आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋतुबदलाप्रमाणे आहार हवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्तिगत आहार ठरवताना ब-याच गोष्टींचा विचार करावा लागतो. ऋतुमानाप्रमाणे स्थूलमानाने काय बदल करणे आवश्यक आहे, कोणत्या गोष्टी हितकर आहेत, कोणते अन्नपदार्थ वर्ज्य करावेत हे दिले आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे भारतातील एक वर्षातील क्रमाने येणारे ऋतू आहेत. या ऋतुमानानुसार हवामात बदल पडतो. आपले आरोग्य चांगले टिकवावयाचे असले तर या बदलाप्रमाणे आहारात बदल करणे आवश्यक आहे.


पावसाळा जून ते सप्टेंबर या महिन्यांपर्यंत असतो. या वेळी आकाश अभ्राच्छादित असते. सूर्यकिरणांचा अभाव असतो. पाऊस पडत असतो. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे रोगजंतूंचा नाश होतो. आपणास नेहमी आढळून येते की पावसाळ्यात आकाश ढगांनी व्याप्त असल्यामुळे सूर्यकिरणांचा अभाव होतो. त्याच वेळी अधिक रोगराई वाढत असते. पावसाळ्यात पावसाबरोबर गार वारे वाहतात. उकाडा व झोंबणारे गार वारे यांचा परिणाम होतो. उन्हाळ्यामुळे तापलेल्या जमिनीत पडलेल्या पावसाने वाफ निर्माण होते. या सर्वांचा आपल्या शरीरप्रकृतीवर परिणाम होत असतो. यामुळे पावसाळ्यात उत्साह वाढत नाही. अग्निमांद्य होते. वातावरण पचनाला अनुकूल असत नाही. म्हणून या दिवसात आहार हलका असावा. थोडे कमी खाण्याची प्रवृत्ती असावी. खाण्यापिण्याचे पदार्थ अधिक स्वच्छ, ताजे, उष्ण असावेत.


या दिवसात नद्यांना नवीन पाणी येते. ते अपायकारक असते म्हणून पाणी गाळून, उकळून स्वच्छ करून प्यावे. पातळ पदार्थ, पातळ भाज्या, पालेभाज्या खाऊ नयेत. पालेभाज्या खावयाच्या असतील तर त्या पोटॅशियम परमॅगनेटच्या पाण्याने धुऊन घ्याव्यात. आहारात कांदा, लसूण, हिंग, सुंठ या पदार्थांचा उपयोग करावा. यामुळे पचनाला मदत होते. तसेच पावसाबरोबर येणा-या थंडीपासून संभवणारे विकार न होण्यास मदत होते. विशेषत: लसणाचा उपयोग पावसाळ्यात अतिशय चांगला असतो. त्यामुळे पोट फुगणे अगर पोट दुखणे हे कमी होण्यास मदत होते. आहारशास्त्राचा विचार करता विशेषत: लसणाचा उपयोग पावसाळ्यात करणे हितावह ठरते.


पावसाळ्यात तुरट, कडू भाज्या हितावह. पडवळ, कार्ली, वाघाटी इत्यादी. आषाढी द्वादशीला वाघाटीच्या फळांची चटणी करण्याची प्रथा आहे. पावसाळ्यात खूप उपवास ठेवण्याचे कारणही पचनाला मदत व्हावी हेच असेल असे वाटते. श्रावण महिन्यात एक वेळ जेवावे वगैरेसुद्धा याच कारणासाठी ठेवले असावे. पावसाळ्यात आहार थोडक्यात सांगायचा झाल्यास जड, थंड, शिळे पदार्थ न खाणे, अजीर्ण होऊ न देण्यासाठी आहार कमी करणे, पाणी गाळून उकळून पिणे, खाण्यापिण्याच्या बाबतीत जास्त स्वच्छता ठेवणे.