आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक क्षमतेचं काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केरळमधील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियात महिला खेळाडूंच्या आत्महत्येचं प्रकरण बरंच तूल पकडतंय. खेळाडूंनी दबावाखाली केलेल्या या कृत्याचे पडसाद सर्वत्र उमटायला लागले आहेत. त्यामुळे खेळाडूंची मानसिक क्षमता नव्यानं अभ्यासणं गरजेचं आहे.

केरळमधील ‘साई’ संस्थेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या सर्व महिला खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल्स पटकावली होती. मग असे कौशल्य असणाऱ्या या खेळाडूंवर आत्महत्या करण्याची वेळ का आली? आत्महत्येसारखं टोक गाठलं गेलं त्याअर्थी त्या खेळाडूंना झालेल्या त्रासालाही काही तरी ‘हिस्ट्री’ असणार हे नक्की. या प्रकरणात मृत्यू पावलेली खेळाडू अपर्णाच्या नातेवाइकांनी आरोप केलाय की, दोन दिवसांपूर्वी तिच्या कोचने तिला शारीरिक दुखापत केली होती.
अर्थात साईवर अशा प्रकारचे आरोप होण्याची आणि साई वादग्रस्त ठरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी २०१४ मधलं मुंबईच्या साई सेंटरमध्ये ३८ वर्षीय के. बी. सिंग या प्रशिक्षकाला विनयभंगप्रकरणी अटक करण्यात आल्याचं प्रकरण असो किंवा मग ऑगस्ट २०१४ मध्ये मणिपूरमधल्या तक्येलपतमध्ये ५ महिला खेळाडूंनी प्रशिक्षक ओक्रम चोबाविरुद्ध विनयभंगाची केलेली तक्रार असो, नाही तर ऑगस्ट २०१२ मध्ये उत्तराखंडच्या वेटलिफ्टिंग प्रशिक्षक वाय. के. सिंगवर झालेला बलात्काराचा आरोप असो, या सगळ्या प्रकरणातून महिला खेळाडूंना होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक यातनांचा उलगडा नक्कीच होतो.

पण पुन्हा प्रश्न तोच उभा राहतो की इतके प्रकार घडत असताना सरकार काय फक्त धृतराष्ट्राची भूमिका निभावणार? की फक्त क्रिकेटपटूंना सर्व सोयीसुविधा, मानमरातब आिण पुरस्काराच्या मोठाल्या रकमांचे धनादेश वाटण्यातच धन्यता मानणार ? या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी घेण्याबरोबरच सरकारनं गुणवंत खेळाडूंबाबत अशा घटना वारंवार घडणार नाहीत या दृष्टीनं खबरदारीची पावलं उचलायला हवीत. शिवाय साईच्या कोड ऑफ कंडक्टची मदत घेऊन महिला खेळाडूंना अिधकाधिक संरक्षण कसं देता येईल याकडे तातडीनं लक्ष पुरवणं गरजेचं आहे. सध्या तरी या प्रकरणी सरकारनं आपल्या कोर्टातला चेंडू साईच्या डिरेक्टर जनरलकडे टोलवला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे महिला खेळाडूंचा आत्महत्येचा प्रयत्न हा टीआरपी वाढवणारा दृष्टिकोन बाजूला ठेवून या घटनेवर विचार केला जावा. महिला खेळाडू घडवताना कशा प्रकारची भूमिका असावी याकडेही लक्ष वेधलं गेलं पाहिजे. कदाचित मूळ मुद्द्यापेक्षा हे जरा बाहेरचं आहे, असं काही जणांचं मत असू शकेल. पण घटना घडल्यानंतर त्यावर चर्वितचर्वण करण्याइतकंच , किंबहुना त्यापेक्षा जास्त ते महत्त्वाचं आहे. पुन्हा असं अघटित घडू नये म्हणून... या प्रकरणानं एकंदरीतच सर्व क्षेत्रांतील महिला खेळाडू आिण त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत, त्यांच्यावर निर्माण होणाऱ्या मानसिक दबावाबाबत काही प्रश्न नव्यानं उपस्थित केले आहेत. एखादा खेळाडू घडवताना त्याच्या शारीरिक क्षमतेइतकाच त्याच्या मानसिक क्षमतेचाही विचार करायला हवा हे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. खेळाडूंचा मेंटल फिटनेस हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि याकडेच दुर्लक्ष केल जातंय. क्रीडा संघटक आणि मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. खूप कमी जणांना माहीत आहे की भारतीय क्रिकेटचा ‘द वॉल’ समजला जाणारा राहुल द्रविड हासुद्धा बाम सरांकडे मेंटल फिटनेसचे धडे घ्यायचा. शूटिंगमधला किंग गगन नारंगही बाम सरांचे सल्ले घ्यायचा. यावरूनच खेळाडूंच्या मानसिकता सक्षम करण्याची किती गरज आहे हे कळते. असो. एकूणच केरळमधल्या घटनेचा सारासार विचार केला तर सरकार आणि स्पोर्ट््स असोसिएशनने या घटनेच्या खऱ्या कारणांचा विचार करायला हवा. त्यावर कायमचा उपायही शोधावा. कारण महिला खेळाडूंना या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हे एक पाऊल खूप मोठी उमेद देऊ शकते....
नैराश्याचा धोका
आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचे प्रशिक्षकही खेळाडूंच्या मानसिक क्षमतांवर प्राधान्याने विचार व्हायला हवा, असा प्रयत्न करतात. अभिनव बिंद्राचे प्रशिक्षक अमित भट्टाचार्जी म्हणतात, खेळाडू अगदी कमी वयात प्रचंड मानसिक ताणातून जात असतात. दररोज दिवसातील दहाहून अधिक तास ते सराव करतात. स्पर्धेत विजय मिळवणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय असते. त्यामुळे कधी त्यांना नैराश्यही येऊ शकते. सामान्य माणसांचा युवावस्थेचा काळ खूप नाजूक असतो. अॅथलिटच्या बाबतीत तर हे दिवस आणखी कठीण असतात. सामान्य माणसांच्या मानसिक स्थितीपेक्षा कितीतरी वेगळ्या स्थितीतून खेळाडू जातात. एखादा क्रीडा प्रकार कधी तरी खेळणे आणि क्रीडा प्रकारासाठी आयुष्य झोकून देणे यात खूप फरक असतो.

(ghosalkar990@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...