तिकडे
आपल्या यानानं मंगळाला काबीज केलं, इस्रोमध्ये शास्त्रज्ञांना शाबासकी मिळायला लागली, त्या तंत्रज्ञांमध्ये एक स्त्री दिसली तेव्हा केवढा आनंद झाला म्हणून सांगू. एकीकडे मंगळावर स्वारी आणि दुसरीकडे पक्ष संपायचा आहे म्हणून उमेदवारी अर्ज दाखल न करणारे भविष्यातले राज्यकर्ते, एकूणच भारतात नाना रत्ने आहेत हेच खरे!
नवरात्रीची धूम सुरू झालीय, सर्वजणी वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसण्साठी उत्सुक आहेत. गरबा आणि दांडिया नृत्य यांची धमाल आता चालेल नऊ दिवस, आणि मग येईल तो लाडाकोडाचा दसरा. सोन्याच्या पावलांनी. सीमोल्लंघन करायचा दिवस. अत्यंत महत्त्वाचाच. आपल्या घातक मर्यादा वेशीवर टांगायचा दिवस. कितीतरी सीमा अजूनही स्त्रीजन्माला विळखा देऊन असतात, पण लक्षात कोण घेतो?
एक आढावाच घ्यायचं मनात आलं या सीमांचा. जन्मापासून सुरू होतात अटीतटी. साधं नाव ठेवायची वेळ आली तर नकोशी म्हणून नाव ‘नकुसा’, काहीतर जन्माआधीच श्वासांना पारख्या झालेल्या, कितीतरी आया आजही केवळ मुलाच्या माता म्हणून विशेष गौरवान्वित होतात. कितीही आमिषं दाखवली तरीही आजही ‘मुलगी जन्मा आली हो,’ हे काही सर्वदूर सारख्याच सहजपणे पचवलं जात नाहीये. मुंगीच्या पावलांनी बदल येतात पण कित्येक पिढ्या त्यासाठी बळी जातात. जागतिक आरोग्य संघटनाच सांगते, की आजही जगभरात दर एका मिनिटाला एका महिलेचा बाळंतपणात मृत्यू होतोय आणि कारण काय तर आरोग्याबद्दल निष्काळजीपणा आणि आरोग्य सुविधांचा अभाव.
आजही जगातील अशिक्षितांच्या संख्येत जवळपास दोन तृतीयांश महिलाच आहेत आणि शिक्षणातून बाहेर पडणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. कारण अर्थातच घरची जबाबदारी, भावंडांना सांभाळायचं वगैरे. उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीयांत हे प्रमाण जरा कमी होतं. कारण ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी...’ हे त्यांना उमगलेलं असतं. मात्र त्यातूनही विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांना जाणाऱ्या मुलींचं प्रमाण खूप कमी आहे. साधारणपणे मानव्यशास्त्रे, नर्सिंग, शिक्षण यांमधल्या पदव्यांकडेच मुलींचा ओढा दिसतो. अभियांत्रिकीकडे जाणाऱ्या मुलींचं प्रमाण किंचित वाढतंय, ही आनंदाचीच बाब असली तरीही लग्नाच्या मार्केटमध्ये पत वाढवण्यासाठी अशा शिक्षणाची जबरदस्ती होतेय, हेदेखील काही घरांतील वास्तव. लग्नानंतर किती अभियंता मुली आणि डॉक्टर मुली घरी बसतात, हे आसपास डोकावलं तर सहज कळतं.
एक भीषण वास्तव सांगायचा मोह होतोय. संयुक्त राष्ट्र नेहमी म्हणतं, की स्त्रिया एकूण कामांच्या दोन तृतीयांश कामं करतात, मात्र त्यांना जगातल्या एकूण उत्पन्नाच्या फक्त १० टक्केच उत्पन्न मिळते. त्याहूनही अधिक भेदक वास्तव म्हणजे एकूण उत्पादन साधनांपैकी केवळ एक टक्काच साधने महिलांच्या मालकीची असतात. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के असूनही निवडून आलेल्या संसद सदस्यांमध्ये केवळ १६ टक्केच महिला असतात. हे सारं बघितलं, की मन खिन्न होतंच. एकीकडे ‘या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नम:’चा जप आणि दुसरीकडे आपल्या दैनंदिन जीवनातली ही विदारक दरी. स्त्री शक्तिरूप आहे तर त्या शक्तीचा प्रत्यय का येत नाही आपल्या समाजजीवनात?
स्त्रियांवरील अत्याचारांबाबत बोलायचं की नाही या संभ्रमात होते. पण शक्तिरूपाची, तिच्या जगज्जननी असण्याची गोडवी गाताना हे करुण वास्तव आठवत राहतंय, की आजही घराघरांमधून हिंसा चालतेच. पती काय, मुलगा काय, कोणीही तिला मारू शकतं. बलात्कार, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी होणारे अत्याचार अगणित. कोणत्या कारणांमुळे हे घडत असावं? कोणत्या जाचक मर्यादा स्त्रीजीवनाचा गळा घोटताहेत, याचा विचार घराघरांमधून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपणही कुठल्या ना कुठल्या तऱ्हेनी स्त्रीच्या बंधनांना जोपासतोय हे लक्षातही येणार नाही.
आपल्या चित्रपटांमधून, जाहिराती व प्रसार (?) माध्यमांमधून स्त्रीचे चित्रण करताना आपल्या मनीमानसी रुजलेले स्त्री आणि मुलींबद्दलचे पूर्वग्रहच कसे मांडले जातात, यावर एक विस्तृत अभ्यासपूर्ण अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यानुसार स्त्री ही पीडित, शोषित नाही तर दुसऱ्या टोकाची म्हणजे एक तर स्वतः कॉर्पोरेटमधली एक उच्चपदस्थ दाखवली जाते किंवा लैंगिकवृत्ती चाळवणारी हॉट व आकर्षक अशीच असते. सर्वसामान्य स्त्रीजीवनाचे चित्रण, व्यक्तिरेखा निर्माणच होत नाहीत किंवा अत्यंत कमी चित्रपट किंवा मालिकांमधून तसे केले जाते. या माध्यमांचा पगडा जनमानसावर प्रचंड असतो, म्हणून त्यातून सक्षम महिला आणि स्त्री-पुरुषांमधले सौहार्दपूर्ण, जबाबदार वागणे जास्त दाखवले जावे असे नाही वाटत का?
आपल्या जनधारणेतदेखील एक तर देवी नाही तर ‘पैरों की जूती’ अशा टोकाच्या जागा स्त्रीला दिल्या जातात. हे सर्व जळजळीत वास्तव असलं तरीही स्त्रियांची अशी काही जबाबदारीदेखील असणारच ना हे सारं बदलायचं तर?
जी स्वतः चैतन्यरूपिणी आहे, जी सा-या जगताची जननी आहे, तिला स्वतःच्या अस्तित्वाचा वेगळ्याने विचार करायला फुरसत काढायला लागेल. शिक्षण व अर्थार्जन हे तर उपाय आहेतच. पण त्याहूनही मूलभूत बदल व्हायला हवेत ते स्त्रियांच्या स्वतःच्या विचारसरणीत. अंधश्रद्धा आणि बुरसटलेल्या रूढी-परंपरांना तिलांजली देणं पुरेसं नव्हे तर त्यांचं दहन करायला हवंय. स्त्री म्हणजे कोमल, नाजुका आणि सतत कुणाच्या तरी खांद्यांचे आधार घेऊन वाढणारी वेल असल्या खुळचट किंवा प्रसंगी राजकारणी विचारांच्या कुबड्या फेकून देऊन जेव्हा ती स्वतःमधल्या शक्तीचा अनुभव करील, त्या शक्तीचा विधायक कामासाठी वापर करील तो सुदिन! संकुचित विचारसरणीचे सीमोल्लंघन एक नवी शक्ती देईलच!
जी स्वतः चैतन्यरूपिणी आहे, जी सा-या जगताची जननी आहे, तिला स्वतःच्या अस्तित्वाचा वेगळ्याने विचार करायला फुरसत काढावी लागेल. मूलभूत बदल व्हायला हवेत ते स्त्रियांच्या विचारात.