आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Swati Dharmadhikari Article Positive Things In Life, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोडी परिपूर्णतेची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजारी व्यक्तीला भेटायला यायचं तर रिकाम्या हातांनी कसं जायचं म्हणून मावशींनी घरचे पेरू आणले. त्यात काही छोटे, काही मोठे. मात्र छोटे पेरू असूनदेखील मस्त पिकले होते आणि चक्क स्वादिष्ट होते. काही अर्धे कच्चे होते पण चोचींनी टोचलेले. म्हणजे गोडच. पाखरांना नेमकं कसं कळतं फळ पिकलंय ते कोण जाणे. तर मुद्दा हा की त्या छोट्याशा पिकल्या पेरूंच्या सुवासांनी घर भरून गेलं. पिटुकलं फळ. खरं तर पूर्ण वाढ झालेलं फळ त्याच्या दुपटीनं मोठं असतं, पण हे छोटं फळदेखील खुरटलेलं नव्हतं तर परिपक्वतेची सर्व लक्षणं त्यात होती.
छोटं आयुष्यदेखील किती संपूर्ण असू शकतं ना? वर्षानुवर्षं जगूनही काही जण नुसते असमाधानी, चिडचिड करणारे असतात.
आयुष्यभर तेच ते, तेच ते करत राहतात. एक रूटीनसं झालेलं असतं त्यांचं जगणं. भोवतालच्या सुंदर सुखद क्षणांना जणू काही ते बघूच शकत नाहीत. केवळ लांबलचक आयुष्य म्हणजे पूर्ण आयुष्य समजता येईल का? परिपूर्णता म्हणजे काय? परिपूर्ण जगणं म्हणजे काय हे सारं त्यांना समजत नसावं का? की मनुष्यजन्मात परिपूर्णत्व नसतंच हेच गृहीतक घेऊन बसतो आपण? आपण अपूर्ण श्वास घेतोय हेदेखील आपल्याला प्राणायामाच्या शिकवणीनंतर कळतं, ही खरी गंमत आहे.

लहान मुलांना खूप सारी खेळणी मिळाली, की त्यांना हे खेळू की ते खेळू होतं आणि मग अर्धवट खेळून मध्येच ते खेळणं सोडून ती दुसरं काही खेळायला लागतात, तसं आपलं होत असावं का? काहीच धड पूर्ण न करता एका कामावरून दुस-या कामावर उड्या मारण्यातच सरणार असतं आपलं आयुष्य? एखादं काम हाती घेऊन तडीला नेणं जसं लहान मुलांना शिकवावं लागतं तसं मिळालेलं हे एकमेव आयुष्य अद्वितीय कसं बनवायचं हेदेखील शिकायला हवं.
मुळात प्रत्येक क्षण असोशीने जगणं शिकायला हवं. झाडांची गंमत असते ना, लहान कळ्या किंवा फळं झाडावर राहिली, तरीही खुरटी/छोटी असूनही उमलतात, पिकतात. आपण मात्र जरा काही बिनसलं की हिरमुसून जातो. आपली ध्येयं सोडून देतो. कदाचित कटकट करत राहतो. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वप्न तडीला नेण्याची हिंमत फार थोड्यांमध्ये असते.
एखादं चित्र अर्धवट राहिलं, किंवा अर्धीच कविता सुचली किंवा अर्धाच सिनेमा बघितला की रुखरुख लागते. इतकंच काय, नियमित बघणा-या मालिकेचा एखादा भाग नाही बघता आला की चुटपुट लागून राहते, मात्र तसं जगण्याच्या बाबतीत नाही होत. मुळात आयुष्यात काय मिळवायचं याचेच हिशेब केलेले नसतात. क्वचित मुलामुलींचं शिक्षण, त्यांची लग्नं इथपर्यंत स्वप्नं बघितली जातात. स्वत:च्या अस्तित्वाचा विचार करत, काय मिळवायचं ठरवलं होतं, काय मिळवलं, हा विचार केल्यावर लक्षात येतं, की अरे कित्ती तरी राहून गेलंय, सुटून गेलंय.
या विश्लेषणानंतर अस्वस्थता येते? की आहे त्या परिस्थितीचा प्राप्तसा स्वीकार असतो? अस्वस्थता स्वास्थ्याचं लक्षण समजायला हवी! जर अशा आपल्या सर्व स्वप्नांना सत्यात आणता येणं अशक्यच असलं तर मग त्या परिपूर्णतेच्या संकल्पनेचं काय? की ती कविकल्पनाच म्हणायची?

मॅस्लोची इच्छा आणि गरजांची किंवा प्रेरणांची उतरंड आवर्जून आठवते मग अशा वेळी. आपलं वागणं आपल्या गरजांनी रंगलेलं असतं. आपण आधी आपल्या जगण्याला पोषक अशा गरजा पूर्ण करतो. जसे अन्न आणि जैविक गरजा! त्यानंतर आपण लक्ष देतो, त्या असतात जगण्याला सुसह्य करणा-या सामाजिक गरजा. जशा सहकार्य, स्पर्धात्मकता वगैरे. इथपर्यंत सारेच पोहोचतात, पण यापुढच्या मानसिक गरजा ओळखून, जाणवून त्यांची पूर्तता करणं म्हणजे परिपूर्ण होणं म्हणता येईल.

सामाजिक गरजांची पूर्ती होणं आवश्यक असतंच; पण त्याहीपलीकडे जाऊन स्वत:च्या अस्मितेचा विचार व्हायला हवा. याच अस्मितेच्या विचारांमधून काही खूप मोठमोठी कामं उभी राहतात, मोठ्या कलाकृती निर्माण होतात. आपल्या अस्तित्वाचा अर्थ ओळखून, आपल्यातल्या छोट्या-मोठ्या सामर्थ्यातून किंवा कौशल्यातून काही निर्माण करणं किंवा तसा प्रयास करणं म्हणजे परिपूर्ण जगणं.

हे सोपं वाटतं, पण नसतंच सोपं. कारण एकदा का सुखासीनतेची सवय लागली की अंगाला खार लावून काही नवीन धडपड करून बघायची ऊर्मी मरून जाते. नवनिर्माणाची हौस हवी, मनाला उभारी हवी, मात्र जगण्यातले टक्केटोणपे झेलल्यानंतर या ऊर्मीची धार बोथटच होत जाते. नवनिर्माण म्हणजे काही पैसा ओतून कामं उभारणंच नव्हे तर जी काही आपल्या जवळची संसाधनं आहेत त्यांचा उपयोग करून काही असं काम करणं, ज्यामुळे आपल्याला मन:शांती मिळेल, शिवाय काहीतरी सृजनात्मक करता येईल. ज्याने समाधान मिळेल असं काम आपल्या आयुष्याला सार्थकत्व देणारं असतं.

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:
हा श्लोक म्हणताना आपण त्या संपूर्ण विश्वाचा, संपूर्णत्वाचा एक अंश असल्याचा अनुभव यायचा. मात्र धावपळीत ते श्लोक रोज म्हणणे संपले. मात्र आता जाणवतंय की हे श्लोक किती उपचारात्मक आणि प्रेरणात्मक होते. संपूर्णत्वाचा अंश असलेले आपण आपल्यातल्या कौशल्यांकडे, क्षमतांकडे कानाडोळा करून, अपूर्णत्वच चुचकारत राहिलो तर आयुष्य पूर्ण कसं होईल? पूर्ण, संपूर्ण जगण्यातला आनंद हा सात्त्विक समाधान देणारा. केवळ स्वत:साठी नाही, दुस-यांसाठी पण जगूया हे तर आहेच; मात्र हे करताना स्वत:तल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठीदेखील जीव तोडून प्रयत्न करण्यातली गोडी मात्र अवीट असणार हे निश्चित!
swatidharmadhikarinagpur@gmail.com