आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी तारपा बोलतोय...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज मी वाजणार नाही. मी बोलणार.. माणसांच्या जगात ऐकू जावे यासाठीच.. आजवर जिवाच्या आकांताने ओरडलो, पण व्यर्थ! सरकारदरबारी घुंगरांचा आवाज ऐकला जातो. मात्र घशाला कोरड पाडून, शिरा ताणून, छातीचा भाता करून जिवाच्या आकांताने ओरडूनही माझा आवाज तुमच्यापर्यंत कधीच पोहोचला नाही. मी कोण? मी तारपा.. आदिम संस्कृतीचे प्रतीक. आदिवासी समाजात मला मानाचे स्थान. इतर वाद्यांच्या तुलनेत माझा इतिहास अधिक समृद्ध आणि पुरातनही. पण इतिहासाने तरी माझी नोंद कुठे घेतली? इतिहासाने दखल घेतली नाही, वर्तमानाला किंमत नाही. त्यामुळे माझे भविष्य अंधारात आहे.. माझ्यात प्राण फुंकणारा आदिवासी हा माझा मायबाप. दिवसभर जिवाचे ‘रान’ करत काबाडकष्ट करणारा आदिवासी रात्री माझ्या सान्निध्यात रमतो. माझ्या सुरावटीवर ताल धरतो. माझ्याभोवती रिंगण करून बायामाणसे काही क्षण व्यथा-वेदना विसरतात.. नाचतात.. गातात.. माझ्यातून सूर काढणारा भाग्यवान समजला जातो. परंतु, पाश्चिमात्त्य वाद्यांचे खूळ डोक्यावर घेणा-या नागर संस्कृतीलाही तारपा हे आदिम वाद्य ‘आपले’ वाटेनासे झाले आणि केवळ आदिवासींचे वाद्य म्हणून मी कायम दुर्लक्षिला गेलो. हे दुर्लक्ष केवळ माझ्याबाबतीतच असते तर मी ‘ब्र’ देखील काढला नसता. मात्र मला जगवणा-या आदिवासी वादकांच्या नरड्याचा घोट घेतला जात असताना मी स्वस्थ बसणे योग्य नाही. म्हणून आज माझे गा-हाणे शहरी मानसिकतेच्या, शासकीय उदासीनतेच्या भिंती भेदणारे ठरावे, अशी माफक अपेक्षा. एखादे वाद्य वाजवले गेले तरच त्याचे अस्तित्व राहते. परंतु तारपा वाजवणारे आता उरलेत किती? नवीन पिढीत इच्छा आणि ऊर्मी दिसून येत नाही. ‘हे वाजवून आम्हाला रोजीरोटी मिळणार आहे का?’ असा सवाल नव्या पिढीकडून ऐकला, की मला उरीपोटी धरणा-या म्हाता-या आदिवासींच्या डोळ्यांतील अश्रू माझ्या अश्रूंमध्ये मिसळत. गेल्या काही वर्षांत मी शहरांत अनेक नृत्यस्पर्धांमध्ये भाग घेतला.‘तारपा नृत्य’ म्हणून प्रसिद्धीस आलो. मात्र त्याने माझ्या अस्तित्वाचा प्रश्न मिटला नाही. मी कोण आहे? मी कसा दिसतो? मी कसा आकारास येतो? भविष्यात या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा खटाटोप एखाद्या संशोधकाने केला तरी त्याला पुरेशी माहिती उपलब्ध होणार नाही. कारण माझ्याविषयी फारच थोडे लिखित पुरावे सापडतात. पुढील काही दशकांतच माझा आवाजही लोप पावलेला असेल आणि तारपा कसा वाजतो याचे प्रात्यक्षिक देण्यासाठीही माझा आवाज उरणार नाही. पण फिकीर कोण करतो? तो दिवस दूर नाही जेव्हा वस्तुसंग्रहातल्या एखाद्या काचेच्या बंद पेटीत माझा निस्तेज देह ठेवला जाईल आणि ‘तारपा हे महाराष्ट्रातील वारली या आदिवासी जमातीचे वाद्य होते.’ अशी श्रद्धांजलीपर काही मोजकी अक्षरे त्याखाली लिहिली जातील.. खरे म्हणजे, वारली चित्रकला आणि तारपा हे एकाच पाड्यात जन्मले आणि वाढले. आज वारली चित्रकला शहरात आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली. इतकी, की हायक्लास लोकांच्या घरातही तिला स्थान मिळाले. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मोठ्या शहरांमध्ये भरणा-या संमेलनात एक स्टॉल वारली पेंटिंगचा असतोच. पाड्यांच्या भिंतींवर शोभणारी वारली चित्रे शहरात घराच्या आतल्या भिंतींवर, कपवर, पेनस्टँडवर, टीशर्टवर आली आणि वारली चित्रकला जगली. ‘जिव्या म्हसे’ या डहाणूमधल्या वारली चित्रकाराच्या बोटांतील जादूने त्यांना ‘पद्मश्री’ मिळवून दिली. मात्र तारपा पाड्याच्या बाहेर पडलाच नाही. तारपानृत्य हा सादरीकरणाचा प्रकार शहरी प्रेक्षकांनी पहिल्यांदा पाहिला कॉलेज गॅदरिंगच्या माध्यमातून. शहरी प्रेक्षकांना काहीतरी ‘नवे’ दाखवण्यासाठी रानातली ही ‘जुनीच’ कला रंगमंचावर आली. जिथे तिथे तारपा नृत्याचे गोडवे गायले जाऊ लागले. सुरुवातीला कॉलेजच्या गॅदरिंगपुरतेच मर्यादित असलेले हे तारपा नृत्य हळूहळू ‘लोकनृत्याच्या’ पंगतीत जाऊन बसले आणि तारपा नाचणा-या ग्रुपची मागणी वाढली. त्यानंतर लोककला संमेलने, राजकीय मेळावे, सांस्कृतिक महोत्सव, नृत्यस्पर्धा यांतून तारपा नृत्याचे सादरीकरण होऊ लागले. अर्थात, मोखाडा येथील तारपा नृत्याचे ग्रुप्स तयार करून शहरात आणण्याचे श्रेय राजन वैद्य यांचे. नाटक आणि सिनेमाची पार्श्वभूमी असणा-या राजन वैद्य यांनी तारपा सादरीकरणाची ताकद ओळखून अनेक ठिकाणी वशिले लावले आणि आदिवासी कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. ठाणे जिल्हा म्हणू नका, मुंबई म्हणू नका, अगदी पार दिल्लीपर्यंत तारपा नृत्य सादर करण्यात राजन वैद्य यांचा मोलाचा वाटा. 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर अनवाणी पायाने तारपा नृत्य करणा-या आदिवासींना आपण प्रजासत्ताक देशाचे नागरिक असल्याची जाणीवही पहिल्याप्रथमच झाली असावी. राजन वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली दूरदर्शनवरही तारपा नृत्याचे सादरीकरण केले गेले. ‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या माध्यमातून तारपाची ओळख संपूर्ण देशभरात झाली. नीतिन देसार्इंच्या ‘अजिंठा’ चित्रपटात 30 वारली कलाकारांनी मोठा पडदा व्यापला. नुकतेच केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमासाठी 15 जणांचा ग्रुप घेऊन राजन वैद्य मुंबईत हजर झाले. अनेक नृत्यस्पर्धेत मिळवलेली प्रथम पारितोषिके पाड्यावर धूळ खात पडली आहेत. टीव्हीवरील कार्यक्रमांसाठी एका दिवसाची रोजंदारी बुडवून जाणा-या आदिवासींना तिथे मिळणा-या सफेद पाकिटातले मानधन तुटपुंजे असले तरीही त्यांच्यासाठी कलेला मिळणारी दाद अधिक मौल्यवान होती. टीव्हीवर चमकलेले हे कलाकार आजही रस्त्याच्या किंवा बंधाºयाच्या कामाला जातात. ठेवणीतले जरा बरे कपडे घालून मुंबईच्या वा-या कराव्या लागत असल्याने स्वखर्चाने राजन वैद्य यांच्या सांगण्यानुसार त्यांनी टीव्हीवाल्यांना हवे तसे ‘पारंपरिक’ वेष खरेदी केले. तरीही ‘आदिवासी असे कपडे घालतात का?’ असे सवाल करत दूरदर्शनवर सदानंद राणे या संस्कृतीरक्षकाने बोट उगारले की आपण नेमके काय पाहतो? कला की कपडे..? असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. ‘संस्कृती टिकवण्याची हौस कोणाला आहे? सादरीकरणासाठी अशी पारंपरिक नृत्य पाहिजेत पण आदिवासी जगला तरच त्याची संस्कृती जगेल’, असे परखड मत मांडणारे डॉक्टर सुनील पराड तारपा नृत्यापेक्षा आदिवासी बांधवांना जगवण्यासाठी तळमळतात. ‘आदिवासींच्या कलांवर अनेकांनी कोट्यवधी रुपये कमावले असतील, मात्र त्याचा आदिवासी समाजाला काय फायदा झाला? कारण लोकसंस्कृती,लोककला वगैरैची भाषा भरल्यापोटी करायची असते. हातावर पोट असणा-या माझ्या समाजाला कसली आलीय संस्कृतीची भूक? ती तुमच्यासारख्या शहरी लोकांनाच. ‘खरेच आहे ते.. आजही जव्हार- मोखाडा भागातील आदिवासी पाड्यांवर वीज नाही. आजही आदिवासी बायका आणि पुरुष रोजंदारीवर जातात. सगळ्याच आदिवासी मुलांचे शिक्षण अर्धवट, तेही मराठी माध्यमातून ज्याला आज करिअरच्या दृष्टीने जराही किंमत राहिली नाही. या तुलनेत डहाणू- पालघरला असलेली आदिवासी मुले शिकत आहेत, ही समाधानाची बाब आहे. मात्र आज आदिवासी पोर मोठा होतो तो संस्कृतीचा बळी देऊनच. शिकलेली पोरे तारपा नाचत नाहीत, वाजवत नाहीत, त्यांना त्याचे कौतुक नाही. शिक्षणामुळे हिंदू तसेच ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढला आणि आदिवासी मुले संस्कृतीपासून दूर जाऊ लागली. वाढत्या शहरीकरणामुळे डहाणू - पालघर पट्ट्यातील आदिवासी फडके बाधून तारपा नाचायला लाजतात. विधवा बायकांकडून लग्न लावून घेण्याची पारंपरिक पद्धत नाकारत शिकल्या-सवरल्याचा आव आणत ब्राह्मणांकडून लग्न लावून घेतात. डहाणू येथील सुसरी नदीवर धरण बांधण्यासाठी तेथील 7 ते 8 आदिवासी गावे उठवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आदिवासींच्या स्वत:च्या जमिनी नाहीत. जंगलातील कायद्यानुसार ‘फॉरेस्ट’वालेही त्यांना दोषी ठरवतात. ही सद्य:स्थिती पाहिली तर आदिवासींच्या संस्कृतीचे रक्षण करणार तरी कोण? मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री हा त्यांच्या समाजाचा आवाज असला पाहिजे. मात्र आदिवासी समाजासाठी असलेला निधी वापरूनही आज आदिवासी कोणत्या परिस्थितीत जगत आहे, याचे चित्र ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही आदिवासी पाड्यावर दिसते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही तारपा नृत्याचे प्राणपणाने जतन- संवर्धन केले जाते, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. तारपा जगेल, तारपा वाजेल, तारपा नाचेल पण जेव्हा असे शंभर सुनील पराड, सचिन सातवी आणि राजन वैद्य जन्माला येतील तेव्हाच. तारपा संस्कृती नामशेष होऊ शकते या वास्तवापासून आदिवासी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. शिकलेल्या आदिवासी मुलांनी मागे वळून विकास साधला तरच ते शक्य आहे. आदिवासी विकासासाठी आदिवासी समाजाचाच नेता असला तरीही विकासाच्या नावाने बोंब आहे, ही सद्य:परिस्थिती लक्षात घेऊन सुनील पराडसारख्या अनेक तळागाळापर्यंत पोहोचणा-या कार्यकर्त्यांनी स्वत: या समरात उडी घेतली, या सध्याच्या आशादायी चित्रात गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीचे उजळ रंग भरण्याची. असे झाले तरच तारपा वस्तुसंग्रहालयात न राहता कालौघात टिकून राहील. bhingarde.namrata@gmail.com