आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किस्‍सा कुर्सी का !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आता आरामखुर्ची रिपेअर करायला पाहिजे,’ असं आजोबांनी म्हणताच आजी हसू लागली. ‘तुमचा आराम जरा जास्तीच झाला म्हणून मोडली असेल ती बिचारी खुर्ची,’ असं आजीने म्हणताच आजोबा मिशीतल्या मिशीत फक्त गुरगुरले.
इतक्यात धावत मिहिर आला, ‘तुमची खुर्ची मोडली असेल तर माझी घ्या ना.’
पदराला हात पुसत आजी आली. ‘अरे तुझी खुर्ची नको देऊस त्यांना. त्यांना का अभ्यास करायचा आहे का? तुझी खुर्ची अभ्यासाची, त्यांची जेवल्यावर डुलक्या काढायची.’
आजीने असं म्हणताच मिहिर विचारात पडला. तो आजोबांच्या आरामखुर्चीकडे आणि आपल्या अभ्यासाच्या खुर्चीकडे नीट निरखून पाहू लागला. त्याच्या मनात काय गडबड चालली आहे, हे आजीने ओळखलं. मिहिरला जवळ घेत आजी म्हणाली, ‘आपण एक नवीनच खेळ खेळू. आज आपण सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या प्रकारच्या किमान 50 प्रकारच्या खुर्च्या शोधून काढायच्या. चला, आपण आजोबांपासूनच सुरुवात करू.’
डोकं खाजवत आजोबा म्हणाले, ‘कमालच झाली! आता या तुझ्या 50 खुर्च्या कुठे शोधायच्या? आधी 40 खुर्च्या तुम्ही शोधा, मग उरलेल्या मी शोधेन. तोपर्यंत मी जरा आराम करतो. मला जाम झोप आलीय.’ आजोबांना गदागदा हलवत मिहिर म्हणाला, ‘आजोबा, आपण दोघं मिळून आधी 10 खुर्च्या शोधूया, मग उरलेल्या 40 खुर्च्या आजी शोधेल.’ हे ऐकताच आजोबांची झोप पळाली. आजीकडे पाहत ते म्हणाले, ‘ही आयडिया मस्तच आहे. मला सांग खुर्च्या शोधायच्या म्हणजे नेमकं काय करायचं?’
‘वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या शोधायच्या. म्हणजे उदा. आता आपल्याच घरात बघा ना, मिहिरची अभ्यासाची खुर्ची, तुमची आरामखुर्ची आणि जेवायला बसायच्या खुर्च्या या तिन्ही वेगळ्या आहेत की नाही? अभ्यासाच्या खुर्चीला हात आहेत. कारण पुस्तक वाचताना किंवा लिहिताना या हातांचा उपयोग होऊ शकतो. तुमची आरामखुर्ची अस्ताव्यस्त आहे. आरामात पाय पसरून त्यात डुलकी काढता येते. आणि या जेवणाच्या खुर्च्यांना हातच नाहीत. कारण जेवताना आपले हात टेबलापाशी असतात. आणि जेवणाचा सरासरी वेळ असतो 25 ते 35 मिनिटं. इतक्या कमी वेळात आपण काही खुर्चीच्या हातावर हात ठेवून बसत नाही. हो किनई?’ आजीला थांबवत आजोबा म्हणाले, ‘आता आम्ही फक्त उरलेल्या सातच खुर्च्या शोधणार. मग तुझी पाळी. 40 खुर्च्या शोधण्याची. ओके?’ आजीने मान हलवली.
मिहिर टाळी वाजवत म्हणाला, ‘आजोबा, बाबांची ती कॉम्प्युटरची खुर्ची. ती कशी पण अ‍ॅडजस्ट करता येते आणि ढकलत ढकलत ती घरभर फिरवता येते. म्हणजे आता आपल्या चार खुर्च्या झाल्या.’
इतक्यात टेबलावर पडलेली एक जुनी लग्नपत्रिका मिहिरने पाहिली. मिहिर ओरडला, ‘आजोबा, आणखी खुर्च्या मिळाल्या! लग्नात नवरा-बायकोंना बसायला वेगळ्या खुर्च्या असतात. स्टेजवरच्या लाल गुबगुबीत खुर्च्या...’ ‘आणि आपल्याला बसायला असतात त्या फोल्डिंगच्या खुर्च्या किंवा प्लास्टिकच्या रंगीत खुर्च्या. व्वा! आता आपला स्कोअर झाला सात!’
मिहिर नुकताच बाबांबरोबर बँकेत जाऊन आला होता. त्याने बँक डोळ्यासमोर आणली. ‘हां मिळाल्या! बँकेतली कॅशियरची खुर्ची ही सगळ्यांपेक्षा वेगळी असते. म्हणजे ती जरा जास्त उंच असते व त्या खुर्चीला एक पायरी पण असते. आणि त्याच बँकेतल्या मॅनेजर काकांना आम्ही भेटलो होतो. त्यांची खुर्ची पण इतरांपेक्षा वेगळी होती. म्हणजे सीरियलमधल्या बॉसची खुर्ची कशी असते ना तशी होती ती! आजोबा आता आपला स्कोअर नऊ!’ मोडक्या आरामखुर्चीतून उठत आजोबा मिहिरजवळ गेले. त्याला जवळ घेऊन म्हणाले, ‘अरे, तू तुझ्या मित्राला कसा काय विसरलास रे?’ हे ऐकताच मिहिर भांबावला. आजीकडे पाहत म्हणाला, ‘अगं, विकासची 3 चाकांची खुर्ची. विकास अपंग आहे, त्यामुळे तो ती व्हीलचेअर वापरतो. ही खुर्ची तर सगळ्यांपेक्षाच वेगळी नाही का गं आजी? खरं म्हणजे वेगळ्या खुर्च्या शोधताना आपल्याला हीच खुर्ची आधी आठवायला हवी होती.’ मिहिरचं हे बोलणं ऐकून आजीचे डोळे पाणावले.
‘आता मला 40 खुर्च्या शोधणं सोपं आहे. तुमच्या लक्षात आलंय का प्रत्येक वाहनातली बसायची व्यवस्था वेगळी. म्हणजेच प्रत्येक वाहनातली खुर्ची वेगळी. जत्रेतल्या आकाशपाळण्यातली व मेरी गो राउंडमधली खुर्चीसुद्धा वेगवेगळीच असते किनई?’
‘पण एक सांगते, जगातल्या सगळ्या खुर्च्यांची यादी केली तर त्या यादीत एक खुर्ची सर्वश्रेष्ठ आहे असं मला वाटतं. ती नुसती उपयुक्त नाही तर त्या खुर्चीवर बसणा-या माणसाच्या जीवनाचा ती एक भागच आहे. त्या माणसाचं जीवन पुढे घेऊन जाते ती खुर्ची. आणि केवळ मजबुरीनेच बसतो माणूस त्या खुर्चीत! ओळख पाहू कुठली?’
मिहिर काही बोलणारच होता इतक्यात आजोबा म्हणाले, ‘आणखी एक गंमत आहे या खुर्चीची. बाकी सगळ्या खुर्च्या मिळाव्यात म्हणून भांडणं होत असतात. कारण त्या-त्या खुर्च्यांशी काही ना काही सत्ता जोडलेली असते. पण ही खुर्ची आपल्यालाच मिळावी असं मात्र कुणालाच वाटत नाही. का सांग बरं?’ तुम्हाला काय वाटतं, मिहिरने ती खुर्ची ओळखली असेल? तुम्ही ओळखू शकाल? मला कळवाल?
‘ही खुर्ची’ तुम्हाला कधीच न मिळो ही सदिच्छा!