आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पचनक्षमतेनुसार आहार घेणे आवश्यक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘माझे मणके - गुडघे दुखतात म्हणून मी कॅल्शियमच्या गोळ्या घेते किंवा रक्त कमी आहे म्हणून आयर्नच्या गोळ्या घेते. डॉक्टर, मला अशक्त वाटते. काही टॉनिक द्या,’ अशी वाक्ये वारंवार ऐकावयास मिळतात. तसेच ‘किती बारीक दिसतो तुझा मुलगा, चांगले डिंकाचे लाडू खाऊ घाल त्याला,’ असे सल्ले दिले जातात. आयुर्वेद हा पचनाला सगळ्यात जास्त महत्त्व देतो. त्यामुळे शक्तीची औषधे किंवा बलवर्धक आहार घेताना भूक कशी आहे हे बघणे महत्त्वाचे असते. भूक व पचन खणखणीत असेल तरच वरील द्रव्ये पचतात. आयुर्वेदात खातो त्याचा आधी रसधातू बनतो, मग त्यातून रक्तधातू, मग मांसधातू (मसल्स), मग मेदधातू (चरबी), मग अस्थिधातू (हाडे), त्यातून मज्जाधातू (हाडातील मज्जा) व त्यातून शुक्रधातू असे एकातून धातू एक बनतात.
एखादा धातू कमकुवतपणासाठी औषध देताना त्याच्या आधीच्या धातूची स्थिती बघणे आवश्यक असते. कॅल्शियम कमी असेल तर त्याचे औषध घेताना शरीरातील रक्ताचे प्रमाण, मांसधातू बघणे तसेच पचन ठीक आहे का हे बघणे महत्त्वाचे असते. आजच्या तरुण पिढीला बॉडी बिल्डिंगचे खूप आकर्षण आहे. मसल्स डेव्हलप करण्याचे प्रॉडक्ट्स खूप खातात, परंतु त्यासाठी आहार, पचन, रक्त याचे परीक्षण करावे लागते. ते ठीक नसेल तर महागडे प्रोटिन्स पावडर घेऊन उपयोग होत नाही. तोच प्रकार शुक्रवर्धक औषधांचा आहे. जाहिराती बघून फक्त लैंगिक शक्ती वाढेल. अशी औषधे घेताना शरीराचे आधीचे धातू पचन बघावे लागते. शक्तिवर्धक द्रव्ये ही पचायला जड असतात. आजारपणातून उठल्यावर किंवा ऑपरेशननंतर लागेच ही द्रव्ये घेऊ नये. कारण पचनशक्तीला हळुवारपणा आलेला असतो. बलवर्धक आहार जसे गोड पदार्थ, डिंकाचे लाडू, खजूर, उडीद हे खाताना पचन बघून खाणे जरुरी आहे अन्यथा पचन अधिकच खराब होऊन आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे शक्तिवर्धक आहार व औषधे घ्या, पण जपून.