आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swati Dharmadhikari Article About Chaitra Yamini, Divya Marathi

अशीही चैत्रयामिनी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल सुरू झाला की गर्मी वाढत असते. कुठे एप्रिल फूलची धमाल तर कुठे कुल्फी आणि आइस्क्रीमची. कैरी डाळ, पन्हं तर नाहीच चुकलं. आणि मोगरा तर, अहाहा. एकूण काय तर माहौल खुशनुमा होता है! पण त्याच बरोबरीने असलेला परीक्षांचा मोसम विसरून कसं चालेल? पैपाहुणे, लग्नबिग्न, सारंच असतं की अगदी फुलऑन. तर माधुरीपण अशाच एका एप्रिलमध्ये सर्व प्रकारच्या कामांमध्ये आकंठ गुंतलेली आणि एका शनिवारी अतुल तिचा नवरा विचारता नाही, ‘सांगता’ होतो की ‘माधुरी, आज आपल्याला अमुक अमुक ठिकाणी रात्री पार्टीला जायचंय!’ अचानक भस्सकन तीन तास पार्टी करायची म्हटलेलं समजायला आणि मनात झिरपायला जरा वेळच लागला! आणि पहिली अगदी प्रामाणिक प्रतिक्रिया आली, ‘नको नं प्लीज, तू जा, मी जाम थकलेय.’ तरीही मागे लागून लागून रागवून रुसून वगैरे जेव्हा नाइलाज झाला तेव्हा तयार झाली माधुरी जायला.

एका हिरवळीवर मंद संगीतात आणि मंद उजेडात जेव्हा ती दोघं पोहोचली तेव्हा साहजिकच समूह वेगळे झाले. अतिविशाल महिलांच्या त्या सेमी ओळखीच्या समूहात स्वत:ला कुठे आणि कसं फिट बसवायचं या विचारात माधुरी एका सीमेवर रेंगाळली. गारीगार फ्रूटपंचचा स्वाद घेत समोर सहज नजर गेली माधुरीची तर, अर्धा तेजस्वी चैत्र चंद्र शीतल हसत जणू काही तिच्याकडेच बघत विचारत होता, ‘काय कशी आहेस? बरं वाटतंय ना, आलीस ते खरंच छान झालं.’

तिकडे अतुल आपल्या मित्रांबरोबर हास्यविनोदात बुडालेला, माधुरीला आता जरी नऊ वाजत आले असले तरी कोणाला वाढायची घाई नव्हती, सासूसासर्‍यांचं आणि मुलाचं जेवण टेबलवर सेट करून निघताना धांदल झाली तरी आता ती निवांत होती, मनात ते गाण्याचे सूर रेंगाळू लागले. असा निखळ शांत निवांतपणा कित्येक वर्षांत लाभला नव्हता माधुरीला. तिच्या ओठांवर हलकेच स्मित झळकलं तशी अल्पपरिचित समवयीन रेखा विचारती झाली, ‘काय सुरुय मनात माधुरी, ये की इकडे.’ तिचं बोलणं ऐकू न आल्यासारखी माधुरी उंच झाडांच्या मधून डोकावणार्‍या त्या देखण्या चंद्राच्या मोहिनीतच गुरफटलेली. मनात किती तरी गाणी पिंगा घालायला लागलेली आणि चक्क एक कवितादेखील उमलायला लागली मनात.

कधी जागवी मैत्री, कधी चटके देतो चांद
कधी सौख्याची बरसात कधी चंदन होतो चांद
जहर प्राशिता, शीतल स्नेहल छाया होतो चांद
जन्मच अवघा तारण, केवळ प्रेम मागतो चांद!
चक्क पेपर नॅपकीनवर लिहिल्या या ओळी माधुरीने! आज असा स्वत:चा ‘पैस’ मिळणं ही त्या पार्टीची देन होती माधुरीला. आज तिला विलक्षण शांत निवांत वाटत होतं! कितीतरी महिन्यांनी अशी कविता उमललेली. असे निवांत क्षण जे केवळ आपलेच असतात, किती आवश्यक असतात हे आपण जगण्याच्या धकाधकीत विसरूनच जातो नाही?

माधुरीच्या गॅलरीमधून हाच चांद कितीदा तरी डोकावून गेला असणारच, पण असा भेटायला आणि भिडायला मात्र स्वत:शी निवांत असायला हवं असतं आपण. भोवती किती तरी सुखदायक, आनंददायक गोष्टी असतात. आपण त्या बघून न बघितल्यासारख्या करतो. त्या निलगिरीच्या झाडाला एखाद्या पाखराचं घरटं सांभाळताना बघत नाही आपण, नेहमीची तगर उन्हाळ्यातदेखील शुभ्र फुलांनी डवरलेली असते, आपण नोंदच घेत नाही. घरांभोवती किलबिलाट करत चैतन्याची गाणी गाणारी पाखरं आपल्या नजरेत येतात ती जेव्हा आपण निवांत असतो तेव्हाच.

आपल्या आयुष्याला परत एक गती देण्याचं सामर्थ्य असू शकतं या निवांत क्षणांत, मात्र जगण्याच्या धावपळीत निसटून जातात असे क्षण जे आपले असू शकतात, ज्यात आपणच आपल्याशी संवाद साधू शकतो. या संवादातून स्वत:ला न्याहाळून बघतानाच काय काय गमावतोय, काय निसटतंय याची कल्पना येऊ शकते. असा अवकाश ही सर्वांची गरज असते. जेव्हा त्याची गळचेपी होते तेव्हा आपण कातावायला लागतो, चिडचिड होऊ लागते, अस्वस्थ वाटू लागतं, क्वचित निराशेचे ढग पण घेरायला लागतात.

माधुरीला पार्टीहून परतताना अतुलची दादपण मिळाली, ‘आज खूप मनापासून एन्जॉय केलीस ना तू पार्टी?’ माधुरी त्यावर फक्त गालातल्या गालात हसली. अतुलला त्या स्मिताचे अर्थ कळले की नाही देव जाणे, पण माधुरीला मात्र ताजा श्वास आणि नवीन दृष्टी मिळाली, कोणत्याही प्रसंगी गरज असेल तसा स्वत:चा पैस मिळवण्याची आणि निसर्गातून ऊर्जा मिळवायची. ती रात्र दोघांनी नव्याने अनुभवली हे सांगणे न लगे!

कित्येक व्यक्तींना दिलखुलास नाही बोलता येत नातेवाइकांशी. त्यांना समजून घेऊन माणूसघाणे वगैरे लेबल्स न चिकटवता जरा मोकळेपणा मिळू दिला, त्यांचा अवकाश जपला की त्यादेखील माधुरीसारख्या ताज्या होऊन आपल्या जगण्यात आनंद निर्माण करतील हा विश्वास ठेवूया. चंद्र तोच असतो रोज, सारं जरी तेच तेच असलं तरीही मग नवं वाटू लागतं.
‘...रोजचेच हे वारे, रोजचेच तारे
भासते परि नवीन विश्व आज सारे’
मंगेश पाडगावकरांनी जरी ही किमया स्पर्शाची आहे असं म्हटलं असलं तरीही जरा धाडसाने म्हणावसं वाटतं की आपलाच हात आपल्या हातात घेऊन जरा निवांत जगलं कीदेखील हाच अनुभव येतो!

भेटूयात की आपणच आपल्याला. अशीच एखादी तरी चैत्रयामिनी सर्वांना लाभो हीच शुभेच्छा!