आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swati Dharmadhikari Article About How The Show Must Go On

पुढे पुढे चालावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोष्ट खरं तर फारच वेदनादायक. कमलिनी आणि दिनकर यांची. दोघंही अत्यंत सुखी. लग्न झाल्यानंतर तीन अपत्यं, दोन मुलं, एक मुलगी. सर्वात मोठा अत्यंत हुषार, म्हणजे अगदी गिफ्टेड वगैरे म्हणता येईल असा! लहानपणी कोणत्याही वर्षाच्या कोणत्याही महिन्याची तारीख कोणत्या वारी येते हे बिनचूक कॅलेंडर न बघता सांगू शकायचा. शहरातल्या एका सभागृहात यासाठी त्याचा कार्यक्रम घेऊन सत्कारपण करण्यात आला. दोघं भावंडंदेखील हुशार होती. सर्वांमध्ये छान नियोजित असं चारपाच वर्षांचं अंतरदेखील होतं.

मोठा श्रीकांत अत्यंत जबाबदार, सर्जनशील. उन्हाळ्याच्या सुटीत धाकट्या भावंडांसोबत अल्बम्स कर किंवा काही वेगवेगळ्या देशांची तिकिटं गोळा कर, असं काही तरी चालायचं त्याचं. पहिलं अपत्य म्हणून प्रचंड लाडका. अर्थात असं सार्‍याच घरांमधून आणि सर्वच जोडप्यांचं होत असावं नाही? तर, सर्व काही सुरळीत सुरू होतं, मुलांचे पहिले दुसरे नंबर्स येत असत आणि पेढे वाटून आनंदही व्यक्त केला जाई. श्रीकांत तर मेरिटचा विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जायचं शाळेतून. शास्त्रज्ञ व्हायचं असं म्हणायचा श्री. काळाला हे मंजूर नव्हते बहुधा.

श्रीकांत दहावीला असतानाची गोष्ट. अचानक खूप ताप आला त्याला. खूप दिवस झाले ताप हटेना. अशक्तपणा खूप म्हणून रक्त तपासणी केली आणि कमलिनी दिनकर यांच्यावर जणू दु:खाचा पहाड कोसळला. श्रीकांतला ल्युकेमिया, रक्ताचा कर्करोग झाल्याचं निदान केलं गेलं. दोघांनी सर्व डॉक्टर्सना सल्ले विचारले. कोणी सांगितलं, अमेरिकेत जा. मुंबईच्या प्रख्यात रुग्णालयामधून मात्र सांगितलं गेलं की, तुम्ही कुठेही गेलात तरी यावर हमखास इलाज नाही. (अर्थात ही काही वर्षांपूर्वीची परिस्थिती) आणि गेलात तरी उपचारांनी तो मानसिकरीत्या अपंग (मतिमंद) म्हणूनच जगेल!

हातात काहीही नसल्याने भारतात उपलब्ध उपचार स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. मग कर्करोगाशी झुंज सुरू झाली. रुग्णालयात उपचार घेत असतानादेखील श्रीकांत दहावीचा अभ्यास करत असे. भेटायला येणारे विचारत, ‘श्रीला काय हवं?’ तर याचं उत्तर असे, ‘गणिताचं एखादं छानसं पुस्तक!’ रक्त देणे आणि अन्य इलाज सुरूच होते. भावंडांना काहीही कल्पना नव्हती. त्यालादेखील कदाचितच कल्पना असेल-नसेल, माहीत नाही. पण नातेवाइकांनी संयम दाखवला, त्याच्यासमोर आजाराची चर्चासुद्धा होत नसे. कमलिनी आणि दिनकर एकमेकांना सांभाळत मनावर दगड ठेवून काम करत होते.

त्याही परिस्थितीमध्ये श्रीकांत गुणवत्ता यादीत सव्विसावा आला. कमलिनीने देवाचे आभार मानले, की तो पहिल्या पंचविसात नाही, नाही तर त्याच्या मागे वार्ताहर लागले असते, वर्तमानपत्रातून आजाराची चर्चा त्यांना नको होती.

मात्र, त्याची प्रकृती अकरावीमध्ये ढासळली आणि वर्षही पूर्ण न करू शकता त्याची प्राणज्योत मालवली. संयमाचे बांध आता तुटले होते. दिनकर आणि कमलिनी पहिल्या अपत्याच्या मृत्यूला सहन करायचा आटोकाट प्रयत्न करत होते. जेवताना मग घास अडकायचा घशात. ‘वांग्याची भाजी आवडायची श्रीला,’ कमलिनी म्हणायची. मग घरात कित्येक वर्षं भरली वांगी झालीच नाहीत. कधी तरी श्रीच्या मित्रांच्या गोष्टी समजायच्या. मग शून्यात बघत दिनकर म्हणायचा, ‘आज श्री असता तर तोही...!’
एक विषण्णता घरात सतत पसरलेली असायची ज्यात दोघा लहान भावंडांची होरपळ होत होती. मात्र, त्याकडे आईवडिलांचं लक्षच नसायचं. उदास, निराश झाले दोघंही. त्यांचा पहिल्या पाचांत जरी नंबर आला तरी ‘श्री पहिलाच यायचा’ हे बोललं जायचं. ‘तो असता तर आज आमच्या म्हातारपणाची काठी असता,’ वगैरे बोलताना आपण लहानग्यांकडे अक्षम्य दुर्लक्षच नाही तर अशी तुलना करून त्यांच्यावर अन्यायच करतोय, हे त्यांच्या गावीही नसायचं.
मग साहजिकच लहान भावंडांची चिडचिड सुरू झाली. आपण काहीही केलं तरी आईवडिलांना आनंद नाहीच देऊ शकत, ही एक बोचरी जाणीव त्यांच्या मनाला घेरून उरली. सर्वच घटनांकडे बघण्याचा कमलिनी आणि दिनकर यांचा दृष्टिकोनदेखील नकारात्मक बनला. याचा सर्वात जास्त परिणाम झाला तो वयाने कोवळ्या लहान भावावर. श्रीकांतला गमावल्याने लहान मुलाला दिनकर प्रचंड जपू लागले. कुठेही जाताना ‘जपून, सांभाळून, हळू,’ असे भीतिसूचक बोलू लागले. परिणामी त्याच्या मनात एक अनामिक अस्वस्थता पेरली गेली. अति काळजी करण्याच्या स्वभावामुळे त्याच्यासाठीचे छोटेमोठे निर्णयदेखील पालकच घेत, ज्यामुळे मुलांची निर्णयक्षमताच कमकुवत करतोय हे दोघांच्या गावीही नव्हते. धाकटा मुलगा मनोरुग्णतेच्या काठावर जाण्यासाठी एवढी नकारात्मकता खूप होती.

ही गोष्ट सांगायचं प्रयोजन इतकंच की, कितीही दु:खाचे पहाड कोसळले तरी भोवतालची जबाबदारी न विसरता पालकांनी वागायला हवं. अशी कित्येक उदाहरणं आहेतच, ज्यांनी प्रचंड मानसिक आघात सोसत पालकत्व खूप समर्थपणे हाताळलं. चैतन्य, आनंद आपण निर्माण करत असतो, वाटत असतो. तो आपला जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असतो. मला आज प्रकर्षाने अनाथाश्रमातली कोवळी हसरी मुलं आठवताहेत. भूतकाळाच्या गर्द सावल्या विसरून जीवनाचा स्वीकार करत पुढे जायला शिकायलाच हवं. शांता शेळकेंच्या शब्दांनी परत एकदा स्वत:ला सावरत पुढे चालायला हवं.
जीवन गाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे!
swatidharmadhikarinagpur@gmail.com