आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज कट्‍ट्यावरचा कल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉलेज कट्ट्याच्या आठवणी सर्वांच्याच मनात रेंगाळणाऱ्या असतात. सुट्या असो वा रेग्युलर कॉलेज, ग्रुपमधली धमाल सुरूच असते. नाशिकमधल्या अशाच कॉलेज कट्ट्याबद्दल सांगतेय
आमची वाचक मैत्रीण...

सध्या नाशिकभरात सैराट! आणि घराघरांत सुट्या लागलेल्या मुलामुलींचा गोंधळ अन् गाेंगाट!
‘बाई बाई बाई! किती पसारा सावरावा तरी आवरता येत नाही. या मुलांना अजिबात सुट्या नकोत. ती शाळा-कॉलेजमध्येच कोंडलेली बरी असतात.’ असंच काहीसं सध्या आपल्या किंवाआजूबाजूच्या घरात ऐकायला येतंय ना?

पेपर संपले अन् आम्हा मुलांना सुट्या लागल्यामुळे आनंदाला तर उधाणच आलं. मात्र आपल्या घरच्यांना वैताग आणल्यासारखंच झालेलं असेल. सुट्या लागल्या म्हणून घरी खूप आराम करू, खाऊन-पिऊन झोपा काढू, असं काहींनी ठरवलेलं असेल; पण हळूहळू मात्र ‘बोअर’ व्हायला लागतं ना? मग बोअर होऊ नये म्हणून सुट्यांत काहीतरी नवीन शिकायचं, वाचन करायचं, असंही काहींचं मत असेल. १०-१२वीच्या मुलांना जवळपास तीन महिन्यांच्या सुट्या असल्याने बहुतेकांनी तर एमएससीआयटी अन् इंग्लिश स्पीकिंग क्लास लावले असतील, तर कॉलेज तरुण-तरुणींनी जिम, स्पोर्ट‌्स, क्राफ्ट क्लास, पार्लर, शिवणकाम, स्विमिंग, डान्स, कुकिंग किंवा मेंदी-रांगोळी वगैरे वगैरे. सुट्यांमध्ये मुलांनी घरकामाला हातभार लावून घरच्यांना कामातून विश्रांती द्यावी, अशी घरच्यांची अपेक्षा असते. म्हटलं तर विद्यार्थी अन् घरचे दोघांचंही म्हणणं बरोबर आहे. मग अशा परिस्थितीत नेमकं करायचं तरी काय? सोप्पं आहे. दैनंदिन होणारी कामं वाटून घ्या. विद्यार्थ्यांनी एखाद-दोन जास्तीची कामं करा. तडजोड करून दोघांचाही फायदाच!
हल्लीची मुलं-मुली कामच करत नाही, असा काही पालकांचा आरोप आहे. हा आरोप कदाचित बरोबरही असेल, तो मात्र काहींच्या बाबतीत. कारण मुली घरकामात मदत, स्वयंपाक, पाणी, धुणी, भांडी इतर हाताखालची कामं करतातच; मात्र मुलंही कामात मदत करायला कमी नाहीत बरं का? कारण सध्या घरातला एकुलता एक मुलगासुद्धा आईला घरकामात मदत करत असतोच. किराणा, भाजी आणणे, ऑनलाइन वीज बिल, गॅस टाकीचे नंबर लावणे, आई-वडिलांना उन्हातली धावपळ नको म्हणून स्वत: गाडीवरून जाऊन बाहेरची इतर कामे करणे अन् पाहुणे आल्यास त्यांना सोबत अशी बरीचशी कामं चोखपणे मुलं करताना दिसतात. मग सुट्यांमधील शॉपिंगमध्ये एखादा जास्तीचा ड्रेस मुलांना घेतलाच तर पालकांनाही हरकत नसावी. बरोबर ना?
या सुट्यांमध्ये सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आठवण येत असेल ती आपल्या शाळा-कॉलेजची! शाळेत असताना वर्गात घातलेला धिंगाणा, सहल, चेष्टामस्करी, गप्पाटप्पा, शिक्षकांना दिलेला त्रास तर कधीकधी मस्तीपायी झालेली फसगत-शिक्षा सर्वच आठवत असेल ना?
कॉलेज! कॉलेज म्हटलं की ग्रुप, कॉलेज कट्टा-कँटीन, बंक केलेली लेक्चर्स, बोर व्याख्याने, ग्रुपने सेलिब्रेट केलेले वाढदिवस, कॉलेज डेज, फेस्टिवल, फंक्शन, ट्रिप, ग्रुप स्टडी, पिक्चर प्लॅन, टेन्शन आणणारे प्रॅक्टिकल, ओरल्स, पेपर अन् कितीतरी अविस्मरणीय असे तुमचे आमचे क्षण असतात की, जे व्यक्त करायला शब्दही अपुरे पडतात. सुट्यांमध्ये कॉलेजच्या तरुणांना आपले कट्टे सुने-सुने पडलेत की काय, असं वाटत असेल अन् शिक्षक-प्राध्यापकांनाही रिकाम्या वर्गाच्या कॉलेजच्या भिंती खायला उठत असतील! हे मी ठामपणे सांगू शकते, कारण मीही केटीएचएम कॉलेजची एक विद्यार्थिनी आहे. अन् माझाही भलामोठा २०-२५ मित्रमैत्रिणींचा ‘जय मल्हार’ ग्रुप आहे.

तुमचाही असेल आमच्यासारखाच!
रोजच्या सुटीत आपण कामाचे, कोर्स-क्लासेसचे कितीही वेळापत्रक पाळत असलो तरीही दिवसभरात मात्र कितीतरी वेळा आपल्या लाडक्या मित्रमैत्रिणींची आठवण आल्यावाचून राहात नाही. आठवण आली म्हणून फोन केला, मेसेज केले किंवा व्हॉट््सअॅप, हाइक, फेसबुक कितीही वापरलं तरीही कुठेतरी काही कमी पडल्यासारखं जाणवतंच ना? कारण प्रत्यक्ष भेटीची मजा सोशल मीडिया तरी कशी भागवणार? ‘आता किती दिवस या सोशल मीडियाच्या जिवावर जगावं लागेल हे देवच जाणे!’ असंही काहींना वाटत असणार. कॉलेजची दुनियाच निराळी असते. आपला ग्रुप कुटुंबासारखाच असतो, जिथे आपण एकमेकांचे खूप लाडके असतो. काही ग्रुपची कॉलेजमध्ये दहशत असते तर काहींची सत्ता. माझा ग्रुप मात्र अख्ख्या कॉलेजवर, प्राध्यापक, मित्रमैत्रिणींच्या मनावर ‘राज्य’ करणारा आहे. कारण कॉलेजमधील बेस्ट मॅनेजमेंट टीम म्हणजे आम्हीच. पथनाट्य-फेस्टिवल-फंक्शन पार पाडण्यात पुढाकार घेणारे आम्हीच. धम्माल-मस्ती करणारे आम्हीच. प्राध्यापकांचे आवडते विद्यार्थी आम्हीच. वेळप्रसंगी भांडणतंटा करणारे आम्हीच. मात्र शिस्तप्रिय आणि अभ्यासू-हुशार म्हणून ओळखले जातो ते आम्हीच!

माझ्या ग्रुपचे मेंबर्स म्हणजे शेराला सव्वाशेर आहेत. अचानक भयानक काय करतील याचा मात्र नेमच नाही. फक्त सेलिब्रेशनसाठी एखादं कारण मिळावं म्हणजे चुना लावायची सर्वांनाच घाई! कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे जास्त पॉकेटमनी नसतोच अन् असला तरी तो कमीच पडतो. मग मिळून काँट्री काढणे, बर्थ डे सेलिब्रेशन, एखाद्याला गोड शब्दांत घोळवून चुना लावणे, तर कधी पैजा, इमोशनल ब्लॅकमेल करून ‘बस्स का भावा, मैत्रीसाठी एवढं पण नाही का?’, ‘जगात कुणी कुणाचं नसतं’, ‘आता मित्रमैत्रिणींना खाऊ नाही घालणार तर पुढे सोबतीला कोण राहणार?’ असे अनेक प्रकारचे टॉपचे डायलॉग देऊन एकएकाची लुटालूट चालूच असते.

आपल्या सर्वांच्या कॉलेजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर कधी कुणाचा मॅटर झाला, गेम, कांड, लोचा, किस्सा, शॉट, स्कीम झाली तर मग अशा वेळी सर्वात पहिले बोलबच्चन द्यायला, आधाराचे, मदतीला हात पुढे येतात ते मित्रमैत्रिणींचेच. कितीही संकटाची- दु:खाची वेळ असो तरीही खंबीर पाठिंबा असतो तो ग्रुपचाच आणि आनंदाची बातमी असो की, एखाद्याची ‘येडी’ घेऊन धाड टाकायची असो, ‘भुरटेपणाचा कळस’ असतो तो ग्रुपचाच.
नुकत्याच नाशकात पावसाच्या सरी बरसल्या अन्् आपल्या सर्वांच्या जुन्या आठवणी पुन्हा नव्याने अंकुरल्या! पावसाळ्यातील कॉलेजची धम्माल, ग्रुपने दिलेल्या निसर्गरम्य ठिकाणांच्या भेटी, कधी त्र्यंबकेश्वर-ब्रह्मगिरी तर कधी भंडारदरा, पैन, सोमेश्वर धबधबा. मनाला भुरळ घालणाऱ्या आठवणी, चिखलातून सरकून पडलेल्या बाइक्स, स्कूट्या, वाफळता चहा, कांदाभजी, कँटीनचा समोसा-वडापाव तर कधी ताव मारलेली गरमागरम मिसळ अन् चायनीजसुद्धा. अहाहा… तो कॉलेज रोड, सिटी सेंटर मॉल, बाबूपूल!

कॉलेजच्या सर्व गोष्टी म्हणजे आठवणींच्या साठवणींचा पसाराच असतो. कधी सवडीने जरी आवरायला घेतला ना तरी सावरणे मात्र कठीणच आहे बुवा! आपण जरी कॉलेजमधून पासआउट होऊन बाहेर जाणार असू, तरीही आपल्या सर्वांच्या सुवर्णमयी गमतीदार आठवणी या कॉलेजभोवतीच रेंगाळत राहणार. अन् कितीही बॅचेस आल्या किंवा गेल्या तरीही आपल्या कॉलेजकट्ट्यांवर ही ‘तरुणाईची हिरवळ’ मात्र सदैव बहरत राहणार!