आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Swati Dharmadhikari Article About Changing Form Of Ganesh Festival

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बुध्दी दे...'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी तीनतीनदा दोन्ही डोळे चोळले तरीही साक्षात मंगलमूर्ती गणेशच स्वप्नात आल्याचे निश्चित झाले. विश्वास बसेना. चिमटे घेतले स्वतःला तरीही, तेच कृपाळू डोळे आणि सर्वांचं ऐकणारे कान, तेच ते गुपितं पोटात ठेवणारं मोठ्ठं पोट आणि कुठे काय चाललंय याचा सुगावा हमखास लावणारी सोंड. सवयीने हात जोडले.

मी म्हटलं, ‘गणराया कशापायी झालात माझ्यावर एकदम प्रसन्न?’ तर म्हणे, ‘तू कशातही गर्क नाहीयेस, आणि जरा निवांत वाटतेय, काय लिहावं याचा विचार करते आहेस ना? म्हणून तुझ्याशी बोलावंसं वाटलं बघ, माझं मनोगत सांग साऱ्यांना. बाकी सारे काही ना काही कामात मग्न. कुणी डेकोरेशनमध्ये, कुणी हारतुरे करण्यात, कुणी वर्गणी गोळा करण्यात, तर कुणी कोणता डीजे आणायचा हे ठरवण्यात व्यग्र. तू लेखणी हाती धरलेली, दिसलीस म्हणून आलो, नसेल वेळ तर जातो बापडा.’

मी लेखणी बाजूला ठेवली. हनुवटीवर हात ठेवून ऐकू लागले. बाप्पानी तर गप्पांचा सपाटाच लावला. जे चाललंय त्याबद्दल टिळक कसे दु:खी आहेत, विजेच्या अपव्ययानं सर्वांना कसा भुर्दंड बसतो, कानठळ्या बसवणाऱ्या भोंग्यांनी कसं ध्वनिप्रदूषण वाढतंयपासून तर सार्वजनिक गणेश उत्सवाचं बीभत्स स्पर्धेत होणाऱ्या रूपांतराबद्दल खेद व्यक्त केला गणरायांनी.
ते ऐकून मला पण खूप वाईट वाटलं. एवढी बुद्धीची देवताच खुद्द असं म्हणतेय हे काही पटेना. कलेची देवता, इतकी रोषणाई, आरास केलेली असून नाराज का बरं असावी?

हे माझं स्वप्नरंजन आहे, की खरंच खुद्द गणपतीच बोलले माझ्याशी, कळायला काही मार्ग नव्हता. नाही! ज्यांना वाटत असेल मनोभावे की येऊच शकतो साक्षात गणाधीश माझ्याही स्वप्नात त्यांच्यासाठी तसं सही. ज्यांचा नसेल वशि्वास अशा आकार आणि घनता असलेल्या देवांमध्ये त्यांच्यासाठी ते मनाचे स्वप्नरंजन असेल. पण जागी झाले ते प्रश्नांचं मोहोळ घेऊनच. इतकी टोकाची उत्सवप्रियता भारतीयांमध्येच असते का? यावर उत्तर आलं, की उत्सवप्रियता तर सर्व धर्मांमध्ये आहेच की. कुठे ती मूर्ती बसवून तर कुठे हाडामांसाच्या माणसांना संतमहंत मानून उत्सव साजरे केले जातातच. कुठे कार्नव्हिल, कुठे टॉमॅटिना उत्सव... लग्गेच मग ‘यात वाईट काय’ हा प्रश्न उभाच होता मनात. उत्तरही आलंच ताबडतोब, की अशा उत्सवांना जे जत्रेचं रूप येतंय ते चुकीचं म्हणून. ज्या कलेची जोपासना गणपतीला अभिप्रेत आहे ती कला राहते बाजूला आणि धो धो पैशाचाच तमाशा होऊन बसतो सारा. झगमगते दिवे, डोळे दिपवणारे देखावे उभे करायचे आणि दहा दविसांनी मोडून काढायचे. अशा तात्कालिक समाधानाकिरता कोट्यवधी रुपयांचा चुराडा करायचा हे बुद्धीला न पटणारं!