आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नृत्य-लय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोजागिरीच्या आई-बाबाला वाटायचे तिने सर्व कलांत निपुण व्हावे. खेळ-व्यायामाबरोबरच तिने गाणे-नाच शिकावे असेही वाटायचे. ती सहा-सात वर्षांची होती. त्यांच्या शेजारी डान्स क्लास चालायचा. त्या क्लासला तिचे नाव टाकले. दोन-तीन दिवसांतच कोजागिरीने साफ सांगितले, ‘मला मुळीच डान्स क्लासला जायचे नाही. ते गुरुजी मला पाहिजे तसे नाचू देतच नाहीत. मला मजा येत नाही. कंटाळा येतो.’ कोजागिरीची तक्रार जराशी अवास्तव वाटली. नाचायला शिकायचं म्हणजे काहीतरी नियम असणारच. त्या नियमांच्या चौकटीत पहिल्या स्टेप्स असणार. कोजागिरीच्या मनाने एकदा घेतले की तिची समजूत पटायला तेवढेच प्रभावी कारण लागायचे. एवढी छोटीशी कोजागिरी, तिला मनानेच काय ते हात पाय हलवून नाचायचे आहे ते तिचे तिने करावे. शिकण्याचा आग्रह कशाला? डान्सचा विचार तेवढ्यावरच थांबला.


कोजागिरीच्या हातपाय हलवण्यात एक प्रकारचा डौल आहे हे शांताने टिपले होते. नृत्याच्या कार्यक्रमाला जाणे, कार्यक्रमानंतर कलाकाराला भेटून बोलणे, फोटो दाखवणे असे करत आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. थोडी मोठी झाल्यावर नृत्य शिक्षिकेला घरी बोलवले. कोजागिरीला नृत्यात गोडी निर्माण करायची आहे, अशी कल्पना शिक्षिकेला दिली. शिक्षिकेत विद्यार्थ्यांच्या कलाने घेण्याचा वकूब असल्याने कोजागिरी मन लावून सुरुवातीचे पदन्यास आत्मसात करू लागली. एकाग्रता वाढू लागली. कोजागिरीला गोडी लागली. अर्धे शिक्षण इथेच पूर्ण झाले होते. एकदा गोडी लागली की उरलेले शिक्षण आपोआप पूर्ण होणार याची शांताला खात्री होती.


‘तय्यूम ...तत्... तत् ...तय्यूम.. ता’ या बोलावर कोजागिरीच्या लयीत हालचाली सुरू झाल्या. त्या अडाऊंचे प्रकार, त्याचा क्रम, बोल या सर्वांची नोंद शांता घेत होती. हे सर्व शांतालाही नवीन होते. नृत्याची भाषा नव्याने तीही शिकत होती. आवड निर्माण करण्यासाठी हे आवश्यक होते. घरीच शिकवत असल्याने सर्वाची नोंद ठेवण सोपं गेलं. कोजागिरीबरोबर तिची वर्गमैत्रीण शिकत होती.


‘तुम्हाला वाटत नाही, टीचर फारच हळू शिकवते आहे? एवढ्या दिवसांत मुलींचे फक्त दोनच अडाऊ झालेत. आपण शिक्षिकेला काही तरी सांगितले पाहिजे,’ कोजागिरीच्या मैत्रिणीची आई एकदा क्लास संपल्यावर म्हणाली.
शांताने सांगितले, ‘समजा त्या हळू शिकवत आहेत. दोन महिन्यांत फक्त एकच अडाऊ झालाय. मला तर त्यात काहीच गैर वाटत नाही. कारण मुली मन लावून शिकत आहेत. अडाऊ किती दिवसांत पूर्ण झाले यापेक्षा त्यात त्यांना आनंद मिळतोय हे मला जास्त महत्त्वाचे वाटते.’ शांता जरासे स्पष्ट बोलत होती. त्यांना शांताचे म्हणणे पटले नसावे. हळूहळू कोजागिरीच्या मैत्रिणीचा उत्साह कमी व्हायला लागला. त्यामुळे ती गळलीच. शांताला वाईट वाटले. मैत्रिणीचा उत्साह टिकवून ठेवायला ती कमी पडली.


कोजागिरीला शिकवणा-या शिक्षिकेने नृत्य शिकवायला नव्याने सुरुवात केली होती. त्यांचा उत्साह आणि मुलांमध्ये रस घेण्याची वृत्ती पाहून शांताला तिचे खूप कौतुक वाटायचे. घरी येऊन शिकवत असूनही फी फारच कमी होती. शांताने एकदा सुचवले, ‘तुम्ही घरी येऊन शिकवता. मुख्य म्हणजे विषयात गोडी निर्माण करता. वाढवून फी घ्यायला काय हरकत आहे. माझ्याकडून मी पुढच्या महिन्यापासून फी वाढवून देईन.’ शिक्षिका म्हणाली, ‘तुमच्यासारखे पालक अजून मला भेटायचेत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शिक्षणाचा विचार सहसा कोणी करत नाही.’


आपल्या आईची आणि टीचरची मैत्री झालीय हे कोजागिरीला कळले. त्या काय बोलत आहेत हे कळले नसले तरी! कोजागिरीची सशक्त गुलाबी पावलं, बंद मुठी आणि चमकदार डोळे आणि कोजागिरी स्वत: हे सर्व नृत्यलयीत मग्न होते.


aruna.burte@gmail.com