आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला त्याचे आईवडील, भावंडांसोबत मिळणारा मोकळा वेळ, खूप दिवसांनंतर जमणारी गप्पांची भट्टी, मित्रांच्या - नातेवाईकांच्या भेटीगाठी, वेळापत्रक नसलेलं रूटीन आणि बरंच काही... हे पुरुषांचं माहेरपणच की.
 
रेल्वे स्टेशन माणसांनी तुडुंब भरले होते. जिकडे पाहावे तिकडे रंगबिरंगी लहान मुलं, वयस्कर वडीलधाऱ्यांना सांभाळत रेल्वेची वाट पहात उभी असलेली अगणित माणसंच माणसं दिसत होती.

बघता बघता दणदण जोरात आवाज करत रेल्वे स्टेशनात आली. हळुहळू थांबेपर्यंत लोकांनी सामानासकट चढण्यासाठी धावपळ सुरू केली. 

अशोकने सगळे सामान उचलले. अरुंधती दोन्ही मुलांचे हात धरून त्याच्या मागे मागे चालू लागली. रिझर्व्हेशन असल्याने सीट मिळण्याची काही काळजी नव्हती. गर्दीतून रस्ता काढत अशोक व अरुंधती आपल्या आरक्षित सीटपर्यंत पोहोचले. अशोकने सीटखाली सामान नीट लावून टाकले. दोन्ही मुलांना खिडकीजवळच्या सीटवर बसवले. पाण्याची बाटली, चॉकलेट, बिस्किटं, सगळं घेतलं ना याची परत एकदा खात्री करून घेतली. आईला दमवायचं नाही. हट्ट, खोड्या करायच्या नाहीत, अशी पोरांना ताकीद देऊन आणि ‘तूही उन्हात मैत्रिणींकडे, इकडेतिकडे जास्त फिरू नकोस. जरा आईकडे निवांत राहा,’ असं अरुंधतीलाही समजावून झालं. मे महिन्याच्या सुट्टीसाठी अरुंधती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघाली होती, माहेरच्या आठवणींने आताच तिचा जीव गलबलून येत होता. तिथं गेल्यावर हे सांगायचं, ते बोलायचं. जुन्या शाळेतल्या मैत्रिणींना आवर्जून भेटायचं, गप्पांची मैफल सजवायची, बंद असली तरी आपण शिकलेल्या शाळेत चक्कर मारायची, मुलांना बागेत न्यायचं, आपली हुशार गुटगुटीत देखणी मुलं सगळ्या पाहुण्यांच्यात नेऊन दाखवायची, वगैरे कायकाय.

त्यांचं संस्कृत श्लोक, मराठी गाणी, इंग्रजी कविता स्पष्टपणे न भिता म्हणणं, त्यांचं पाठांतर सगळ्यांना ऐकवायचं, मुलांना चांगलं वळण लावल्याची त्यांच्याकडून पावती घ्यायची. सासरी मी, माझा नवरा, माझी मुलं आम्ही अगदी सुखी कसे आहोत, हे ठासून सांगायचं. अरुंधतीच्या मनात विचारांची गर्दी उसळली होती. मनानं ती केव्हाच माहेरी पोहोचली होती. गाडी सुरू झाली, हळूहळू वेग घेतला. टाटा करत अशोकने निरोप घेतला. किल्ली फिरवत रमतगमत तो स्टेशन बाहेर आला पार्किंगमधून स्कूटर बाहेर काढली. गाडी सरळ मार्केटकडे वळवली. बाजारातून पडवळ, अळूची पानं, गवार, वांगी अशा स्वत:च्या आवडीच्या भरपूर भाज्या घेतल्या, आंबे घेतले, केक, पेस्ट्री, क्रीम रोलही थोडं थोडं घेतलं नि आरामात घरी आला. बायकामुलं नसल्यामुळं घर कसं मोकळं मोकळं वाटत होतं. मोठ्यांदा गुणगुणत आईशी गप्पा मारत दाढी आटपली, आरामात आंघोळही केली. तोवर आईचीही अंघोळ देवपूजा झाली होती. कपडे करून दोघेजण गाडीवर कोपऱ्यावरच्या इडलीगृहात गेले. गरमगरम इडली, वडासांबार पोटभर खाल्ले. आईला गावातच राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे सोडलं नि आपण ऑफिसला गेला. 

संध्याकाळी ऑफिसातून येताना आईला मावशीकडून पिकअप करून दोघेही बाहेर पडले. गाडीवरून सरळ चौपाटी गाठली. खूप काही चटकमटक खाणं झालं. मायलेकरांच्या अखंड गप्पा चालूच होत्या. अगदी बारीकसारीक गोष्टीही दोघं समरसून एकमेकांशी बोलत होते. जणू त्याच्या लग्नाआधीचे दिवस परत आले होते. अरुंधती जीवनात येण्याअगोदर मायलेकरांचं एक वेगळं विश्व होतं. दोघांच्या कितीतरी आवडीनिवडी समान होत्या. अरुंधती आली नि कितीही म्हटलं तरी मायलेकरात एक लक्ष्मणरेषा आखली गेली. अाईला मुलाच्या आवडीची भाजी करायची असायची नि त्यालाही आईच्या हातची खायची असायची. अरुंधतीला हे पटकन लक्षात यायचं नाही. ती आपण हे असं करू या म्हणालं की,  सगळं मनात राहायचं. घरात उगीच छोट्या कारणावरून कुरबूर नको म्हणून दोघंही गप्प बसायचे. पण आता तसं नव्हतं. अशोक ऑफिसमधून घरी आला की, आईला घेऊन कुठं पार्कवर, पाहुण्यांच्यात, व्याख्यानमालेला सोबत जात होता. मधे एकदा दोघं छानशा नाटकालाही जाऊन आले. आईची बारीकसारीक खरेदी करून दिली. अरुंधती दुष्ट स्वभावाची होती असं काही अजिबात नव्हतं. पण तिच्याही काही जगण्याच्या, संसाराच्या कल्पना होत्या. नवऱ्याबद्दल अपेक्षा होत्या. आपण येण्याअगोदर या दोघांचेही काही विचार असू शकतात, हे मात्र तिच्या लक्षात येत नव्हतं.

माहेरी ती गेली, सुट्टी उपभोगली तसंच यांनीही माहेरपण अनुभवलं.
आज अशोक रेल्वे स्टेशनवर आला होता. अरुंधती नि मुलं माहेरहून परत येणार होती. आता मात्र तो त्यांना खूप मिस करत होता. तिची नि मुलांची उत्सुकतेनं वाट पहात होता. सासूबाईही खूष होत्या. खूप दिवसांनी सूननातवंडं येणार म्हणून त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करून त्या वाट पाहात होत्या.
 
- सुवर्णा उंडाळे, सोलापूर
undalesuvarna@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...