आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगली अद्दल घडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्याने इन्स्पेक्टर मान्यांना थोडक्यात सर्व परिस्थिती कथन करून आपल्याला स्टँडवर सोडण्याची व बाजीरावला चांगली समज देण्याची विनंती केली. त्यांना वाकडेवाडीत येऊन 2-3 वर्षे झाली होती. खेड्यातले राजकारण त्यांनी जवळून पाहिले होते. येथे राहायचे तर कुणाशी वैर धरून चालत नाही. याचा त्यांनी पूर्ण अनुभव घेतला होता. त्यांनी विद्याला मदतीचे आश्वासन दिले, पण त्याच वेळी ‘शक्य असेल तर दुसरीकडे नोकरी धर,’ असा बहुमोल सल्लाही दिला. विद्या मनात काय ते समजली. हे काम आता आपल्याला आपल्याच हिमतीवर पार पाडावे लागेल हे तिने ओळखले. ते कसे पार पाडायचे हेही ठरवले.


दिवाळीच्या सुटीला जोडून विद्याने रजा घेतली. बाजीराव तिच्या हालचालींवर पूर्ण लक्ष ठेवून संधीची वाट बघत होता. या वेळी आपण तिला निसटू देणार नाही ही त्याला खात्री होती. विद्या कामावर आली. ती आता एकटी येत नसे. तिच्याबरोबर आणखी दोन मुली असत. उंचपु-या, गो-यापान, सुदृढ अशा त्या मुली होत्या. त्या तिघी बरोबर येत. बरोबर जात.


त्यातली एक मुलगी लायब्ररीयनचे काम करी, तर दुसरी कॉलेजच्या ऑफिसमध्ये टायपिस्ट म्हणून लागली. विद्याने प्राचार्यांना विनंती करून दोघींना कॉलेजमध्ये नोकरी मिळवून दिली. दोघीही विद्याच्या जिवलग मैत्रिणीच होत्या. बाजीराव सर्व बघत होत्या. विद्याने आपल्या सोबतीसाठी मैत्रिणी आणायला सुरुवात केली हे त्याने ओळखले. पण तो काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्याने अशी अनेक प्रकरणे हाताळली होती. तो या मुलींना काय भिणार? त्यानेही आपले दोन चेले तयार केले व आता या तिन्ही मुलींना धडा शिकवायचा बेत आखला.


नेहमीप्रमाणे सकाळच्या गाडीने विद्या, पूजा, आरती वाकडेवाडीला निघाल्या होत्या. गाडी नेहमीच्या वेगाने, ठरावीक ठिकाणी थांबत धावत होती. वाकडेवाडीत गाडी साधारण सव्वादहा वाजता पोहोचत असे. पावणेदहाच्या सुमारास वाकडेवाडीच्या अलीकडे 7-8 मैलांवर गाडी आली असता बाजीराव व त्याच्या दोन साथीदारांनी आपल्या मोटारसायकली एसटीला आडव्या घातल्या. ड्रायव्हरने कचकन ब्रेक दाबून गाडी थांबवली. तो इरसाल शिव्या देण्याच्या बेतात होता. पण समोरची व्यक्ती त्याच्या पूर्ण परिचयाची होती व तिची ‘योग्यता’ तो पूर्णपणे जाणून होता. खिडकीतून बाहेर तोंड काढून त्याने विचारले, ‘रामराम साहेब, अहो अशी गाडी कशाला थांबवली? लेट होतो ना आम्हाला?’


‘5 मिनिटं फक्त, आमचं काम झालं की तुमची गाडी सुटलीच समजा.’ एवढे बोलून बाजीराव गाडीचे दार उघडून आडदांडपणाने आत शिरला. त्याच्या हातात लांबलचक रामपुरी सुरा होता. आतल्या प्रवाशांवर आपली उद्दाम नजर फिरवीत बाजीरावाने धमकी दिली, ‘खबरदार, कुणी जागेवरून हलाल तर!’ सर्व पॅसेंजर भयचकित नजरेने हा काय प्रकार आहे म्हणून मनाशी आश्चर्य करीत होते. बाजीरावने विद्याजवळ जाऊन तिचे मनगट धरले व तिला खसकन उभी करत तो म्हणाला, ‘ए मास्तरणी, निमूट गाडीच्या खाली उतर आणि ए भवान्यांनो, तुम्ही पण उतरा. थोडीसुद्धा गडबड केली तर कोंबडीसारख्या माना मुरगळीन तुमच्या.’ विद्या पर्स सावरीत गुपचूप खाली उतरली. तिच्यापाठोपाठ बाजीराव सुरा परजीत उतरला. मागून तिच्या दोघी मैत्रिणी केविलवाणे चेहरे करीत बसमधून उतरल्या. तिघा गुंडांनी त्यांना ढकलत मोटरसायकलीपर्यंत आणले. बाजीराव दिमाखात ड्रायव्हरला म्हणाला, ‘जाऊ द्या गाडी, झालं आमचं काम.’ ड्रायव्हर आ वासून सर्व प्रकार बघत होता तो एकदम भानावर आला. शक्य तितक्या लवकर वाकडेवाडीत पोहोचून झाल्या प्रकाराची पोलिसात खबर दिली तर मुली कदाचित बचावतील म्हणून तो गाडी स्टार्ट करणार तितक्यात...


तिथे त्याने जे अभूतपूर्व दृश्य पाहिले त्यामुळे त्याला गाडी स्टार्ट करायचेदेखील भान उरले नाही. एक क्षणभर का होईना बाजीरावचे आपल्यावरील लक्ष उडालेले बघताच विद्याची एक सणसणीत लाथ बाजीरावच्या हातावर बसली. त्याबरोबर त्याच्या हातातील सुरा कुठे जाऊन पडला कळलेच नाही. पाठोपाठ आरती आणि पूजा विजेच्या वेगाने तिघांवर तुटून पडल्या. ज्युदो, कराटेची सुरेख प्रात्यक्षिके गाडीतील लोकांना बघायला मिळत होती.


बाजीराव आणि कंपनी तर अचानक झालेल्या हल्ल्याने इतकी गांगरून गेली की त्या मुलींना प्रतिकार करायचे त्राणच त्यांच्यात उरले नाही. मुली त्या तिघा गुंडांना बेदम पिटीत होत्या. एसटीमधले लोक आता ड्रायव्हर, कंडक्टरसहित खाली उतरले होते. त्या सहा जणांभोवती कोंडाळे करून टाळ्या वाजवीत होते, शिट्या फुंकीत होते. बायाबापड्या मुलींकडे बघून कौतुकाचे उद्गार काढीत म्हणत होत्या. ‘मारा, मारा मेल्याला चांगला, मुलीबाळींच्या अंगावर हात टाकतो काय?’


विद्या बाजीरावला पिटून काढीत होती. ती लोकांकडे पाहून विजेसारखी कडाडली, ‘अरे, आम्ही मुली असून याच्याशी दोन हात करतोय आणि तुम्ही नुसते गंमत बघता? आयाबहिणींच्या अब्रूची चाड आहे की नाही तुम्हाला? पकडा या नराधमांना. माझे वस्त्रहरण करणार होता काय? आता मीच करते त्याचे वस्त्रहरण. या पुढे येऊन मला मदत करा.’
लोकांचा जमाव विद्याच्या मदतीला धावला. विद्याने खरोखरच त्यांचे शर्ट, पँट उतरवून त्यांना अंतर्वस्त्रावर ठेवले व पर्समधून दो-या काढून त्यांचे हातपाय घट्ट बांधून त्यांना गाडीत चढवले. अर्ध्या तासात बस वाकडेवाडीच्या पोलिस स्टेशनमध्ये शिरली, तेव्हा ही वरात बघायला तुफान गर्दी जमली होती.


विद्याने आपल्यापुढे आरोपी आणलेले पाहून इन्स्पेक्टरना 5 मिनिटे काय करावे तेच समजेना.
‘इन्स्पेक्टरसाहेब, यांना ताब्यात घ्या. या तिघांनी आम्हाला एसटीतून उतरवून पळवण्याचा घाट घातला होता. आम्ही यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवीत आहोत आणि ती तुम्ही नोंदवून घेणार नसलात तर मी स्वत: डीएसपीसाहेबांना भेटेन. ते माझ्या बाबांचे मित्र आहेत. बोला काय करता?’


‘मॅडम, तुम्ही म्हणाल तसेच होईल.’ ‘छान. मला माहीत होतं, तुम्ही योग्य तेच कराल.’ विद्या समाधानाने उद्गारली. पोलिस स्टेशनमधून बाहेर पडण्यापूर्वी तिने खाली मान घालून बसलेल्या बाजीरावजवळ जाऊन त्याची हनुवटी वर उचलली. मग ती मिस्किलपणाने म्हणाली, ‘मि. बाजीराव, तुम्हाला माझ्या मैत्रिणींची ओळखकरून देते. ही पूजा आणि ही आरती. दोघी ज्युदो, कराटे चॅम्पियन. राज्यपातळीवरील सुवर्णपदक विजेत्या. शिवाय जिल्हा होमगार्ड संघटनेच्या सदस्या आणि मी त्यांची शिष्या बरं का! दिवाळीच्या सुटीत यांचीच शिकवणी लावली होती मी. आणि आता गुरुदक्षिणा म्हणून आजची ही भेट दिली. कसा काय वाटला तुम्हाला वस्त्रहरण नाटकाचा प्रयोग? इथून पुढे लक्षात ठेवा. महाभारतातील द्रौपदी काळाच्या पडद्याआड गेली. आता सगळ्या विद्युल्लता आहेत माझ्यासारख्या.’
बाजीरावचा चेहरा काळाठिक्कर पडला होता. त्याने मान खाली घातली ती पुन्हा वर उचललीच नाही.
(उत्तरार्ध)