आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swati Pachpande Article About Women And Whatsapp

व्हॉटसॅपिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमच्या मैत्रिणींच्या ग्रूपमधल्या काही जणी संगणकसाक्षर, तर काही अजूनही चाचपडणार्‍या. काही त्यातल्या त्यात सुज्ञ. संवादासाठी गरजेचे आहे ते शिकल्या आणि चक्क त्यात रमल्या. पाहावे तेव्हा त्यांच्या हातात मोबाइल दिसू लागला. मोबाइलला इंटरनेट पॅक हवाच, फोन वापरेन तर स्मार्टफोनच, बाकीच्या डबड्यांना काही अर्थ नाही, असेही तिला वाटू लागले. फेसबुक हाताशी आले, पण व्हॉट्सअ‍ॅपपुढे तेही फिके वाटू लागले. स्टेटस अपडेशनमुळे कोण कुठे आणि काय जेवले इतपत माहितीची भर मेंदूत पडू लागली. मेंदू थोडासा हलायलाही लागला. सारखे मोबाइलवर ‘टुंग टुंग’ वाजणार. मग सखी चष्मा शोधणार, चष्मा चढवणार डोळ्यांवर आणि किलकिल्या डोळ्यांनी ‘नोटिफिकेशन्स’ वाचणार. किती आवाका वाढवून घेतला बाई कामाचा? महिला मंडळातही सगळ्या सख्यांनी स्मार्टफोन घेतले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स बनवले. कोणाला घ्यायचे आणि कुणाला कटवायचे याबद्दल खलबते झाली. कुणापासून काय कसे लपवता येईल याची मोर्चेबांधणी झाली. एकीने साड्यांचे फोटो पाठवले. फोटोतील विलोभनीय साड्या पाहून सगळ्या जणी तिच्या घरी दाखल झाल्या आणि तिच्या साड्या हातोहात विकल्या गेल्या. काही विशेष बातमी वाचली की, काढ फोटो आणि पाठव सर्वांना, असा नादच लागला जिवाला मग. सखी मात्र छान रमून गेली. सख्यांचे बहाणेही मजेशीर असतात हं. हँडसेट खराब होता, डिस्चार्ज झाला असावा, चार्जिंगला होता, मुलांच्या हातात असावा, इत्यादी! एखादी अतिहुश्शार फक्त इतरांचे अपडेट्स पाहून घेते. स्वत: कधीच भाग घेत नाही. मी त्या गावचीच नाही, असे दर्शवते. मग तिला काढून टाकावे का, अशी खलबते ग्रुप अ‍ॅडमिनला करावी लागतात. महिलांच्या हाती एखादे माध्यम आल्यास त्या त्याचा कसा उपयोग करू शकतात हे ‘अ‍ॅप्स’ बनवणार्‍याच्याही डोक्यात आले नसणार!