आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचन श्रवणकौशल्याचा मिलाप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेत अभ्यास करताना केवळ ऐकणं किंवा केवळ वाचणं महत्त्वाचं नाही. सर्वांगीण आणि परिपूर्ण शिक्षणासाठी वाचन आणि श्रवण या दोन्हीचा सुवर्णमध्य साधणं अत्यंत गरजेचं आहे. प्राथमिक-माध्यमिक शिक्षणात महत्त्वाच्या ठरणाऱ्या वाचन-श्रवण कौशल्याबद्दल जाणून घेऊ या.
 
संध्याकाळी सातच्या मराठी बातम्यांमध्ये बहुतेक सर्व वाहिन्यांवर शाळेच्या पहिल्या दिवशीची लहान मुलांच्या शालेय स्वागताची क्षणचित्रे दाखवली जात होती. कुठे मिकी माऊस, कुठे गुलाबाची फुले, कुठे पेढे, तर कुठे चॉकलेट‌्स देऊन मुलांच्या शाळेचा पहिला दिवस साजरा केला जात होता. काही मुलं भांबावलेली, काही रडवेली, तर काही चक्क रडून गोंधळ घालत होती. काही हट्टानं बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. मला बाबांकडे जायचंय, मला घरी जायचंय, असा धोशा लावत होती. एकूणच मुलं शाळेत यायला फारशी खुश नसतात, असंच चित्र सगळीकडे दिसत होतं. असं असलं तरी हे चित्र बदलायला हवं, हे नक्की. प्रख्यात लेखक पु. ल. देशपांडे एकदा विनोदानं म्हणाले होते की, शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच जागा अशा आहेत, जिथे कुणी स्वत:हून येत नाही, दाखल व्हावं लागतं. यातला विनोदाचा भाग सोडला तर ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल, याचा विचार सगळ्यांनीच करायला हवा. मुलांनी शाळेत यावं, अशी इच्छा असेल तर शाळेत आपण शिकायला जातो, अभ्यास करण्यासाठी जातो, तर मग हा अभ्यास करण्यासाठी जी कौशल्ये आवश्यक असतात ती आपण मोठ्यांनी या मुलांना अगदी सहज शिकवायला हवी.
 
मागच्या लेखात श्रवणकौशल्याबद्दल सूतोवाच केलं होतं. श्रवणकौशल्य सुरू होतं ते अगदी छोट्याछोट्या गोष्टीतून. शाळेत गेल्यावर प्रार्थनेच्या वेळी मुलांना सूचना दिल्या जातात. अशा सूचना बहुतेक वेळा शालेय शिस्तीच्या, शाळेची वेळ, सुट्ट्या, कार्यक्रमासंबंधीच्या असतात. लहान वर्गातल्या मुलांसाठीच्या सूचना त्यांच्या दैनंदिनीमध्ये लिहून दिल्या जातात. मात्र माध्यमिक शाळेच्या टप्प्यावर मुलांनी त्या लक्षपूर्वक ऐकाव्यात, अशी माफक आणि रास्त अपेक्षा असते. श्रवणाचं हे कौशल्य नुसतं अभ्यासापुरतंच नव्हे तर पुढे जाऊन दुसऱ्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीची मनाची संवेदनशीलता आणि संयम यासाठीही उपयोगी ठरतं.
 
शाळेत श्रुतलेखन किंवा डिक्टेशन हे श्रवणकौशल्य तपासण्यासाठी आणि विकसित करण्यासाठीच दिले जाते. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठीच्या प्रवेश परीक्षेतही लिसनिंग स्किलची तपासणी होत असते. श्रवणकौशल्यासाठी बातम्या ऐकणं, भाषण ऐकणं, गाणी ऐकणं या गोष्टींचा प्रयोग घरीही करता येऊ शकतो. या गोष्टी जर पालकांनी जाणीवपूर्वक घडवल्या तर पुढची वाट मुलं स्वत: चालू शकतात. श्रवणामुळे मुलांना काय ऐकावं, कसं ऐकावं, ऐकलेल्या गोष्टीचं उपयोजन कसं करावं, हे समजतं. माझ्या ओळखीचं एक कुटुंब आहे, जिथं मुलांना चित्रपट, नाटकं, भाषणं इत्यादी ऐकल्यानंतर स्वत:चं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि त्यामुळेच बहुधा ती मुलं लक्षपूर्वक श्रवण करतात. लहानपणी खेळला जाणारा कानगोष्टी हा खेळही श्रवणाचाच भाग आहे. आणि मग लक्षात येतं, शिक्षणासाठी, अभ्यासासाठी लागणारी एकाग्रता आणि श्रवण यांचा किती घट्ट संबंध आहे. पूर्वीचं गुरुकुल पद्धतीनं दिलं जाणारं शिक्षण हे संथा पद्धतीनं दिलं जायचं. अर्थात त्यातही श्रवण कौशल्य महत्त्वाचं असतं. याचा अर्थ, त्या काळातही श्रवण पद्धतीचा उपयोग प्रामुख्यानं केला जायचा. दिवसभर आपल्या कानावर पडणारे आणि आपल्याला उपयोगी पडणारे  असतात असे आवाज ऐकता येणं, ओळखता येणं, त्यातील अर्थ समजणं म्हणजे श्रवणकौशल्य. मराठी, हिंदी, इतिहास शिकताना त्यातील महत्त्वाचा म्हणजे स्पष्टीकरणाचा भाग काळजीपूर्वक ऐकावा लागतो, तेव्हाच तो नीट समजतो. अभ्यासाबरोबरच भूगोलातील नकाशे, भूमिती, विज्ञानातील सूत्रे, संस्कृत व्याकरण, श्लोक, सुभाषितं, इंग्रजी भाषेतील शब्दांचे उच्चारण, श्रवणकौशल्यानं समजून घेता येतात. श्रवणानं एक खूप महत्त्वाची गोष्ट मुलं शिकू शकतात आणि ती म्हणजे, बोलावं कसं. मुलांनी काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकलं तर त्या विषयाची रूपरेषा कळते. शिक्षक शिकवताना बोलतात कसं, भावानुरूप वाचन कसं करतात, हे पाहायला हवं. आवाजातील चढउतार, विराम, नाट्यमयता, आश्चर्य व्यक्त करणं, कथन करणं, याचा अभ्यास हौशी, हुशार विद्यार्थ्यांनी केला तर उत्तम वक्तृत्वाचा वस्तुपाठच त्यांना श्रवणातून मिळतो. 
 
रानावनात, जंगलभागात फिरताना मुलं पक्षी, प्राणी, कीटक, अगदी झाडापानांची सळसळ, पाण्याचे खळाळणारे आवाज लक्षपूर्वक आणि आनंदाने एेकतात. अगदी तीच तन्मयता, तेच कुतूहल, तोच आनंद शाळेतल्या शिकवण्यात श्रवण करताना मिळू शकतो. अभ्यास करण्यासाठी आणखी एक छान युक्ती आहे. उद्या वर्गात काय शिकवलं जाणार आहे, याचा अंदाज साधारणपणे मुलांना असतो. तो भाग घरी वाचला आणि नंतर वर्गात शिकवताना त्याचं लक्ष देऊन श्रवण केलं तर त्याचे ठसे स्मृतीवर स्पष्ट होतात. म्हणूनच श्रवणकौशल्य आत्मसात करायला हवं. म्हणजे अभ्यास सोपा व्हायला लागतो. केवळ अभ्यासातच नाही तर मैत्री होण्यासाठी, ती टिकण्यासाठी, नाती फुलण्यासाठी, व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठीसुद्धा श्रवण उपयुक्त ठरतं. अभ्यासकौशल्यामधलं श्रवणकौशल्य वाढविण्यासाठी लक्ष देऊन ऐकायला हवं. एकाग्रचित्तानं ऐकायला हवं. चुळबूळ न करता ऐकणं महत्त्वाचं. आपण जसजसे मोठे होत जातो, तसतशी समोरची व्यक्ती वेगानं बोलत असलेले शब्द समजावून घेण्यासाठी शब्दसंपत्ती वाढवायला हवी. ऐकताना नोट्स अर्थात टिपणं काढायची सवय लावावी. बोलणाऱ्याचं म्हणणं ऐकून घेऊन मगच प्रतिक्रिया द्यावी. ऐकताना बोलणाऱ्याला प्रतिसाद द्यावा. आकलन म्हणून भाषणं, व्याख्यानं इ. ऐकायला हवी. शक्य असेल तिथे डोळे बंद करून ऐकावं. काही वेळा तर मुद्दे रेकॉर्ड करून ऐकत राहिल्यानं, सेल्फ स्टडीसाठी सोयीचं होतं. 
 
विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याबाबत जसे श्रवणकौशल्य आणि एकाग्रता महत्त्वाची आहे, तसंच वाचनकौशल्यही मुलांसाठी महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की, मी ऐकलं नि मी विसरलो. म्हणून नुसतं ऐकून लक्षात ठेवणं सोपं नाही. श्रवणाच्या पुढची पायरी वाचन आहे. शाळेतही ज्या मुलांना वाचन- लेखनकौशल्यं अवगत नसतात, अशी मुलं शाळेत जायला तयारच नसतात. गळतीच्या कारणांमध्येही वाचनकौशल्याचा अभाव हे कारण प्रामुख्यानं दिसून येतं. वाचनकौशल्य विकसित करण्यासाठी शब्दाचं उच्चारण करताना अक्षरं कशी वाचावीत, म्हणजेच फोनिक्सचा उपयोग करावा, हे मुलांना शिकवलं तर वाचन करण्याची आवड निर्माण करता येते. कथनात्मक पद्धतीनं शिकवण्याचे जे विषय असतात, ते वाचनाने समजावून घेतले जातात. 
मुलं वाचन शिकताना अडखळतात. जोडशब्द आले की, घाबरतात. कधीकधी त्यांची बोबडीही वळते. ते बोबडे बोलतात. बऱ्याचदा पाचवी, सहावीत आली तरी मुले नीट वाचू शकत नाहीत. वाचनासाठी मुळाक्षर, शब्द, वाक्य पद्धतीचा उपयोग करतात. एकसारखी अक्षरे, माहितीतल्या वस्तू इत्यादींशी निगडित शब्द, लेखनाच्या दृष्टीनं साम्य असणारी अक्षरे, तसेच आकारान्त, इकारान्त शब्द, चित्र आणि शब्द असे प्रयोग चांगले यशस्वी होतात. वाचनकौशल्यासाठी विविध प्रयोग करता येतात. त्याचा विचार पुढच्या लेखात. एकाग्रतेनं श्रवण आणि वाचन केल्यास शिक्षण घेणं, शिकणं सहज होतं, हे मुलांनी शिकायला हवं. शिक्षणासाठीचे, अभ्यासासाठीचे प्रयत्न करताना कष्ट करावे लागतात, मात्र त्याची फळं मधुर असतात, हे नक्की.
 
 ganooswati@gmail.com
बातम्या आणखी आहेत...