आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swati Pachpande Article Abut Sleep, Divya Marathi

आदत से मजबूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसभराच्या धावपळीनंतर कधी एकदा रात्र येते आणि आपल्या आवडत्या मखमली निळ्या ब्लँकेटमध्ये गुडुप होते, असे तिला होऊन जायचे. परमसुख म्हणतात ते हेच! आता सहा तास तरी ती स्वत:ची होऊन जाणार याचा तिला परमानंद होत असे. ती एक आधुनिक गृहिणी आणि त्यातल्या त्यात तिला जीवन समरसून जगायला खूप आवडायचे. मग सगळ्या आघाड्या सांभाळताना तसेच सगळ्या डगरीवर एकाच वेळी पाय ठेवण्याच्या अट्टहासाने तिची प्रचंड धावपळ व्हायची. शरीर थकून जायचे पण मन मात्र सतत उल्हसित असायचे. झोपण्यापूर्वी बामचा वास घेतल्याशिवाय तिला गुंगी आल्यासारखे वाटत नसे. घरीदारी तो थोडा चेष्टेचाही विषय असायचा. पण हिला मात्र बाहेरगावी जातानाही बामची डबी पर्समध्ये लागायचीच. आदत से मजबूर ना!

झोप ही माणसाला मिळालेली परमदेणगी आहे. सारा शीण झोपेनंतर जातो आणि परत नव्या उत्साहाने नव्या दिवसाला सुरुवात करता येते. पण या निद्रादेवीची आराधना वाटते तितकी सोपी नसते. बरं का!

विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत ते प्रकर्षाने जाणवते. अंगाईगीत ऐकताच डोळे जड होतात. थोपटले की त्यांना आश्वासक व आश्वस्त वाटते मग ते मूल हळूच निद्रादेवीच्या कुशीत शिरते. डोळ्यांवर प्रकाश नको असतो. काही छकुल्यांना गोष्ट सांगावी लागते. माझ्या एका भाचीला लहानपणापासून तिची मखमली दुलईच लागायची. मोठी झाल्यावरही दुलईशिवाय तिला झोप येत नसे. उच्च शिक्षणासाठी परदेशी निघाली तेव्हा दुलईला सामानात प्रथम स्थान मिळाले.

एका छकुल्याला आईचे केस हातात धरून झोपायची सवय होती तर एकाला आईच्या पोटावर हात ठेवल्याशिवाय झोप येत नसे. एका छकुलीला झोपताना बाही लागत असे. जो कुणी सोबत असेल त्याच्या बाहीत हात घालून ती लगेच निद्रिस्त होऊन जात असे. एकाला तर ब्लँकेटच्या धाग्यांशी खेळ करत झोपी जाण्याचा नाद लागला होता. धागे अंगुलीवर गुंडाळत गुंडाळत तो झोपी जायचा. एकदा तर गंमतच झाली. तो एका परिचिताकडे आईबरोबर आला होता ज्यांच्या टेबलक्लॉथला धागे असलेली किनार होती. तो आईच्या मांडीवरून उठला आणि त्या धाग्यांशी बोटाने खेळू लागला. काय आश्चर्य! तो चक्क उभ्या उभ्या तिथे पेंगू लागला. सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली. एका सोनुल्याला झोप अनावर झाली की तो आईच्या पोटाला आपले ढु लावून झोपी जात असे. एकाला केसांशी चाळा करत झोपी जाण्याची सवय. मग आईने त्याला ‘गंगावन’ आणून दिले व स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केला.

चिंगीला तर कॉलेजला जायला लागली तरी तिचे लहानपणीचे फरचे टेडी बेअरच सोबत लागते. एकांतवासात ती त्याला दिवसभरातील सारे मानापमान, शल्य सांगते. गोलू निर्जीव आहे हे माहीत असूनही. तिला वाढदिवसाला मित्रमंडळींनी नवीन मोठा गोलू देण्याचे ठरवले, पण तिला तिचा लहानपणीचाच गोलू मनापासून हवा असायचा.

कित्येकांना कानात इअरफोन्स लावून आवडत्या संगीतावर स्वार होऊन निद्राधीन व्हायला आवडते. एखाद्या गानसखीला उशाशी रेडिओ लागतो. मग तो रेडिओ बर्‍याचदा झोप लागल्यानंतरही चालूच राहतो. एखाद्या पुस्तकवेड्या सखीला निदान दोन पाने तरी वाचल्याशिवाय झोप येत नाही.

अध्यात्माची आवड असणार्‍यांना देव्हार्‍यातील देवांची नीजआरती केल्याशिवाय झोप येत नाही. तर काही आजीआजोबांना देवाचे नामस्मरण करीत अंथरुणावर जायला आवडते. काहींना ठरावीक जागा, पलंग, उशी असली तरच मनपसंत झोप येते. झोपेचा सरंजाम साग्रसंगीत लागतो. असे हे अजबगजब किस्से निद्रादेवीचे! तिला प्रसन्न करण्यासाठी तिची आराधना करावी लागते. येनकेनप्रकारे तिचा अनुग्रह आपल्यावर झालाच पाहिजे. नाहीतर? विचारही करवत नाही. जागेपणीच स्वप्ने पाहावी लागतील.
swtpachpande@gmail.com