आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swati Dhramadhikari Article About Dominating Fathers

बाबा वाक्यं ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समोर बसलेला कॉलेजमधला विद्यार्थी ‘आइन्स्टाइन असं म्हणाला,’ न ‘न्यूटन तसं म्हणाला’ वगैरे कोटेबल कोट सतत फेकून मारत होता. आपण कोणी तरी प्रेषित आहोत, ‘काही तरी विशिष्ट आणि उदात्त हेतूने माझा जन्म झालाय,’ वगैरे भरपूर म्हणून झालेलं त्या आधी!

त्याचं कोवळं वय त्याच्या बोलण्यातून डोकावत होतंच. त्याची कोवळी मिसरूडंदेखील त्याच्या नवशिकं असण्याची साक्ष देत होती. हे असले स्वप्नांत हरवलेले डोळे घेऊन जेव्हा तरुणाई वाटा हरवत असते ना, तेव्हा वाटतं की त्यांची तगमग समजून घ्यायला हवीय, जरा अधिक शांतपणे समंजसपणे! त्यांच्या पालकांचा आक्रोश आणि अट्टहास मग अशा वेळा फोल, पोकळ वाटू लागतो.

स्वप्नाचे अर्थ संपूर्ण कळत नसतात त्या खांद्यांना, कळत नसतात नकाशे त्या स्वप्नांपर्यंत नेणार्‍या रस्त्यांचे. फक्त धमन्यांमधून खेळत असतं अशांत रक्त खळाळत.

त्या खळखळाटाला उथळ समजण्याची चूक करतात पिढ्यान्पिढ्या आणि त्यांची स्वप्नंसुद्धा स्वप्नरंजनच ठरवली जातात. तरीही ती स्वप्नं जागती ठेवून त्यांना जोपासणारे असतातच. त्यातूनच कुणी कुष्ठरोगाशी यशस्वी झुंज देतं आणि भूतलावर आनंदवन अवतरतं. कुणी अग्निपंख घेऊन झेपावत राष्ट्राचं नेतृत्व करतं. किती गरजेचं असतं ना अशा स्वप्नवेड्या, ध्येयवेड्या तरुणाईच्या जोशाला समजणं, कुणी तरी पाठीवर हात ठेवून ‘फक्त लढ’ म्हणणं.

जो म्हणेल मी प्रेषित आहे, त्याला वेडं नकोय ठरवायला. फक्त खुबी/कसब शिकवू त्यांना त्यांच्या मनातल्या इंगित आणि ईप्सितांना ओळखण्याचं. त्या वेड्या डोळ्यांमध्येदेखील शहाणपण लकाकतं, एक वेगळीच चमक असते त्यात प्रकाशून टाकायची भविष्यातल्या उदास अंधाराला. असाच एक युवक समोर होता. त्याच्या स्वप्नांशी दोस्ती केली आणि त्याच्या आईबाबांना बोलवलं त्या स्वप्नांची ओळख करून द्यायला. घाबरत घाबरत तो म्हणाला, ‘माझे वडील येतील का नाही, माहीत नाही. पण आई नक्की येईल. बाबांना वाटतं की ते सर्व बरोबरच करतात.’

त्याचे आणि त्याच्या वडिलांचे संबंध बरेच तणावपूर्ण आहेत हे लक्षात आलं. ते सतत ‘असं कर, तसं नको करू, हेच खा, असेच कपडे घाल,’ करत त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचे, जे त्याला अज्जिबात आवडत नव्हतं. ‘मला लहानपणापासून अखंड बंधनात ठेवलंय, बाबाच ठरवतो माझ्यासाठी काहीही,’ हे वाक्य बोलताना त्याचा नाराजीचा स्वर स्पष्ट जाणवत होता. ‘बाबा मित्र वाटतात का रे?’ यावर तो चूप बसला आणि जरा वेळानी विचारता झाला, ‘या घटकेला तर नाहीये, मित्र होण्याकरता काही येईल का करता?’

नुकताच आपण ‘फादर्स डे’ शुभेच्छापत्र आणि इतर गिफ्ट्स वगैरेंच्या आधारे साजरा केला असेल, नसेलही. पण या मुलामुळे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मुलगे आणि त्यांचे बाबा यांच्यात मैत्रीचे संबंध असणं किती गरजेचं आहे. वडिलांचा धाक असायला हवा हे खरंच पण त्यांच्यात विश्वासही असावा. आपल्याला बाबा कोणत्याही परिस्थितीत समजवून घेऊ शकतीलच, असं म्हणू शकणारे किती युवक असतात? मुलं काय करतात, कसे वागतात, यावर डोळ्यात कॅमेरा बसवल्यागत ‘पोलिसिंग’ करणारे पालक, मुलांच्या मनोविश्वात जागा नाही बनवू शकत. लक्ष असायलाच हवं पण ते ठेवताना भूमिका ही सजग पालकाची हवी, निरीक्षक किंवा पोलिसांची नको हे नसेल का कळत?

समोर बसलेला अभिनव जेव्हा कळवळून डोळ्यात पाणी आणून सांगतो, की ‘मला लहानपणापासून अजिबात स्वातंत्र्य नाही दिलं वडिलांनी, ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’प्रमाणे सगळं त्यांच्याच मनाप्रमाणे करावं लागतं,’ तेव्हा ती गांभीर्याने विचार करायचीच गोष्ट असते. अशी गळचेपी करून मुलं आपलं ऐकत राहाील हा गैरसमज पालकांनी आधी काढून टाकायला हवा, कारण अशा जबरदस्तीतून येतो तो केवळ विद्रोह.

अभिनव त्याच्या वडिलांपासून प्रचंड दूर तर गेलाच, शिवाय तो स्वत:बद्दलदेखील अवास्तव प्रतिमा बाळगू लागला. वडिलांकडून होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर देऊ शकत नसे म्हणून जो अहं दुखावला जायचा, त्याला गोंजारायला म्हणून वडिलांकडूनच शिकलेलं ‘मी कसा बरोबर आहे, मला सगळंच योग्य जमतं,’ अशी आग्रही भूमिका घेऊ लागला; जो त्याचा आत्मप्रतिष्ठा जपायचा एक मार्ग होता. एकीकडे वडिलांकडून सतत टीका आणि दुसरीकडे स्वत:बद्दल अवास्तव टोकाची भूमिका या द्वंद्वात झुलत राहिल्यामुळे ‘मी नक्की कसाय’ हे त्याला व इतरांनादेखील नीट समजेना. याचा परिणाम त्याच्या बारावीच्या गुणांवर झाला.

दहावीमध्ये भरमसाट गुण असणारा अभिनव बारावीला 50 टक्क्यांच्या आसपास मिळवू शकला. दुसरीकडे इंजिनिअरिंगसाठी असलेल्या प्रवेशपरीक्षेत मात्र बरे गुण मिळाले. ही गुणांमधली तफावत त्याच्या द्विधा मन:स्थितीमुळे आली, हे त्या घराला समजावून द्यावं लागलं. अभिनव आणि त्याच्यासारख्या तरुणाईला काय करायचं आहे, हे समजून न घेता सल्ले देणारे भोवतालचे पालक खरंच त्यांच्यावर अन्यायच करतात, अभिनवला अभियांत्रिकीला न जाता कायदा शिकावं असं मनापासून वाटत होतं जे वडिलांना अजिबात पटत नव्हतं. त्याला समाजसेवा करायची होती, तर ते एक खूळ आहे असं पालक म्हणत. ही वैचारिक भिन्नता युवकांच्या गळचेपीला कारणीभूत नको ठरायला.

मुद्दा छोटासा, पण महत्त्वाचा. कोणतेही निर्णय, आपलं मत लादणं टाळून मुलांच्या मनात डोकावूया. बाबालोकांना आवर्जून हे सांगायची हीच वेळ असते, कारण निकालांनंतर डोक्यात राख घालून अद्वातद्वा बोलणारे असंख्य बाबालोक बघितलेत. त्यांच्याशी वाद नको म्हणून आईला ढाल म्हणून वापरणंदेखील बघितलं जे दुर्दैवीच. अभिनव आणि त्याच्यासारख्या असंख्य युवकयुवतींना त्यांचं मन समजून घेणारे बाबालोक मिळोत. त्यासाठी हवा तो मोकळेपणा घराघरात असो, हीच प्रार्थना!
swatidharmadhikarinagpur@gmail.com