आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीकडे माणूस म्हणून पाहायला शिकवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमची काय बाबा मजा आहे, सगळं आयुष्य राणीसारखं जगणार. का तर म्हणे दोन-दोन मुलांची आई आहेस ना. ना कसं होणार याची चिंता, ना हुंड्याची. वारंवार हे शब्द माझ्या कानावर यायचे आणि मी विचारमग्न व्हायचे. खूप हौस असूनही माझ्या स्वप्नातली राजकुमारी न होता मला दोन्ही मुलगेच झाले. मुलीची आई होण्याच्या सुंदर बहुमानाला मी मुकले. ते सुख माझ्या नशिबात नसेल कदाचित, अशी मनाची समजूत घातली. परंतु माझ्या मुलांना वाढवताना मला काहीच त्रास होणार नाही, याची खात्री आहे.


खरेतर आजकाल घडणा-या घटना पाहता, मुलींच्या आईच्या जबाबदारीपेक्षा मुलांच्या आईची जबाबदारी मोठी आहे, असं मला वाटतं. मुलगा म्हणून वाढवताना मला त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे. कुटुंबाचं पालनपोषण करण्याची क्षमता त्यांच्यात यायला हवी; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते माझ्या मुलांनी माणूस म्हणून घडणं. आजकालच्या मुलांचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ उपभोगाची वस्तू असा आहे.


स्त्रीला बुद्धी नसते, अशा प्रकारचे कसले तरी गैरसमज मुलं करून घेताना दिसतात. स्त्री कितीही शिकली, वारंवार तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले तरीही तिला आपल्या बरोबरीचे मानायला पुरुषसंस्कृती तयार नाही.


घरातल्या आई, बहिणी, काकी, मावशी या नात्यातल्या स्त्रियाच फक्त पवित्र आणि चांगल्या असतात का? समाजात वावरणा-या, शिक्षणासाठी बाहेर पडणा-या मुली चांगल्या चालीच्या नसतात का? आणि असे नसते तर मग समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट का आहे? बसने प्रवास करणा-या, अंगणात भातुकली खेळणा-या, मूकबधिर असणा-या, रात्रपाळीची ड्यूटी करून घरी परतणा-या, शेतावर मजुरी करणा-या मुली आणि महिलांवर अत्याचार का होतो? अत्याचार झालेल्या स्त्रीचा यामध्ये दोष नसतो. दोष असतो तो शारीरिक बळजबरी करून स्वत:ला हवं ते मिळवणा-याचा. हे सर्वस्वी विकृत मनोवृत्तीचं लक्षण आहे; परंतु समाज केवळ स्त्रीलाच दोष देतो. त्यामुळे अशी घाणेरडी मनोवृत्ती बदलायची असेल तर खरी सुसंस्कारांची गरज आहे ती मुलांना.


म्हणूनच समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर कठोर कायद्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते लहान वयापासूनच मुलांना घडवणं. स्त्रीकडे मादी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून पाहायला हवं हे घरातूनच आईने मुलांना शिकवायला पाहिजे. कारण भविष्यात तिच्या मुलाकडून काही अनर्थ घडला तर तो तिच्या मातृत्वाचा, तिच्या संस्कारांचा अपमान असेल. म्हणूनच माझ्या मुलांनी नेहमी स्त्रियांचा आदर करावा, असे संस्कार मला त्यांच्यावर करायचे आहेत. स्त्रियांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, आपण कसं राहावं-काय घालावं याचे सर्वस्वी अधिकार तिला आहेत. स्वत:च्या घरचा आर्थिक भार उचलण्यासाठी जेव्हा ती घराबाहेर पडते, तेव्हा स्वत:ला प्रसन्न वाटावं, कामावर सकारात्मक परिणाम व्हावा म्हणून ती व्यवस्थित राहते. नीटनेटकी राहते, मात्र त्यावरही अनेकदा पुरुषांकडून टीका केली जाते, असे होता कामा नये.


मुलांऐवजी मुलीला घडवताना त्यांच्या आईला जास्त त्रास होत नाही. कारण समाजात वावरताना त्यांच्यावर रूढी-परंपरा यांनीच एवढी बंधने लादलेली आहेत की, शब्दांचा वापरही न करावा लागता मुली बरंच काही शिकून जातात.
स्त्रियांनीच घरकाम करावं, हा पूर्वीपासून चालत आलेला आणखी एक अलिखित नियम. कोणी पुरुष जर कधी घरकाम करताना दिसला तर तो चर्चेचा विषय होतो. चूल आणि मूल सांभाळून स्त्रिया अंतराळात जाऊन आलेल्या चालतात, मात्र पुरुषाने घरकाम करणं हे कमीपणाचं मानलं जातं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्यानंतरही घरकामाचे कष्टही स्त्रियांनीच करावेत, अशा आपल्या समाजातल्या चाली-रीती; मुलींवरही लहानपणापासून अशाच प्रकारचे संस्कार केले जातात. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही माझ्या दोन्ही मुलांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला बदलायचा आहे.
या चांगल्या गोष्टीची सुरुवात मी घरापासूनच करणार आहे. त्यासाठी मी विशेष काही वेगळं करणार नाही. माझ्या मुलांना फक्त एवढंच सांगणार आहे की, तुमच्यासारखीच शिकली-सवरलेली जॉब करणारी मुलगी तुम्हाला बायको म्हणून हवी आहे ना, मग तिने पोळ्या केल्या तर तुम्हाला भाजी-कोशिंबीर करायला काय हरकत आहे?