आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषवर्तुळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिच्या हातात निवडणुकीसाठी केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त झाल्याचा आदेश पडला, निवडणुकीचं ‘पवित्र’ काम करायला आपल्याला पात्र ठरवलं याचा आनंद मानायचा की, ज्या कार्यालयातून महिलांची नावं वगळूनच या कामासाठी नावं पाठवली गेली त्यांच्या कार्यालयाचं कौतुक ऐकायला मिळत असल्याने स्वतःच्या नियुक्तीबद्दल खेद मानावा, हे तिला कळत नव्हतं. एकूणच निवडणुका हा बिनडोक नसला तरी खतरेवाला मामला असल्याचं ती सतत ऐकत असायची, त्यामुळे जरा धाकधूक होतीच.
 
प्रशिक्षणात सांगितल्या गेलं की, केंद्र सोडता येणार नाही, आदल्या रात्री तिथेच राहावं लागणार! झालं, तिच्या भोवतालचा महिलावर्ग चुकचुकायला लागला. कसं होणार घरचं? स्वयंपाक कोण करणार? यावर कडी म्हणून प्रशिक्षण देणारे एक अधिकारी दर पाच मिनिटांनी एक सुबक डबा उघडून गृहकृत्यदक्ष अर्धांगिनीने दिलेलं मटेरियल खात खात प्रशिक्षण देत होते. तेव्हा तिला प्रश्न पडता झाला की, असं मध्येमध्ये काही खाणं अनिवार्य असल्यास, आपल्याला कोण भरून देईल असा डबा? आणि रात्रभर तिथे राहायचं म्हणजे... असंख्य प्रश्न ‘आ’ वासून उभे ठाकले, सासूबाईंची औषधं, सासऱ्यांचे पथ्य, मुलांची होमवर्क्स, स्वयंपाक? ओह. ‘आलिया भोगासि’ म्हणत ती निमूट झाली!
 
दुसऱ्या प्रशिक्षणाला जाईपर्यंत केंद्रप्रमुख म्हणून जायची मानसिक तयारी, तिची आणि घरच्यांचीही, झाली होती. मस्टरवर सही करताकरता परत हातात आणखी एक ऑर्डर पडली. तिचं नाव केंद्रप्रमुख म्हणून नसून आता ती ‘प्रथम मतदान अधिकारी’ म्हणून पुनर्नियुक्त केली गेली होती. एका अर्थी डिमोशनच. प्यून सांगता झाला, ‘ताई सर्व्याच बायांना अशी ऑर्डर मिळालीय.’ सरसकट सर्व स्त्रिया प्रथम मतदान अधिकारी. म्हणजे त्यांनी रात्री तिथे राहाणं गरजेचं नाही. तिच्या डोक्यात ट्यूब पेटली. तिच्या सहकारी आनंदाने नाचायलाच लागल्या. ही मात्र त्या ऑर्डरचा अन्वयार्थ लावत सुटली. ‘म्हणजे आमच्यावर विश्वास नाही का? हा स्त्रीचा आदर म्हणायचा की, स्त्रीत्वाचं भांडवल करणं मानावं? हा बाईपणाचा शिक्का कोणी मारला आमच्या भाळी?’
 
तिच्या मनातलं वादळ घोंघावतच राहिलं. “जेन्डर ही सामाजिक संकल्पना आहे आणि आपल्या भूमिका आपण शिकत जातो आपल्या भोवतालामधून.” पुढे जे शिकवायचं ते तिला काहीच आठवेना. स्त्रियांच्या वास्तवासंबंधी एका प्रश्नाची उकल करता करता तिला प्रकर्षाने वाटलं आपण, आपलं अस्तित्व, ‘आपले’ (नसलेले) निर्णय, सारंच एक विषवर्तुळ बनून गरगरतंय. 
ना आदि ना अंत.
 
swatidharmadhikari@gmail.com
बातम्या आणखी आहेत...