आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नी कॅप आणि मसाज स्प्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ह्यां’नी माझ्या गुडघ्याला नी कॅप चढवल्या. मी त्यांच्या गळ्यात नवीन मफलर गुंडाळला. मिळालेल्या भेटीचा उबदारपणा अनुभवत शांतपणे एकमेकांसोबत हातात हात धरून नि:शब्द बसून राहिलो. आमच्या भावना व्यक्त करायला आता शब्दांची किंवा इतर वस्तूंची गरज राहिली नव्हती. आमचा व्हॅलेंटाइन डे अनुभवाच्या, सामंजस्याच्या आणि विश्वासाच्या जोरावर आम्ही साजरा करणार होतो.
 
आता काय सांगावं? दोन दिवस झाले. आम्हा दोघांत अबोला सुरू आहे. सगळ्यांचं करता करता जन्म गेला. जुन्या काळात लहानपणातच लग्न झालं. त्या काळी हे व्हॅलेंटाइन बिलेंटाइन काही नव्हतं. कधी नवऱ्यानं एक फूल, गजरा सोडाच; पण एखादी वस्तूही घेऊन दिली नाही. आता दारच्या बागेत फुलंच फुलं आहेत. पण ‘दात आहेत तर चणे नाहीत. आणि चणे आहेत तर दात नाहीत.’ टप्पोरं फूल झाडावर डोलायचं. ते तोडून हौसेनं डोक्यात माळावं तर केसांचा सुपारीएवढा बुचडा झालेला आणि अगदी तासभरसुद्धा त्या फुलांचं ओझं मानेला सोसायचं नाही.

मागच्या वर्षी मी ‘ह्यां’ना ठणकावून सांगितलं, इतके दिवस कधी जन्माच्या कर्माला व्हॅलेंटाइन साजरा केला नाही. तुम्हाला मेली कशाची हौसच नाही. यंदा मला काय सांगायचं नाही. आपण ते काय म्हणतात ते साजर करायचंच. तुम्ही मला लाल गुलाबाचं फूल आणायचंच. मी दुपारी तुमच्यासाठी कमी साखरेचं श्रीखंड आणि ओव्हनमध्ये बेक केलेल्या पुऱ्या करीन. संध्याकाळी आपण दोघांनीही छानपैकी नटायचं. केरळ ट्रिपला जाताना आणलेला फुलाफुलांचा टीशर्ट आणि बर्मुडा तुम्ही घाला, मीपण नातीनं हौसेने आणलेला चुडीदार घालते. कुणी नावं ठेवली तर ठेवू देत बापडे. केसाला क्लिप लावून त्यावर गुलाबाचं फूल माळेन. छानसा मेकअप करून मग आपण दोघे जण रिक्षानं फिरायला जाऊ. वाटेत देवदर्शन करून शुभ दिवशी श्रीरामाचे आशीर्वाद घेऊ. तेथून पिझ्झाहट किंवा मॅकडोनाल्डकडे जाऊ. आपल्याला तिथलं खायला काही फारसं आवडत नसलं तरीही तिथली तरुणांची गर्दी, सळसळता उत्साह, त्यांच्या डोळ्यात दिसत असणारं एकमेकांबद्दलचं प्रेम, आकर्षण, हास्यानं उत्फुल्ल झालेले आनंदानं निथळणारे चेहरे हे सारं थोडा वेळ रिक्षा थांबवून मनमुराद पाहू आणि येताना वाटलं तर पाणीपुरी खाऊन घरी येऊ. तुम्ही मला सकाळी गुलाबाचं फूल आणून द्यायचं नि संध्याकाळी फिरायला जायच्या आधी काही ना काही छानसं गिप्ट द्यायचं. असाच साजरा करतात व्हॅलेंटाइन डे. शेजारची ऋचा सांगत होती, म्हणून मला माहीत.

सगळा जन्म ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ यातच गेला. स्वत:साठी हौसेनं काही घेणं फारसं कधी जमलंच नाही. पण आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही. नव्या युगात आहोत तर त्यांच्यासारखी नव्या विचारांची हौसमौज करून घेऊ या. आता इतकं ठणकावून सांगितल्यावर ‘हे’ नक्की ऐकणार आणि आमचा व्हॅलेंटाइन डे चांगल्या प्रकारे पार पडणार, यात मला अजिबात शंका वाटत नव्हती. होता होता तो दिवस उजाडला. सकाळी डोळे उघडताच ‘ह्यां’नी आले, वेलची घातलेला मस्त, दुधाळ चहाचा कप ‘डार्लिंग गुड मॉर्निंग’ म्हणत हसतमुखानं समोर धरला. आता तर सुरुवात आहे, बघू या काय काय करतात, असं मनात म्हणत खोटं खोटं तोंड फुगवत आयता आणि मस्त चहा मिटक्या मारत प्याला. परत भिंतीकडे तोंड करून झोपले, तशी हे स्वत:चे आवरून मॉर्निंग वॉकला आणि स्विमिंगला निघून गेले. ते साधारण साडेनऊ-दहापर्यंत परत आले. तोपर्यंत मी अंघोळ, देवपूजा, पोथी सारं आवरून पोहे करून हॉटपॉटमध्ये ठेवले. ‘पोहे केलेत खाऊन घ्या,’ अशी चिठ्ठी डायनिंग टेबलवर ठेवली. हे आले. त्यांनी पाहिलं. मग पिशवीतून लालभडक जास्वंदीची चारपाच टवटवीत फुलं, दोन मोगऱ्याचे गजरे काढून टेबलवर ठेवले. ‘आज बाजारात गुलाब खूपच महाग आहेत. म्हणून स्विमिंग टँकच्या काठावर असलेल्या झाडांची ही जास्वंदीची फुलं व्हॅलेंटाइनची भेट’, अशी चिठ्ठी टेबलावर ठेवली. गुलाब नसल्यामुळे मला थोडा रागच आला. मी घुश्श्यातच बाहेर झाडांना पाणी घालू लागले. ‘ह्यां’नी थोडा वेळ आतबाहेर येरझाऱ्या घातल्या. मी फुलं स्वीकारत नाही, डोक्यात माळत नाही, दोन शब्द बोलत नाही, हे बघून सरळ जास्वंदीची फुलं देवांना वाहिली. मोगऱ्याचे गजरे विठ्ठल-रुक्मिणीच्या गळ्यात घातले. मग काय नुसती धुसफुस, धुसफुस. दिवसभर असाच उंदरामांजराचा खेळ सुरू होता.

त्याचाही मला रागच आला. पण तेवढ्या रागानंसुद्धा माझ बीपी थोडं वाढलं. चेहरा लाल दिसू लागला. थोडी धाप लागू लागली. मग मात्र ‘ह्यां’नी हाताला धरून कोचवर बसवलं. मोठा ग्लास भरून लिंबू सरबत करून आणून दिलं आणि म्हणाले, ‘अगं, किती नव्याच्या मागं धावतेस? सोड ना ते! या वेगवान जीवनात प्रत्येक जण प्रचंड बिझी झाला आहे, स्पेस स्पेस म्हणत सगळ्यापासून एकटा पडत चालला आहे. प्रत्येक जण आपापल्या व्यापातून हा एक दिवस का होईना एकमेकांसोबत राहतात, प्रेम व्यक्त करतात, गिफ्ट देतात, घेतात. हे योग्यच आहे. ही सारी या काळाची गरजही आहे. पण आपणही आपल्या आयुष्यात खूप गमतीजमती केल्याच ना? आपण सगळं आयुष्य सुखदु:ख, आनंद एकमेकांच्या साक्षीने कसं भरभरून जगलोच की. आपल्याला कधी ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्यासाठी काहीही करेन,’ असं वेगळं सांगण्याची गरज वाटली नाही. एकमेकांना सांभाळत साऱ्या भारतभर तीर्थयात्रा केल्या. सुंदर क्षण एकत्र घालवले.

मग मी दवाखान्यात होतो. डॉक्टरांनी चोवीस तासाची मुदत दिली होती. तू माझा हात हातात घट्ट पकडून ठेवलास आणि त्या विश्वासावर मी मृत्यूच्या दाढेतून परत आलो. बीपी वाढून तुला दवाखान्यात ठेवलं तेव्हा मी किती कावराबावरा झालो होतो. तुझ्याशिवाय माझं आयुष्य कसं असू शकतं? काही कळतच नव्हतं.

‘ह्यां’ची त्या वेळची मन:स्थिती आठवून माझ्याही नकळत मी खुदकन हसले तसे तेही हसले. हळूच खिशातून एक छानसा बॉक्स काढून हातात ठेवला. आणि म्हणाले, ‘हॅपी व्हॅलेंटाइन डे.’ मी उघडून बघितला तर त्यात मसाज स्प्रे आणि त्या खाली गुडघ्यांना घालण्याची नी कॅप.  तुझे गुडघे सतत दुखतात म्हणत असतेस ना, म्हणून. मग मीही उठून कपाट उघडून त्यांना एक छानसा रंगबिरंगी मऊसूत मफलर भेट म्हणून दिला. ‘ह्यां’नी माझ्या गुडघ्याला नी कॅप चढवल्या. मी त्यांच्या गळ्यात नवीन मफलर गुंडाळला. मिळालेल्या भेटीचा उबदारपणा अनुभवत शांतपणे एकमेकांसोबत हातात हात धरून नि:शब्द बसून राहिलो. आमच्या भावना व्यक्त करायला आता शब्दांची किंवा इतर वस्तूंची गरज राहिली नव्हती. आमचा व्हॅलेंटाइन डे अनुभवाच्या, सामंजस्याच्या आणि विश्वासाच्या जोरावर आम्ही साजरा करणार होतो.
 
undalesuvarna@gmail.com
बातम्या आणखी आहेत...