आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swati Dharmadhikari Article About Man woman Relationship

तू-तू मैं-मैं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्त्रियांवरील अत्याचारांकरिता केवळ पुरुषच कसे जबाबदार असतील हो,’ हा सूत्रसंचालकाने एखाद्या बाउन्सरप्रमाणे विचारलेला हा प्रश्न. किंवा ‘आता स्त्रिया मुक्त होणार म्हणजे पुरुषांच्या हाती लाटणं येणार,’ अशी वर्षानुवर्षं फेकली जाणारी खवचट वाक्यं असोत, पुरुष आणि स्त्रियांचा नेहमी अशा एकमेकांच्या शत्रूपक्षात असल्यागत विचार केला जाताना बघून वाईट वाटतं. हे असं तू-तू मैं-मैं कशासाठी?


‘स्त्रीमुक्तीमुळे अशी भांडणं वाढताहेत का,’ हा दुसरा बाउन्सर! या प्रश्नाचं बोट धरून स्त्रीमुक्तीची वाटचाल केव्हापासून नेमकी सुरू झाली असावी या प्रश्नावर विचार करायला लागले. खरंच स्त्रीला तिच्या हक्कांची जाणीव कधीपासून असेल झाली? वैयक्तिक पातळीवर भले आधी झाली असेल ही जाणीव, मात्र सामाजिक स्तरावर त्याचं प्रगटीकरण केव्हा झालं याचा मागोवा घेतला तर सहज लक्षात येतं की साधारण चाळीसएक वर्षं सहज झालीत जेव्हा याचा उच्चार विशेषत्वाने सुरू झाला निदान भारतामध्ये! संपूर्ण जगात आधी स्त्रियांच्या समान अधिकारांवर आणि कायद्यातल्या त्रुटी काढून टाकण्यावर विशेष भर होता. त्यानंतर स्त्रियांकरिता शिक्षण आणि कल्याणकारी योजनांवर भर होता, आणि गेल्या दशकात भर आहे तो स्त्री सबलीकरणावर, सक्षमीकरणावर! मात्र, हे घडत असताना त्यांच्यावरील अत्याचार कमी झालेत असं न दिसता भारतात स्थिती आणखीनच वाईट होत चाललेली आढळतेय! स्त्री-पुरुष हे शत्रूगट झालेत का परस्परांचे?


एक काळ होता जेव्हा फक्त मुलींच्या शाळांची पद्धत खूप रूढ होती, अजूनही काही आहेतच शाळा तशा. मात्र, सहशिक्षणाचे फायदे खूप आहेत! कोंबड्याला झाकलं म्हणून उगवायचं जसं नाही थांबत तसं मुलामुलींना एकत्र शिक्षण दिलं नाही तरी जे घडायचं /बिघडायचं, ते होतंच की! खरं तर स्त्री-पुरुष जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा एक उत्साह सळसळतो, जो ऊर्जेमध्ये रूपांतरित केला तर मोठमोठी कामं हसत खेळत होऊन जातात. ऑफिसमध्ये कामं वाटलेली असतात, कोणाचं काम कोणतं हे माहीत असतं, मात्र घरांमध्ये इतके वॉटरटाइट कप्पे नसतात! घरी स्त्रीच्या अपेक्षा तिने नीट शब्दांत मांडल्या आणि संवादातून त्यावर जर अंमल केला गेला तर काय विचारायलाच नको, शांती नादते त्या घरात! मात्र जर तिने नीट स्पष्ट सांगितल्याच नाहीत अपेक्षा की मला घरकामांत मदत हवीय किंवा आणखीन काही तर बाकीच्यांना कसं कळणार काय हवंय तिला ते? आणि न बोलता, न मागता मिळण्याइतके सूज्ञ भोवतालचे नसतील तर मग नाराजी आणि रुसवेफुगवे पाचवीला पुजलेच म्हणून समजा त्या घराच्या.
मुळात स्त्री-पुरुषांची एकमेकांबद्दलची भूमिका जितकी निकोप आणि सकारात्मक पूरक आणि जितकी सहिष्णु असेल तितका आनंद आणि समाधान त्या घरी नांदेल इतकी छोटीशी गोष्टदेखील आपल्या बहुसंख्य घरांमधून मान्य नाही होत. स्त्रीकडून केवळ आणि केवळ राबण्याची अपेक्षा करणारं, असं केवळ मागत राहणारं घर असेल तर त्या घराच्या वळचणीला काळा कुत्रादेखील विसाव्याला यायच्या आधी विचार करत असेल! नेहमी देणा-याची भूमिका वठवणा-या स्त्रीला मात्र क्वचित कोणी काही देत असतं.


ऑफिसमध्ये मारे महिला दिन साजरा करायचा पण घरात मात्र गृहस्वामिनीला विचारायचं नाही की ‘बता तेरी रजा क्या है’ हा दुटप्पीपणा बघितला की वाईट वाटतं. खरं बघता फार काही नको असतं तिला, जराशी खुशी वाटा तिच्यासोबत, तिच्या अपेक्षा ऐका, त्याबरहुकूम वागून तर बघा. ती नाही म्हणणार की माझ्यासाठी उपासतापास करा म्हणून. तिला काही खुपतंय का तेवढं दूर करा की बस, बघा कशी प्रसन्न होते ती! एकमेकांच्या मनातलं ओळखायला शिकणं, हे म्हटलं तर किती सोप्पं, म्हटलं तर महाकठीण! मनकवडे लोक आपल्याला कित्ती आनंद देऊन जातात, न मागता हवं ते बरोब्बर हाती मिळणं /देऊ शकणं यासाठी काही वेगळी सिद्धी थोडीच लागत असते! दुस-यांच्या भावना ओळखायला शिकणं, त्यांच्या बुटात पाय घालून बघण्याची हिंमत ठेवणं हा मानसिकपेक्षाही भावनिक बुद्धीचा भाग! सहजीवनाचा हा तर पायाच! आपापल्या घरांमध्ये असं मन ओळखायला शिकवता येईल का? मुळात हे शिकवावं लागतं का? नक्कीच नाही. हे तर मुलंमुली पालकांच्या वागण्यातून शिकणार. तेव्हा त्यांना जर पालक एकमेकांची काळजी घेताना दिसले तर तेदेखील जोडीदार तसेच विरुद्धलिंगी व्यक्तीचा आदर करायला आणि काळजी घ्यायला शिकतील. उलट जर सतत भांडण बघितलं तर तसंच वागायचं प्रोग्रामिंग होणार. मुलामुलींमध्ये किंवा स्त्री-पुरुषांमध्ये वाद होण्याची कारणं अशी त्यांना मिळालेल्या कुसंस्कारांत आढळतात!
यावर ब-याच जणांना म्हणायचं असणारच की अशी शहाणीसुरती पिढी नाही हो राहिली. पेराल ते उगवेल. हे आशावाद म्हणून ठीक, पण आजकालच्या पोरांचा भरवसा नाही, ऋतूसुद्धा बेइमान, लहरी वागताना बघतेय ही पिढी!
सतत शत्रूगट म्हणून जर स्त्री-पुरुष एकमेकांना बघत राहिले तर तहाच्या शक्यताच संपतील आणि तहहयात ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन’ असं म्हणत बसावं लागेल! शाळाशाळांमधून म्हणूनच मुलामुलींकरिता अर्थपूर्ण आणि जबाबदार सहजीवनाचे धडे असायला हवेत. ज्या जगाचं अर्धं आकाश आणि अर्धं क्षितिज परस्परांमध्ये वाटून घेतोय आपण, त्या जगात एकमेकांची स्वप्नंदेखील जागती ठेवायला मदत करूयात ना?
‘तू-तू, मैं-मैं’ची गाणी म्हणण्यापेक्षा एकमेकांवरच्या प्रचंड विश्वासावर सामंजस्यावर आधारलेली अद्वैताची गाणी म्हणूयात. समाधानाचं आनंदाचं कारंज उचंबळून येईलच!


swatidharmadhikarinagpur@gmail.com