आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्दी, स्वाइन फ्लू , ट्युबरक्युलॉसीस या रोगांचा प्रसार कसा आटोक्यात ठेवता येईल ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतत बदलत्या हवामानामुळे सध्या अनेक लोक सर्दी, ताप, फ्लूसारख्या आजाराने त्रस्त आहेत. मुंबईसारख्या महानगरीतही अलीकडे एक्सडीआर व एमडीआर टीबीचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. ज्यावर उपचार अवघड आहेत. फ्लू व त्याचे प्रकार हे विषाणूंमुळे होतात. तर ट्युबरक्युलॉसीस हा जिवाणूमुळे होतो. हे दोन्ही सूक्ष्मजीव नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. जीवाणूंचा आकार हा 0.5 ते 5 मायक्रोमीटर तर विषाणूंचा आकार हा त्याहीपेक्षा अतिसूक्ष्म म्हणजे नॅनोमीटरमध्ये मोजतात. एका मिलिमीटरचा एक हजारावा भाग, म्हणजे एक मायक्रोमीटर. आणि एका मायक्रोमीटरचा एक हजारावा भाग म्हणजे एक नॅनोमीटर!
या सूक्ष्मजंतूंचा प्रसार कसा होतो?
ज्या लोकांना अशा रोगाची लागण झालेली असते. त्यांच्या तोंडातील लाळेत व नाकातील स्रावांमध्ये हे जंतू प्रचंड प्रमाणात आढळतात, जेव्हा रुग्ण शिंकतात, खोकतात, थुंकतात किंवा नाक शिंकरतात तेव्हा नाकातोंडातील स्रावांचा, अतिसूक्ष्म कणांचा फवारा हवेत उडतो. या कणांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर हे सूक्ष्मजंतू असतात. यातील 10 मायक्रॉन किंवा त्यापेक्षा मोठे कण आजुबाजूंच्या लोकांच्या श्वसनाबरोबर सरळ त्यांच्या नाकात जातात किंवा सभोवतालच्या वस्तूंवर जाऊन पडतात. या वस्तू हलवल्यास हे सूक्ष्मकण परत हवेत मिसळतात व इतरांच्या नाकातोंडात जातात. काही अतिसूक्ष्मकण (1 ते 4 मायक्रॉन) सुद्धा श्वसनावाटे इतरांच्या श्वसनसंस्थेत शिरकाव करू शकतात. पण बरेचसे वाळतात व त्यांचे सूक्ष्मकेंद्रकांमध्ये रूपांतर होते. या केंद्रकांमध्ये काही घनभाग व हजारोंच्या संख्येने सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मकण हवेत अनेक दिवस तरंगत राहतात. वार्‍यामुळे माणसांच्या किंवा वाहनांच्या हालचालीमुळे जेव्हा धूळ उडते तेव्हा धुळीबरोबर हे सूक्ष्मकण हवेत पसरतात व अनेक लोकांना त्याची लागण होऊ शकते. विशेषत: ज्या माणसांची प्रतिकार शक्ती कमी असते. उदा. लहान मुले, वयस्कर लोक, त्यांच्यामध्ये रोगाचा चटकन प्रादुर्भाव होतो.
भारतात लोकांना गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यावर, उघड्यावर, थुंकायची, नाक शिंकरायची सवय असल्यामुळे अशा रोगांच्या साथी चटकन पसरतात. भारतात बाळ जन्मल्याबरोबर त्याला पहिली लस टीबी होऊ नये म्हणून द्यावी लागते. कारण या जंतूंचे प्रमाण हवेत, मातीत मोठय़ा प्रमाणावर असते. आपण जर आपल्या या वाईट सवयी बदलण्याचा गाभीर्याने विचार केल्यास हवेतून प्रसार होणार्‍या अशा अनेक गंभीर आजारांचा प्रसार आपण टाळू शकतो. त्यासाठी पुढील चांगल्या गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे.
1. कधीही कोठेही खोकताना, शिंकताना, तोंडाला रुमाल लावावा व नंतर हात स्वच्छ धुवावे.
2. रस्त्यावर, गर्दीत किंवा उघड्यावर कधीही थुंकू नये व नाक शिंकरू नये.
3. वहय़ा, पुस्तकांची पाने उलटताना, नोटा मोजताना बोटांना कधीही थुंका लावू नये.
4. एकत्र जेवताना एकमेकांचे उष्टे खाऊ नये.
फक्त फ्लू व टीबीच नाही तर न्युमोनिया, गोवर, कांजिण्या, गालफुगी, डांग्या खोकला अशा अनेक गंभीर आजारांची लागण याच पद्धतीने होते. या रोगांच्या साथी पसरू नयेत म्हणून वरील गोष्टींचा आरोग्यखात्याने प्रचार करावा. प्रसारमाध्यमातूनही जनजागृती करावी. डॉक्टरांनीसुद्धा आपल्याकडे आलेल्या रुग्णांना वरील गोष्टी आवर्जून सांगाव्यात सात पसरल्यावर जीव मुठीत घेऊन व नाकातोंडाला मास्क लावून फिरण्यापेक्षा तो होऊ नये, म्हणून घेतलेली काळजी कधीही चांगली. यामुळे अँन्टिव्हायॉटिक्सचा अनावश्यक वापर पण टाळता येईल.
लोकसंख्येतील प्रचंड वाढ, दाटीवाटीची लोकवस्ती, गर्दी व सतत बदलते हवामान या सर्व गोष्टी अशा रोगांना अतिशय पूरक आहेत. या पार्श्वभूमीवर जर आपण चांगल्या सवयी लावून घेतल्या, आपला परिसर स्वच्छ ठेवला तर सार्वजनिक आरोग्याची पातळी निश्चित उंचावेल.