आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी केले मग सांगितले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कचरा व्यवस्थापनाच्या कामात औरंगाबादच्या गौरी, नताशा अन् सनवीरचं झपाटलेपण पाहिलं अन् आपणही काही करून दाखवावं, ही जिद्द मनी निर्माण झाली. या जिद्दीतून आधी घरात प्रयोग केला अन् कंपोस्टिंगचा व्यवसायही उभारला.

गेल्या चार-पाच वर्षांपासून मी पर्यावरण संरक्षण, संवर्धन, व जतन यावर आधारित वसुंधरा फिल्म फेस्टिवलला नियमित हजरी लावते. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा या महोत्सवात सत्कार केला जातो. गेल्या वर्षी दापोलीचे जिल्हाधिकारी रामदास कोकरे यांनी पूर्ण दापोली प्लॅस्टिकमुक्त कशी केली यावरचे त्यांचे प्रेझेंटेशन पाहिले. तसेच रंकाळा तलाव स्वच्छ करणारे उदय गायकवाड यांचे कार्य पाहून या समस्येची व्यापकता जाणवली. आपणही हे काम करावे, असे वाटले. पण सुरुवात कशी करावी, ते कळत नव्हते. काही महिन्यांपूर्वी औरंगाबादच्या विविध भागात 100 टक्के कचरा वर्गीकरण आिण व्यवस्थापन करणाऱ्या सनवीर, नताशा आिण गौरी यांची बातमी वाचली. घनकचरा व्यवस्थापनातील त्यांचे कार्य, त्यांची तळमळ, धडपड, झपाटलेपण आिण त्यांचा या क्षेत्रातला प्रचंड अभ्यास पाहून आपणही त्यांच्या हातात हात देऊन काम करावे, असे मनोमन वाटू लागले. आधी केले मग सांगितले, या उक्तीप्रमाणे मी माझ्या घरापासून सुरुवात केली. जुन्या माठात कंपोस्टिंग सुरू केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जमेल तेवढ्या ठिकाणी, भिशी ग्रूपमध्ये, मैत्रिणींना कचऱ्याचे वर्गीकरण किती महत्त्वाचे आहे, हे सांगायला सुरुवात केली. प्रत्येकाने स्वत:च्या घरापुरते वर्गीकरण केले तर खूप मोठे काम होईल. आपण फक्त एकाऐवजी दोन डबे ठेवले तर कष्ट पडत नाहीत. पण पालिकेने हे करायचे म्हटले तर हजारो घरांच्या कचऱ्याचे वर्गीकरण अवघड आहे. ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करेल, हे पटवून द्यायला सुरुवात केली.
कंपोस्ट करताना सर्वात महत्त्वाची आहे, आपली इच्छा. एकदा मनात पक्के झाले की, कंपोस्टिंग माठात, बादलीत, टबमध्ये, टाकीत किंवा झाडांच्या वाफ्यात, सिमेंटच्या रिकाम्या पोत्यातसुद्धा करता येते. यापैकी कोणत्याही एका साठवणीच्या भांड्यात खाली थोडी माती किंवा कोकोपिट टाकावे. कोकोपिट खत तयार होण्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. त्यावर घरातील ओला कचरा, भाज्यांचे देठ, फळांच्या साली, चहाचा चोथा हे सर्व टाकावे. त्यानंतर मातीचा पातळ थर द्यावा. दर पाच-सहा दिवसांनी हे मिश्रण ढवळावे.असे केल्यास दोन महिन्यात छान दुर्गंधीविरहित खत तयार होते. खत तयार करताना या मिश्रणात फार पाणी होऊ नये, याची काळजी घ्यावी. तसेच मिश्रण अगदी कोरडेही नसावे. त्यात अधून-मधून नीम पावडर टाकावी. फार ओलसरपणा असेल तर तो कमी करण्यासाठी त्यात थोडे वर्तमानपत्राचे तुकडे टाकावेत. लाकडाचा भुसाही चालतो. मी प्रथम आमच्या बिल्डिंगमधील 12 फ्लॅटच्या ओल्या कचऱ्यापासून ड्रममध्ये कंपोस्टिंग सुरू केले. त्यासाठी बिल्डिंगमधील सर्वांचे छान सहकार्य मिळाले. त्यानंतर हळूहळू इतर बिल्डिंगमधील

महिलांनी पुढाकार घेऊन तेथेही कंपोस्टिंग सुरू केले. हे काम करताना एक दिवस वाटले की, आपण जर हे ड्रम व्यवस्थित छिद्र पाडून तयार करून दिले, कंपोस्टिंगसाठी लागणारे सगळे साहित्य दिले तर लोकांना हे काम करणे सोपे जाईल.

मग मी कुटुंबातील सदस्यसंख्येनुसार तीन आकारातील ड्रम विक्रीसाठी ठेवणे सुरू केले. या ड्रमसोबत कोकोपिट, भुसा, कंपोस्टिंग कल्चर, नीम पावडर, मिश्रण हलवण्यासाठी लोखंडी झाडू या साहित्यासोबत कंपोस्टिंगची पूर्ण प्रक्रिया स्पष्ट करणारे माहितीपत्रक देऊ लागले. त्यामुळे लोकांना तो ड्रम नेल्यावर लगेच कंपोस्टिंग करणे सोपे जाऊ लागले. औरंगाबादमधील अनेक बिल्डिंगमध्ये तसेच घरांमध्ये माझ्यामार्फत देण्यात आलेल्या ड्रममध्ये कंपोस्टिंग सुरू आहे. कचऱ्याच्या या एवढ्या व्यापक समस्येत माझा खारीचा का होईना, वाटा आहे, याचं समाधान मिळतं.