अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचे 2009 मध्ये इस्लामी अमिरातीमध्ये रूपांतर होईल... 2010 मध्ये अमेरिका कोसळून पडेल... 2012 मध्ये जगाचा अंत होईल... अशी भाकिते करणारे मुल्लामौलवी तोंडघशी पडले, त्या पाकिस्तानात सध्या धूमकेतूप्रमाणे उगवलेले कोण हे कादरी, असा प्रश्न पाकिस्तानी राजकारण्यांकडून विचारला जात आहे. राजकीय पटलावरच्या त्यांच्या या अशा अचानक आगमनाने अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. ‘मिनहाज अल कुराण’ या संघटनेचे नेते असलेल्या या ताहिरुल काद्री यांना इस्लामाबादेत राष्टÑीय असेंब्लीजवळ उभे राहून जमावाला उद्देशून आवाहन करावे लागले, तेव्हाच कुठे त्या जमावातून झिंदाबादच्या घोषणा उमटल्या. ‘हम आ गये तो, गर्दी ए बाजार में’ ही त्यांची वल्गना चौथ्या दिवशी त्याच गर्दीने हाणून पाडली.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीची मुदत 18 मार्चला संपत असल्याने त्यापूर्वी निवडणुका जाहीर करणे सरकारला क्रमप्राप्तच होते. त्यामुळे पाकिस्तान सरकारने 16 मार्चला ही असेंब्ली बरखास्त करणार असल्याचे जाहीर करून कादरी यांच्या मागणीनुसार पाऊल टाकले, असे चुकूनही म्हणता येणार नाही. राहता राहिला भाग सैन्य आणि न्यायव्यवस्था यांच्या देखरेखीखाली निवडणुका घेतल्या जाण्याचा. या दोन्हींचा सहभाग निवडणुकीत प्रत्यक्ष जरी नसला तरी अप्रत्यक्षरीत्या ते त्यात असतातच. कादरी यांच्याकडून चर्चेत सहभागी व्हायचे मान्य केले गेले तेव्हा ते मागे हटतील हे उघड झाले होते. कादरी नमले तरी सरकार नरमले असे म्हणता येण्याजोगी मात्र स्थिती नाही. काद्रींचा राग पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्तहिदा कौमी मुव्हमेंट आणि त्यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या अवामी नॅशनल पार्टी या पक्षांवर होता. हे पक्ष कमीअधिक प्रमाणात धर्मनिरपेक्ष आहेत, परंतु कादरींचा संघर्ष त्यांच्या धोरणाच्या विरोधात दिसत नव्हता. पाकिस्तान मुस्लिम लीग या नवाझ शरीफ यांच्या पक्षाशी त्यांचे फारसे सख्य नाही.
हा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीचाच भ्रष्ट साथीदार होय, असे त्यांचे म्हणणे आहे. राहता राहिला क्रिकेटपटू इम्रान खान यांचा ‘तेहरिक ए इन्साफ’ हा पक्ष. इम्रान खान यांनी कादरी यांना पाठिंबा दिला, पण ते त्यांच्या जवळपास किंवा व्यासपीठावरही गेले नाहीत. भ्रष्टाचाराच्या विरोधात दोघांचीही कार्यक्रम पत्रिका एकसारखी असली तरी, राजकीयदृष्ट्या आपल्याला ते अडचणीचे ठरेल, हे इम्रान खान यांनी ओळखले असावे. लोकशाहीने निवडून आलेले सध्याचे सरकार जावे, ही इम्रान खान यांची मनापासूनची इच्छा असली तरी कादरींच्या सूचनेप्रमाणे लष्करी प्रतिनिधीच्या हाती निवडणुकीची सूत्रे सोपवल्यास काय घडेल, याविषयी ते साशंक असावेत. स्वाभाविकच इम्रान खान यांनी या काळात सरकारने राजीनामा द्यावा, एवढेच पालुपद आळवले.
भारत आणि पाकिस्तान यांच्या सरहद्दीवर तणाव असतानाही काद्रींनी त्याविषयी जाणीवपूर्वक भाष्य करायचे टाळले. कादरी यांनी लष्कराच्या सांगण्यावरून इस्लामाबादेत धरणे धरल्याचा आरोप पाकिस्तानी राजकारण्यांनी केला आहे, त्याचाही कादरींनी जोरदार प्रतिवाद केला. आपल्याला कयानी भेटलेले नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते, कादरींच्या मागे सर्वोच्च न्यायालयही असल्याचे सांगितले गेले. त्याचाही त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. ते ज्या वेळी निवडणुकांवर देखरेख ठेवण्याचे काम लष्कराबरोबरच न्यायसंस्थांकडे द्यावे असे सांगत होते, त्याच वेळी साधारणपणे सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक करायचा आदेश ‘नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो’ला दिला. अशा काळात कादरींना न्यायसंस्थेविषयी प्रेमाचे भरते आल्याने सर्वसाधारण व्यक्तींचा तसा समज झाला. शेवटी झाले काय, तर कादरींना माघार घ्यावी लागली आणि त्यांचे ‘अण्णा हजारे’ झाले. पाकिस्तानातील या ‘अण्णा कादरीं’च्या डोक्यावरची टोपी फक्त निराळी होती इतकेच! अण्णा सौम्य बोलतात, तर कादरी एकच मुद्दा अधिक आक्रमकरीत्या मांडतात; म्हणून तो सामान्य माणसाच्या मनावर बिंबतो.
ज्या ‘नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो’कडे राजा परवेझ अश्रफ यांच्या भ्रष्टाचाराच्या तपासाचे काम सोपवण्यात आले होते, त्याचे एक अधिकारी कामरान फैज़ल यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण पुढे आले, तेही नेमके याच काळात. त्यांच्या नातलगांनी लगेचच आरोप केले आहेत. आपल्याला पंतप्रधानांच्या चौकशीच्या प्रकरणातून वगळावे, अशी विनंती त्यांनी वरिष्ठांकडे याआधीच केली होती; पण ती अमान्य करण्यात आली. ते अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होते, असे त्यांचे सहकारी सांगतात. यावरूनही तर्ककुतर्क चालू आहेत. सांगायचा मुद्दा हा की कादरी आले आणि गेले. त्याशिवाय देशाला साडेतीन दिवस वेठीला ठेवू शकेल, असा कोणीतरी एक नेता असल्याची निश्चिती झाली. हा नेताही तसा साधासुधा नाही. तो कॅनडातून आला आहे, देश वाचवायला. त्यातून पाकिस्तानी जनतेला काय मिळाले, तर निवडणुका होणार याबद्दलची खात्री. कादरी त्या चौकातून गेल्यावर आता ‘हा लोकशाहीचा विजय आहे’ यासारख्या बढाया मारल्या जात आहेत.
ताहिरुल कादरी यांच्या ‘मिनहाज अल कुराण’ या संघटनेच्या शाखा पाकिस्तानच्या चारही प्रांतांत आणि व्याप्त काश्मीरमध्ये तालुका पातळीवर आहेत. संस्थेत असलेल्यांच्या ‘इर्फान अल कुराण’च्या दरमहा अडीचशे तर महिला संघटनेच्या दरमहा दीडशे सभा होत असतात. मिनहाज शिक्षण संस्थेकडे 572 शाळा आणि 72 महाविद्यालये तसेच माहिती तंत्रज्ञानविषयक केंद्रे आहेत. सव्वा लाख विद्याार्थी आणि पाच हजार शिक्षक त्यांच्याकडे आहेत. तीन हजार ग्रंथालये आणि शंभरावर रक्तदान केंद्रे ही त्यांची वेगळी मालमत्ता आहे.
लाहोर आणि इस्लामाबादनजीकच्या भागातून माणसे आणण्यासाठी 20 बसेस जुंपल्या होत्या. गर्दीचे म्हणाल, तर आकडा कितीही फुगवला तरी ती कोणत्याही एका वेळी चाळीस हजारांपेक्षा जास्त नसावी. दिवसातून तीन-चार वेळा तरी हे कादरी टीव्हीवर येत असतात. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी ते रस्त्यावर उतरले, या आरोपात तथ्य उरत नाही. तथापि निवडणूक जिंकण्याचेही एक तंत्र असते, ते त्यांना कितपत जमेल याविषयी साशंकताच आहे. कादरींनी कॅनडामध्ये आश्रय मागितलेला असल्याने त्यांना कदाचित निवडणुका लढवता येणार नाहीत, अशी शक्यता आहे. ते कॅनडाचे नागरिक बनलेले आहेत. दुहेरी नागरिकत्व असलेली व्यक्ती निवडणूक लढवायला अपात्र आहे, असा निकाल एका वेगळ्या प्रकरणात याच न्यायालयाने दिलेला आहे. एकूण काय, तर कादरींना कॅनडाला गेल्यानंतर लगेचच परतता येणार नाही. ते आलेच तर काय घडेल, तेही ठामपणे सांगता येणे अवघड आहे. खरे तर कादरी यांना कुराणाचा राजमार्ग प्रशस्त (मिनहाज) करायचा आहे; ते त्यांना कसे जमेल, हाही एक मोठा प्रश्नच आहे.