आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swati Dharmadhikari Article About Positive Thinking

न स्त्री स्वातंत्र्य अर्हति ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैष्णवी, वय वर्षं अडीच. दुपारची झोप आटोपली की खाली घेऊन चल, म्हणून आईच्या मागे लागायची. तिला खाली आजोबांकडे जायचं असायचं. त्यांच्या अंगणातल्या झाडांवर बसलेली फुलपाखरं, फुलं, पक्षी, अळ्या, मुंग्या सा-याची तिला ओढ होती. वरती फ्लॅटमध्ये जीव घुसमटत असावा, मोकळं उड्या मारणं, हुंदडणं शक्य नसायचं, म्हणून हा हट्ट. मोकळ्या जागेसाठी! स्वातंत्र्याची ओढ अशी ही आपल्या रक्तातच असते नाही? मोठ्या होत जाताना मात्र कुंपण लादलं जातं, भरारी घ्यायची अनिवार इच्छा तरीही असतेच सदोदित. मधुलिका एक गोड मुलगी, तिला एक लहान भाऊ, मात्र त्याच्यावर हिचीच हुकमत चालणार, आणि स्वभाव इतका बेभरवशाचा की कधी काय करेल याची शाश्वती नाही. मनात असलं तर ऐकणार लोकांचं, मनात नसलं तर आईवडिलांशीसुद्धा वादावादी, हुज्जत घालत राहणार. यावर चर्चा करताना असं तर मुलगेही वागतातच, त्यांच्या अशा स्वभावाची चर्चा मात्र होत नाही, त्याला उलट खूप स्वाभिमानी वगैरे म्हणून गौरवलं जातं, असं एक मैत्रीण म्हणून गेली! मात्र, आजही बहुसंख्य मुली लहानपणापासून सतत घातलेली बंधनं कुरकुरत का होईना पाळत मोठ्या होतात. या मुलींची स्थिती त्या साखळीने बांधलेल्या हत्तीसारखी होते. साखळी बांधलेली नसली तरी तिची सवय इतकी जबरदस्त असते, की मोकळं असूनही आपण बांधलेलोच आहोत, असा कयास करत ते तिथेच उभे राहतात.

तर गोष्ट आहे स्वातंत्र्याची, मनाला मोकळेपणा हवा त्याची. आजही बहुसंख्य घरांत स्त्रीला बंदिनी म्हणून वागवलं जातंय, हे वास्तव काही केल्या मनातून जात नाहीये. भारतीय स्त्रीला पुरुषांप्रमाणेच समान हक्क तर घटनेने दिले, मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याकरता लागणारी मानसिकता सुशिक्षित घरातूनदेखील क्वचितच दिसते. परवा कौटुंबिक हिंसाचार, व्यसनाधीनता या विषयांवर विद्यार्थ्यांनी चौकाचौकातून पथनाट्यं सादर केली तेव्हा प्रकर्षाने लक्षात आलं, की शहरांतूनदेखील अशा असंख्य वस्त्या आहेत जिथे स्त्री अजूनही एक वंचित घटकच आहे. आमच्यापेक्षा आमच्या नव-याला काही सांगा, असं काकुळतीला येऊन वस्तीतल्या महिला म्हणतात, तेव्हा विचार पडतो की कोणत्या स्वतंत्र भारताची गोष्ट आपण करतो कोण जाणे. भारत, असा देश जिथे शिक्षण जरी सारखे असले तरी त्यातून मिळणारे ज्ञान सारखे नसावे बहुधा, असा विचार डोकावून जातोच. अन्यथा सुज्ञ, विचारी अशी माणसे गेली कुठे, असा प्रश्न पडण्याचे काहीच कारण नाही! कधी फेसबुक किंवा अन्य समूहांवर चर्चांच्या फैरी झडतात. मनाने मुक्त वैचारिकरीत्या परिपक्व वगैरे स्त्रिया पण वादविवादात मुक्तपणे बोलत असतात. पण शेवटी स्त्रीपुरुष यांची तुलना आणि स्त्रियांमधला वाढता स्वैराचार यावर गाडी घसरते आणि एकूणच समाजाच्या अधोगतीचं खापर स्त्रियांच्या बदलत्या मानसिकतेवर, वेषभूषा यांवर आणि त्यांच्या वाढत्या आत्मकेंद्री वृत्तीवर फोडून सरसकट मोकळं होतात लोक. अगदी ज्यांना आपण प्रबुद्ध म्हणू असे लोकदेखील. मुद्दा स्त्री विरुद्ध पुरुष असा नसायला हवा. स्त्री मुक्ती म्हणजे पुरुषी वागणं नव्हेच. खरं तर स्त्रीने न संकोचता वागणं अपेक्षित असतं. आजही स्त्रीत्वाबद्दलच्या आपल्या कल्पना पार बुरसटलेल्याच दिसतात. एकीकडे देवी म्हणून उदोउदो तर दुसरीकडे मारपीट. आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच विचारस्वातंत्र्यदेखील अपेक्षित आहे.

महिला दिनानिमित्त संयुक्त राष्‍ट्रांनी या वर्षाकरता दिलेली घोषणा आठवतेय, ‘इन्स्पायरिंग चेंज’ म्हणजे बदल घडवण्यासाठी प्रेरित करणं! खरंच किती गरजेचं आहे ना? बाकी लोकांनी बदलणं आवश्यक आहेच, त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे महिलांनी स्वत:ची परावलंबी मानसिकता बदलणं, छोट्या-छोट्या कामांचे निर्णय घेण्याची हिंमत दाखवणं. स्त्री म्हणजे फक्त तिचा देह नाही, हे आधी महिलांनीदेखील ओळखणं हाही स्त्री मुक्तीचाच एक अर्थ आहे. जाचक परंपरा, अंधश्रद्धांचे जोखड अजूनही नष्ट का होत नसावीत? त्या सा-यांचा महिलांच्या कमकुवत, कमजोर मनोवृत्तीशी काय संबंध आहे, हे ओळखून ते बदलण्यासाठी जाणीवपूर्वक काम करायला हवं. स्वतंत्र भारत म्हणजे ‘न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति’ हे मनुवादी वाक्य आचरणातूनही पुसलेला भारत, हे मात्र प्रकर्षाने आज म्हणायला हवंय!
स्त्रीचे वास्तव चित्र
कोणत्याही देशाच्या नागरिकांच्या स्वातंत्र्याची संकल्पना त्यातला सर्व घटकांच्या मानवी हक्कांची बूज राखणारा देश अशाच पद्धतीने करायला हवी. आज स्त्रियांच्या हक्कांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवतंय ते हेच, की अजूनही घराघरामधून खाप पंचायती वसलेल्या असतात, आणि त्यांचे जाचक निर्णय स्त्रियांना आवाजही न उठवता पाळावे लागतात! हे वाक्य कदाचित मध्यम सुखवस्तू घरांमधील सर्वांना फार टोकाचे, विपर्यस्त वाटू शकेल; मात्र हे वास्तव आहे. मुलींची लग्नं लवकर करून देणं, त्यांच्या शिक्षणाबद्दलची अनास्था हेदेखील आपल्याच भारतात दिसतंय. जरा मुली मेरिटलिस्टमध्ये चमकल्या, की मुलींची परिस्थिती सुधारली, असं नाही म्हणता येणार. कारण एकीकडे या मूठभर मुली, तर दुसरीकडे सातवी- नववीनंतर सक्तीने शिक्षण सोडून घरी बसलेल्या मुली.
swatidharmadhikarinagpur@gmail.com