आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swati Dharmadhikari Article About Balance In Life

'सिक रोल' नको, 'रसिक रोल' हवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘किती पुस्तकी लिहिता हो तुम्ही,’ हे वाक्य ऐकून मी आत्मचिंतनाला सुरुवात केली. पण लक्षात यायला लागलं की मानसशास्त्रात पुस्तकी आणि व्यवहारी असे दोन भाग नसतातच. जगात वेगवेगळे लोक असतात त्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. असणारच. अशा प्रतिक्रियांना सोडून देणेच योग्य. कारण प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगवेगळी, व्यक्तिमत्त्व वेगळे, हे मान्य करण्याचाच हादेखील एक अपरिहार्य भाग समजून सोडून द्यावं असं ठरवलं तरी, आपण जे वाचतो त्यापैकी काही व्यवहारात आणता येईल की नाही हे न जोखता सरसकट पुस्तकी लिखाण हा ठप्पा मारून लिखाणाला निकालात काढणारे बघितले की कीव येते त्यांची. कळायला लागतं की अत्यंत कठोर/कर्मठ भूमिका घेत जगणं ही त्यांची सवयच असते, किंवा लवचिकता या शब्दाचं वावडंच असावं त्यांना! ही मनाची लवचिकताच आपण इतरांबरोबर समायोजित होऊ शकू की नाही हे ठरवत असते!
जगात टोकाची भूमिका घेऊन एकांगी वागणारे जसे असतात तसेच मध्यममार्ग स्वीकारत चित्तवृत्ती प्रसन्न ठेवणारेदेखील असतातच की! जगायचं कसं हा प्रश्न त्यांना पडत नाही, कारण आनंदाने प्रत्येक क्षण आणि वेळेचा कण मधुसंचयासाठी वापरणारे हे लोक स्वत: तर आनंदी असतातच, आपल्याबरोबर इतरांसाठीदेखील मधाची कुपी भरून ठेवतात. मला मग एरिक्सन आठवायला लागतो. एरिक एरिक्सन या मानसशास्त्रज्ञाच्या मते आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला विशिष्ट असे प्रश्न, संघर्ष सोडवायचे असतात. त्यापैकी एक संघर्ष असतो जो खास प्रौढ आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा बनतो! या महत्त्वाच्या वैचारिक संघर्षामध्ये आपण जीवनात सतत विषाद, निराशा, नकारात्मकता यांनी ग्रस्त राहाणार, की आपण आपल्या जीवनानुभवाच्या मंथनातून काही रत्न शोधणार हे ठरवायचं असतं. जीवनरूपी समुद्राच्या मंथनातून बरंच काही निघणार, अगदी हलाहलदेखील निघतंच मंथनातून, पण त्या बरोबरीने प्राप्त झालेल्या इतर रत्नांचादेखील विचार व्हावाच की!
माझ्याच बाबतीत असं का होतं, मला आयुष्यात कधी मनासारखं दान पडलं नाही, अशी विचारसरणी बाळगणारे रडतराऊत बघितले की वाटतं यांना आयुष्यात सुख कधीच मिळालं नसेल का की समाधानी वृत्तीच त्यांनी अंगी बाणलेली नाहीय?
अनेक कार्यशाळांमध्ये जेव्हा मी प्रश्न विचारते की तुमच्या दु:खाकरता परिस्थिती जबाबदार आहे असं मनापासून किती जणांना वाटतं; तेव्हा अर्ध्याहून अधिक जण हात वर करतात. चक्क भांडतात. म्हणतात आमच्या वाट्याला दु:खच येतं हो. ‘मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे,’ वगैरे. मग हे कसं अयोग्य आहे हे पटवण्यासाठी अगदी जंगजंग पछाडावे लागते. मात्र जर एखाद्याने/एखादीने मी किती बिच्चारा/बिच्चारी हा विचार डोक्यात एकदा फिट्ट केला असला ना, की कल्याण त्या व्यक्तीचं आणि भोवतालच्या माणसांचंदेखील! असं स्वत:बद्दल, स्वत:च्या परिस्थितीबद्दल नाराजीचे सूर काढणारे सतत तणावयुक्त जीवन जगतात आणि दुसर्‍यांसाठीदेखील वेदनाच निर्माण करतात.
दु:खांचे डोंगर असूनही एखादी स्त्री हसतमुख असते, स्वत:ला प्रफुल्लित ठेवते. याउलट थोडंसंही मनाविरुद्ध काही झालं तरी सहनशक्ती नसल्याने खट्टू होणार्‍या व्यक्ती बघितल्या की त्यांच्या आयुष्याचं वाट्टोळं होतंय असं लख्ख दिसायला लागतं. मुळात जगण्यातली उमेद हरवायला नको, नाही तर कशातच अर्थ उरत नाही! जे टक्केटोणपे मिळतात त्यातून तावूनसुलाखून निघणारे, बावन्नकशी स्वर्णिम लोक टिकतात.
घरगुती हिंसा किंवा जिवलगाचा मृत्यू, मनाविरुद्ध जगावे लागणे, तत्त्वांना मुरड घालून जगावे लागणे अशा कोणत्याही कठीण परिस्थितीतूनही फिनिक्स पक्ष्यागत परत नवीन उभारी घेत भरारी घेणारे जगतात. बाकी जगतच नाहीत कारण स्वत:च्या क्षमतेबद्दल विश्वासच नसतो. मला जमणार नाही, मला कसं येईल, लोक काय म्हणतील, असे असंख्य प्रश्न हाताशी धरत त्यांचे रडगाण्याचे कार्यक्रम सुरू असतात. आपल्याच भोवती कितीतरी विकलांग व्यक्ती झुंज देऊन पुढे जाताना दिसतात. विल्मा रुडोल्फ या ऑलिम्पिक विजेतीबद्दल ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहीत असेल की जन्मानंतर पोलिओ व अन्य संसर्गामुळे जवळजवळ 12 वर्षं लागली तिला सामान्यपणे चालू लागायला. पण अपंगत्वावर विजय मिळवून अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं तर पटकावलीच धावण्याच्या स्पर्धेत, त्याचबरोबर सर्वात वेगवान महिला धावपटू म्हणूनही नोंद झाली इतिहासात!

पुढील स्लाइडमध्ये, शारीरिक विकलांगतेपेक्षा मनुष्याचं मानसिक दुबळेपणच जास्त घातक