आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍मरण असू द्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचही ज्ञानेंद्रियांमार्फत जी माहिती आपण मिळवतो त्या माहितीचा ठसा जितका पक्का तितका अधिक काळ ती माहिती मेंदूत साठवलेली राहते. हा ठसा पुसट होत जाणे, नाहीसा होत जाणे म्हणजे विस्मरण. हा ठसा अधिकाधिक पक्का व्हावा यासाठी पुन्हा पुन्हा उजळणी होणे आवश्यक आहे.  

नाना अभिषेकला गणितं सोडवण्यात मदत करत होते. गणित कसं सोडवावं, हातचा कसा घ्यावा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या बैजिक क्रिया कशा कराव्या हे सांगत होते. अभिषेकला हे सारं जमायचं, पण पाढे पाठ न केल्यानं त्याची गाडी अडायची. गुणाकारासाठी पाढे म्हणण्याची वेळ आली की, तो छताकडे पाहायचा. म्हणताना गोंधळ करायचा. चौथीत शिकणाऱ्या मुलांना दोन ते ३० पाढे पाठ असावेत, अशी शाळेची अपेक्षा होती. पण पाढे काही अभिषेकच्या लक्षात राहत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आजोबांनी त्याला पाटीवर चक्क पाढा कसा तयार होतो याची युक्ती शिकवली. काही पाढे चालीवर शिकवले. जिन्यावर उड्या मारताना त्याला पाढे म्हणायला शिकवले.
 
पाढे हा समजण्याचा आणि स्मरणाचा भाग आहे. आपल्या शाळा-कॉलेजमधल्या परीक्षा या स्मरणकौशल्यावरच आधारित असल्यानं, अभ्यासात या कौशल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुले परीक्षेसाठी जो अभ्यास करतात तो आठवून लिहावे लागते. स्मरणकौशल्य समजावून घ्यायचे असेल तर स्मृती म्हणजे काय ते माहीत करून घ्यावे लागेल. आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांमार्फत जी माहिती आपण मिळवतो त्या माहितीचा ठसा आपल्या मेंदूवर उमटत असतो. हा ठसा जितका जास्त आणि पक्का, तितका जास्त काळ ती माहिती आपल्या मेंदूमध्ये साठवली जाते. आणि स्मरण म्हणजे आपल्याला आवश्यकता असेल अशा वेळी ती माहिती आठवणे. आणि हा ठसा पुसट होत जाणे, नाहीसा होत जाणे म्हणजे विस्मरण किंवा न आठवणे. हा ठसा अधिकाधिक पक्का व्हावा यासाठी पुन्हा पुन्हा उजळणी होणे आवश्यक आहे.
 
आपण पाचही ज्ञानेंद्रियांमार्फत ज्ञान मिळवतो. त्यात डोळे ८३ टक्के, कान ११ टक्के, नाक ३.५ टक्के, जीभ १ टक्का, त्वचा १.५ टक्का, असे १०० टक्के कार्य होत असते. स्मृती चांगली राहावी यासाठी जे एेकतो, वाचतो, लिहितो त्याच्याकडे मुलांचे लक्ष असावे. मुले जेव्हा एखादी गोष्ट पाहतात तेव्हा त्याचा तात्पुरता ठसा त्यांच्या मेंदूवर उमटतो. उदा. शिवराज्याभिषेकाचे चित्र मुलाने नुसते पाहिले तर ती तात्पुरती स्मृती. पण तेच चित्र जर मुलाने एकाग्र होऊन मिळालेल्या माहितीवर लक्ष केंद्रित केल्यास ठसा पक्का होतो. हे चित्र त्या मुलाच्या अल्पकालीन स्मृतीमध्ये जाते. दोनचार वेळा उजळणी केल्यास ते त्याच्या अल्पकालीन स्मृतीमध्ये बराच काळ राहते. आणि सातआठ वेळा उजळणी केल्यास ही माहिती, हे चित्र पुढे सरकते. अशा तऱ्हेने दीर्घकालीन स्मृतीमध्ये जाऊन ते चित्र काही महिने, काही वर्षे राहू शकते. काही गोष्टींचा ठसा इतका वेळ असतो की, तो कायमस्वरूपी आपल्या स्मृतीत जतन केलेला असतो. उदा. नावे, चेहरे इत्यादी. अशा प्रकारे आपण जे ऐकतो, पाहतो, वाचतो ती माहिती दीर्घकालीन स्मृतीत जाण्याची प्रक्रिया झाली तरच आपल्याला आठवते. खूपदा कुठल्या तरी पायरीमध्ये गडबड असल्यानं माहिती स्मृतीत जातच नाही तर आठवणार कशी?
 
स्मरणाची प्रक्रिया : अवधान > वेदनिक स्मृती > एकाग्रता > अल्पकालीन स्मृती > उजळणी > दीर्घकालीन स्मृती > कायम स्मृती अशी होत असते. मुलांची स्मृती तीव्र असते, मध्यम असते, तर कधी सर्वसाधारण स्मृती असते. हुशार मुले नवीन गोष्ट चटकन समजून घेतात. किंबहुना त्यांना ती लवकर लक्षात येते. ज्यांची स्मृती पुरेशी नसते ते अभ्यासभागाची वारंवार उजळणी करतात. असंही म्हणतात की, नुसती हुशारी उपयोगाची नाही तर त्याला परिश्रमाची, कष्टाची जोड हवी. उजळणी, सराव करणे मध्यम, सर्वसाधारण स्मृतीच्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडते. मात्र अशी उजळणी करण्यापूर्वी विषय मुलांना नीट समजावून सांगणे आवश्यक असते.
 
पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ स्मरणासाठी मुलांकरता बऱ्याच युक्त्या तयार करतात. जसे की, आद्याक्षरांची एक ओळ ज्यात प्रश्नांचे विविध मुद्दे असतात. कवितेच्या दोन ओळी ज्यात उत्तरांमधली वैशिष्ट्यं असतात. आकृती, चित्र, फ्लो चार्ट यातून माहिती लक्षात ठेवणे, सामुदायिक पाठांतर, शब्द देऊन त्याला पुढे आणखी एक अर्थपूर्ण शब्द जोडणे, दोन्ही शब्द एकत्र म्हणणे असे खेळ. अशा प्रकारे स्मरणकौशल्याची गोडी वाढवून ते पक्के केले जाते. अभ्यास करताना मोठ्या मोठ्या उत्तराचे छोटे छोटे भाग केले, मुद्द्यांमध्ये रूपांतर केले तर सोपे जाते. क्रमवार, घटनावार लक्षात ठेवणेही फायदेशीर असते. गंमतीचा भाग असा आहे की, कधी खूप अभ्यास करूनही आपण ब्लँक होतो. अशा वेळी त्या विशिष्ट प्रश्नालाच का, कधी, कुठे, केव्हा, प्रश्न विचारल्यानं उत्तराबाबत कुठला ना कुठला क्लू नक्की मिळतो.
 
मुले जेव्हा अभ्यास करतात तेव्हा वाचताना पूर्ण अर्थ लक्षात यायला हवा. वाचताना परिच्छेदातले महत्त्वाचे मुद्दे पेन्सिलीने अधोरेखित करावे. नंतर ते वेगळ्या कागदावर लिहावेत. पूर्ण वाचून झाल्यावर ते मुद्दे पुन्हा वाचावे. अभ्यासाच्या दरम्यान मध्ये विश्रांती घ्यावी. स्मरणात सरावाची भूमिका महत्त्वाची असते. महत्त्वाची सूत्रे, मुद्दे, समीकरणे ही नेहमी दिसतील अशा प्रकारे लावून ठेवावीत. स्मरणशक्ती चांगली असली तरी जेव्हा त्याचा विकास करू, तेव्हा तिचा फायदा होतो. यानंतरचे अभ्यासकौशल्यातले महत्त्वाचे आणि सर्व कौशल्यांचा पाया असलेले कौशल्य म्हणजे विचार. विचारकौशल्य अभ्यासासाठी काय अन् कसे काम करते? बऱ्याचदा पालक, विद्यार्थी, शिक्षक तक्रार करतात की, आमची अभ्यास करण्याची इच्छा असते पण अभ्यासादरम्यानच्या डोक्यात येणाऱ्या विचारांनी मन दुसरीकडेच वळते. विचार म्हणजे काय? ते कुठून येतात? आपल्यावर कसे हुकूमत गाजवतात? आपण त्यांच्या अधीन का होतो? या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी हे समजून घ्यायला हवे की, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार असे विचारांचे दोन प्रकार असतात. तुमच्या मनातील कल्पना, कल्पनांची मांडणी म्हणजे विचार असतात. मुलांच्या मनात अभ्यासाविषयी, अभ्यास म्हणजे बोअरिंग, अभ्यास नाही केला तर शिक्षा होईल. मी परीक्षेत नापास होईल, सगळे रागावतील असे विचार असतात.  आणि ही उत्तरं काळजीपूर्वक वाचली तर लक्षात येईल की, अभ्यास करणे किंवा न करणे याबाबतच्या मुलांनी दिलेल्या उत्तरात पालक, शिक्षक, मित्र, समाज, आहे पण त्या विचारात ते स्वत: कुठेच नाहीत. त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी जेव्हा ते असतील तेव्हाच अभ्यास आनंददायी असेल.
 
ganooswati@gmail.com
बातम्या आणखी आहेत...