ म्हणत होती.

शारदीला आता या सगळ्याचा उबग आला. लगीन झालं. नटनंथटनं झालं. मिरवणं झालं. बास झालं, असं वाटत होतं. सकाळधरनं ताटून ताटून अंगात कठ आले होते. अनावर झोप यायला लागली होती. अंगावरची ही सगळी झूल काढून टाकावी आन्् चिरगुट गुंडाळून आईच्या पुढ्यात गुडूप झोपावंसं वाटाय लागलं हुतं.
बापसाबान्सी सांगावं म्हणून बघितलं तर ते तांबरलेल्या डोळ्यांनी एकटक बघताना दिसत होते.
शारदीचा जीव आचारी का इचारी झाला. हौस रग्गड झाली. आता बास.
यातनं बाहेर पडायचा मार्गच तिला सापडंना. ती आपल्या भोकराएवढ्या डोळ्यांनी बापसाबकडं, तर रस्त्यानं बग्गीशेजारनं चालणार्‍या मायकडं बघू लागली.
बघता बघता तिच्या आईच्या आणि तिच्या डोळ्यातून केव्हा आसवं ओघळायला लागली त्यांनाही कळलं नाही.
कळून सवरून दोघीही असहाय होत्या.
सुवर्णा उंडाळे, सोलापूर