आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Reality... समाजातील वास्तव मांडणारी पाच रूपयांची गोष्‍ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सकाळी महाराष्‍ट्र एक्स्प्रेसने जळगावला उतरलो. गाडीला खूप गर्दी होती. सकाळी 8.20 लाच गाडी जळगावला पोहोचली.ऑफिस दहाला उघडणार असल्याने मला भरपूर वेळ होता. त्यामुळे मी फलाटावर थोडा वेळ थांबायचे ठरवले व एका बाकावर बसलो. हळूहळू सर्व प्रवासी फलाटावरून बाहेर गेले व महाराष्‍ट्र जळगावहून निघाली. आता फलाट मात्र मोकळा झाला होता. मी बसलो होतो त्या जवळच वयस्कर स्त्री उभी होती. तिच्या सोबत दोन सुटकेस होत्या.
तेवढ्यात एक हमाल तेथे आला व त्याने त्या स्त्रीला विचारले, ‘आजी, हमाल पाहिजे का? कुठे जायचे आहे?’
आजी म्हणाल्या, ‘मला स्टेशनबाहेर रिक्षापर्यंत सामान न्यायचंय. त्याने त्या कामाचे 40 रुपये सांगितले.’ आजीबाई 15 देण्यास तयार होत्या. हो-ना करता हमाल 20पर्यंत आला; पण आजी मात्र 15वरच अडून बसल्या. तो हमाल माझ्याजवळ येऊन बसला व म्हणाला, ‘कितीही माणुसकी दाखवा. लोकांना कदर नाही.’ हे ऐकून आजी उत्तरल्या, ‘जास्त बोलू नको. पटत नसेल तर काम करू नको.’


मी हे सर्व पाहत होतो. थोडा वेळ झाला म्हणून मी स्टेशनच्या बाहेर जायला निघालो. जाताना सहज आजींकडे एक नजर टाकली. त्या माझ्याकडे बघत होत्या. मला चालताना असे वाटले की, मी आजींना मदत करायला हवी. माझ्याजवळ काहीच नव्हते. मी आजींचे सामान सहज घेऊन जाऊ शकतो. आजी वयस्कर आहेत. दोन जिने चढायचे, परत उतरायचे. त्यांना ते त्रासदायक होईल. मी सामान घेतलं तर त्यांना खूप मदत होईल, असा विचार आला. लगेच दुसरा विचार मनात आला, मी जर सामान घेतलं अन् आजींना मदत केली तर आजींचा प्रश्न सुटेल; पण त्या हमालाच्या पोटावर पाय येईल. त्याची मजुरी हिरावल्यासारखे होईल. म्हणजे रोजगार बुडेल. या विचारात पण तथ्य आहे. काय करावे. इकडे आड अन् तिकडे विहीर अशा कात्रीत मी सापडलो. थोडा वेळ गेल्यावर विचार केला की, त्यांच्यात वाद 15 आणि 20 रुपयांमध्ये आहे. आजी 15 रुपये देण्यास तयार आहेत, हमाल 20च्या खाली मजुरी घेण्यास तयार नाही. म्हणजे दोघातील अंतर पाच रुपयांचे आहे. मी जर हे पाच रुपये त्याला दिले तर ते अंतर मिटेल व दोघांचे प्रश्न सुटतील. म्हणजे आजींना सामान नेण्याचे कष्ट होणार नाहीत व हमालाला सेवेचे 20 रुपये मिळतील. मजुरी हिरावली जाणार नाही. रोजगार मिळेल. हे मनाला पटले व परत फिरलो. हमालापाशी आलो. त्याला सांगितले, हे घे पाच रुपये. आजी तुला 15 रुपये देतील. त्यांचे सामान स्टेशनबाहेर रिक्षापर्यंत सोडून दे. तो हसला. आजींकडे गेला व सामान घेऊन ते दोघे स्टेशनबाहेर आले. आजींना त्याने रिक्षापर्यंत सोडले. हे पाहून मला बरे वाटले. एक वेगळाच अनुभव आला.
पुढे निघालो. मनात या प्रसंगावरून विचार सुरू झाले. या प्रसंगात तीन व्यक्त्ती होत्या. एक असा मी, ज्याच्याकडे त्या प्रसंगासाठी पुरेसे शिल्लक पैसे आहेत.


दुसरा हमाल, जो सेवा पुरवणारा घटक आहे.
तिस-या आजीबाई, ज्यांचे उत्पन्न कमी आहे व त्यांची वस्तू/सेवा खरेदी करण्याची खरेदीशक्ती कमी आहे.
या प्रसंगात मी काय केले.
मी आजीबार्इंना सेवा परवडत नाही म्हणून पाच रुपये त्यांच्या वतीने हमालाला सेवेचा मोबदला दिला व स्वत: सेवा न देता ती सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे त्याला त्याचा रोजगार मिळाला. तो हिरावला गेला नाही व त्याला मान्य असणारा मोबदला मिळाला.
आणि हे सर्व केल्यावर मला समाधान मिळाले. कारण सर्व तिन्ही घटकांना त्यांच्या मनाप्रमाणे समाधान मिळाले.
माझे मन मला म्हणाले, पाच रुपयांची मदत हे अनुदान किंवा कर आहे. तुला ते देताना आनंद होतो. मग शासनाला कर देताना तेवढा आनंद होतो का? किंवा मनाला समाधान का मिळत नाही? हा प्रश्न मला सुरुवातीला फार बिनतोड वाटला. कारण तुलना अशी करता येईल -
1. इथे आजीबाई म्हणजे भारतातील गरीब, अल्पउत्पन्न, कनिष्ठ मध्यमवर्गीय घटक ज्याला शासन विविध मार्गांनी वस्तू/सेवा घेणे परवडावे म्हणून अनुदान देत असते. उदा. घरगुती गॅस, खते, इ.
2. कुली असा घटक की त्याला त्याच्या उपजीविकेसाठी किमान मेहनताना मिळाला पाहिजे तरच त्याच्या जीवनावश्यक गरजा भागतील. जसे शासकीय, खासगी, स्वयंरोजगार करणारा वर्ग
3. तिसरा घटक मी, ज्याने आजीच्या वतीने हमालाला पाच रुपये दिले. म्हणजे शासन की जनतेच्या वतीने अनुदान संबंधित सेवा/वस्तू पुरवठादाराला देते. आणि शासकीय कर्मचा-यांना महागाई निर्देशांकानुसार पगार वाढवून देत असते. जे शासन काम करते तेच काम मी इथे सूक्ष्म प्रमाणात केले आहे.
मग कर देताना मला समाधान का होत नाही? याचे उत्तर थोडा विचार केल्यावर मिळाले.
1. मी जी मदत केली ती स्वेच्छेने केली. सक्तीने नाही.
2. मला जेवढी वाटली तेवढीच मदत केली. किती मदत करावी हे माझ्यावर बंधन नव्हते.
3. जी मदत मी केली ती दोन्ही घटकांना पोहोचली व हे मी स्वत: पाहिले. या गोष्टी मी जेव्हा कर अदा करतो, त्याला लागू असतात का? उत्तर आले, नाही.


कारण-
1. कर मला सक्तीने अदा करावा लागतो.
2. कर किती द्यावा हे मी ठरवू शकत नाही. कर अगोदरच शासन नावाच्या व्यवस्थेने निश्चित केला आहे.
3. तसेच कराच्या अंतिम उपयोगाबद्दल मला खात्री नाही. कारण भ्रष्टाचार इतका मी अनुभवतो/ऐकतो आहे की त्यातील किती रक्कम उपयोगाला पडते याबद्दल मला शंका आहे. त्यामुळेच मी कदाचित कर द्यायला तितका समाधानी नसेल.
माझे मलाच उत्तर मिळाले. शासनाचा कर चुकवणारे चांगले काम करणा-या धार्मिक संस्था किंवा सामाजिक काम करणा-या संस्थांना भरपूर देणगी स्वेच्छेने का देतात याचे उत्तर हेच असावे.