आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swati Dharmadikari Article About Openess In Relationship

माझे मला कळाया...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रुती आली तीच स्फुंदत स्फुंदत. गळ्यात पडली आणि मनसोक्त रडली. जरा शांत झाल्यावर स्मिताने विचारलं, बयो, एवढं काय झालं? तर डोळ्यात परत जमलेलं पाणी आवरत म्हणाली, खूप दिवस सहन केलं गं, आता नाही होत. स्मिताने तिला पाणी दिलं आणि म्हटलं, आधी बस, पाणी पी आणि मला सांग सगळं सविस्तर. परत परत येणारे हुंदके आवरत श्रुती सांगत गेली. थोडक्यात, ते सांगायचं तर मुळात श्रुती एक साधी सरळ मुलगी. लग्नानंतर घर आणि संसार सांभाळणं हेच स्वप्न असलेली. मात्र, काही दिवसांपासून तिला आपल्याकडे नवरा पूर्वीसारखं लक्ष देत नाहीये आणि त्याही वरताण म्हणजे दुस-या बायकांचं गुणगान करतोय, त्याच्या ऑफिसमधल्या मैत्रिणींशी जास्तच गप्पा होताहेत हे खटकायला लागलेलं.

श्रुतीची चिडचिड वाढायला लागली, तिला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. कशातही मन रमत नाहीये, उगाच रडायला यायला लागलंय. अशा मन:स्थितीत जगण्यात काहीच अर्थ नाहीपर्यंत येऊन पोहोचली ती. मात्र, स्मिताने तीन चारदा टोकल्यामुळे मोकळं बोलायला म्हणून ती स्मिताकडे आली.

असं काय झालं होतं की, श्रुती अशी घायकुतीला आल्यासारखी वागायला लागली असावी? श्रुतीसारख्या असंख्य स्त्रिया आहेत, ज्यांनी आपल्याला केवळ आणि केवळ इतरांच्या नजरेतून बघायचा पर्याय निवडला असतो. अर्थात हा एक भाग झाला, जर श्रुतीने मन गुंतवायला इतर पर्याय निर्माण केले तर नक्कीच ती आनंदी राहू शकेल. मात्र, पती म्हणून श्रुतीच्या नव-याचीदेखील चूक आहेच.

जोडप्यांच्या मनात एकमेकांच्या भूमिका काय असाव्यात? एकमेकांबाबत काय अपेक्षा असाव्यात याबद्दल स्पष्टता नसते. यामुळे जोडीदाराला गृहीत धरले जाण्याचा धोका निर्माण होतो. कुटुंब जीवनाच्या सुरुवातीला सारंच रम्य असतं, मात्र जशी व्यग्रता वाढते, व्याप वाढतात तसे मनस्तापदेखील वाढत जातात. घर कुणासाठी मग एक कोष होऊन जातो, त्यात गुरफटून घेत अशा असंख्य सखी गुदमरत राहतात. हे अपरिहार्य आहे का? कोषातून इतर जसे बाहेर पडतात, तसं स्त्रियांना बाहेर पडणं कठीण का जात असावं? संशयाची भुतं अशी मध्यम वयातच का मानगुटीवर बसत असावीत? हे प्रश्न म्हटले तर सोपे, म्हटले तर कठीण असे आहेत. हे प्रश्न कठीण होतात जर त्यातून बाहेर पडायची तयारीच नसेल तर. हो, कारण असंख्य सखींना मी किती दु:खी हा खेळ खेळायला आवडतं. अशा आत्मग्लानीत वावरणा-या आणि न बदलायचं ठरवून वागणा-या मैत्रिणींना काहीच मदत नाही करता येत. कारण त्या सतत, हो मी असं केलं असतं गं पण... अशा आत्मघातकी वाक्यांच्या कुबड्या घेत राहतात. मात्र, जर परिस्थिती खरंच मनापासून बदलायची असेल तर स्वतःला बदलण्याशिवाय दुसरा चांगला उपाय नाही.
एका इंग्रजी कवितेचा अनुवाद डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केलाय, तो किती सार्थ आहे बघा...
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया. जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय. माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया!

आपण ब-याचदा भोवतालच्या घटनांचे अनर्थच लावत असतो, अगदी क्षुल्लकशी गोष्ट धरून ठेवतो, राईचा पर्वत करतो. त्यामुळे ती छोटी गोष्ट असह्य वाटायला लागते, आपल्याला जगणंच अशक्य करू लागते. श्रुती हे विसरतेय की, नवरा अजूनही सोबत आहे. कुणी दुस-यांना चांगलं म्हटलं, नावाजलं, याचा अर्थ तुमच्याकडे दुर्लक्ष केलंय किंवा तुम्हांला नाकारलंय असा लावू नये हे अगदी लहानपणापासून शिकवायला हवं. कारण नाही तर मग मत्सर, स्पर्धा, स्वत:ला कमी लेखणं सुरू होतं ज्यातून भल्याभल्यांना सावरणं कठीण जातं. श्रुती लहानपणी हे शिकली नसली तरीही विचारांमध्ये बदल करणं मोठेपणीदेखील शक्य आहे, हे तिला स्मिता समजावत राहतेय आणि त्यानुसार श्रुतीही बदलतेय. हे सांगायला समुपदेशकाकडेच जायला हवंय, असं नाही. मैत्रिणीदेखील हे सांगू शकतात. मात्र, अशा मैत्रिणींच्या सल्ल्यांना धाब्यावर बसवून रडगाणीच आळवणा-यांसाठी मात्र समुपदेशनाचे रस्तेच ठीक.

तर श्रुतीनी विचारांमध्ये बदल करायला सुरुवात केली. स्वतःच्या जगण्याला काही तरी वेगळा अर्थ द्यायला हवा, हे ओळखून छोटी-मोठी सामाजिक कामं, वाचक भिशीसारखे उपक्रम तिला मदतीचे ठरले. संशयाचं म्हणाल तर बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्त्री-पुरुषांमध्ये मनमोकळी चर्चा आणि वागणं अभिप्रेत असतं हे वास्तव गळी उतरवण्याशिवाय गत्यंतर नाही, हे श्रुतीला लक्षात आणून द्यावं लागलं. अशा साध्या संबंधावरून आक्रस्ताळेपणा करणा-या महिला नव-यापासून अधिक दूर जातात आणि संबंध विकोपाला जातात, हे जळजळीत वास्तव आहे. अशा वेळी समंजसपणाने वागून एकमेकांना मनमोकळं वागण्याची मोकळीक द्यायला शिकायला हवं. ज्या किंवा जे जोडीदार हे नाही करू शकत, त्यांच्या वैवाहिक जीवनात मग लपवाछपवी सुरू होऊ शकते, हे धोके ओळखून वागायला हवं.

ज्या नात्यात सहजता नाही, ज्यात विश्वास नाही, ते नातं कोमेजू लागतं. संशय मनात घर करून बसला तर भलीभली घरं चुटकीसरशी उद्ध्वस्त होतात. परस्परांवर अलोट प्रेम करणं म्हणजे ती व्यक्ती काय करतेय, कुठे जातेय, कुणाशी बोलतेय यावर हेरगिरी करणं नक्कीच नसावं. तर जगाच्या पाठीवर ती व्यक्ती कुठेही गेली तरीही परत आपल्याकडेच येणार, यावर विश्वास ठेवणं आणि दुसरा पर्याय सुचूच नये म्हणून आपलं नातं, भावना जपणं म्हणजे प्रेम असावं.केवळ जवळीकच नाही तर नात्यात मोकळीकही हवी. त्यासाठी आपण स्वतः जरा सुटं व्हायला हवंय. बांडगुळ बनून जगलो तर नात्याची वेल सुकून जाईल.