आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीएलसी : एक वेगळे अनुभवविश्व

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी पुस्तक विश्वात अलीकडच्या काळात विविध विषयांची आणि वेगळ्या अनुभव विश्वातल्या पुस्तकांची भर पडू लागली आहे. भाषेच्या समृद्धीसाठी प्रक्रिया आवश्यकच आहे. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे वंदना अत्रे यांनी लिहिलेले व राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘टीएलसी : टीचिंग-लर्निग कम्युनिटी : तरुणाईसाठी उद्योजकतेचा नवा मंत्र’ हे पुस्तक. 
 
८०च्या दशकापासून महाराष्ट्राच्या उद्योगजगतात अनेक धाडसी आणि उत्साही तरुणांनी प्रवेश केला.  प्रारंभी प्रगती अाणि नंतर घाेडे अडले हा अनुभव बहुतेक सर्व उद्योगांनी घेतला.अशाच स्थितीत राजेंद्र बागवे, देवेंद्र बापट आणि अमोल चिटणीस या उद्यमशील मित्रांनी महिंद्र वाहन उद्योगाला लागणाऱ्या सुटे भाग पुरवणारी ही कंपनी सुरू केली. त्यांना मोलाचा सल्ला देणारे होते विनोद पारेख! उद्योगाशी निगडित सतत आधुनिक वाचन आणि त्याची आपल्या उद्योगात अंमलबजावणी यातून बागवे यांचा सल्ला घेणाऱ्या तरुण उद्योजक मंडळींची संख्या वाढू लागली आणि त्यातून आकाराला येऊ लागला एक शिकण्यास उत्सुक गट. या गटाची पहिली बैठक झाली १० फेब्रुवारी२००५ रोजी. आजच्या घडीला या कम्युनिटीत पाचशेच्या वर उद्योजकांचा समावेश आहे आणि याचा विस्तार महाराष्ट्रातील अनेक शहरात झाला आहे. ह्या शिकण्यास आणि शिकवण्यास उत्सुक गटाचे नाव आहे ‘टीचिंग-लर्निंग कम्युनिटी’.  जागतिकीकरणाच्या जमान्यात उद्योगातील सततच्या बदलत्या तंत्रज्ञानाला आणि स्पर्धेला तोंड देण्यासाठी आधुनिक शिक्षण, नवीन दिशा, प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी याची चर्चा करण्यासाठी या उद्योजकांना एका व्यासपीठाची गरज होती. ती या गटाने पुरवली आणि याचे नावच मुळी ठेवण्यात आले ‘टीचिंग लर्निग कम्युनिटी’. गेली १२ वर्षे म्हणजेच जवळपास एक तप नाशिकमध्ये राजेंद्र बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिकणे-शिकविण्याची अनोखी चळवळ चालू आहे आणि या एक तपाच्या प्रवासाचे खूप तपशीलवार वर्णन वंदना अत्रे यांनी अतिशय सहजपणे, सोप्या भाषेत या पुस्तकात केले आहे. आज जगात  व्यवस्थापनशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे सर्वांनाच माहीत आहे,  जाणवले आहे, पण त्याच्या निव्वळ पुस्तकी  अभ्यासक्रमाला मात्र ‘टीएलसी’न फाटा दिला आहे. 
 
टीएलसी-टीचिंग लर्निग कम्युनिटीची चार मूलभूत सूत्रे किंवा तत्त्व आहेत  १)प्रत्यक्ष कृतीतून जाणून घेऊन शिकूया, २) शिकता शिकवता शिकूया, ३) त्या शिक्षणाचे तरंग दूरपर्यंत पोहाेचवूया आणि या मार्गाने ४) उत्तमाच्या  पलीकडे जाऊया. या चार तत्त्वांवर हे शिक्षण आधारित आहे. या चळवळीत सामील होणाऱ्यांमध्ये एकत्वाची भावना निर्माण होण्यासाठी त्यांनी गणवेश निश्चित केला आहे. या चळवळीत सामील झालेल्या अनेकांचे अनुभव कथन या पुस्तकात वंदना अत्रे यांनी आवर्जून घातले आहे. त्याचे अनुभव वाचताना, वाट दाखविणारा समर्थ शिक्षक मेंटोर मिळाला तर माणसे कितीही अडचणीतून मार्ग काढू शकतात याचा प्रत्यय येतो.  असे अनेक दृष्टीने हे एक अनोखे पुस्तक आहेत. बागवे यांचा अभ्यास व धडपड आपण घेतलेले शिक्षण इतरांना देण्याची इच्छा आणि त्यासाठी असा प्रयोग उभा करण्याची खटपट आणि त्यातील गांभीर्य आणि शिस्त आणि त्याचे सातत्य टिकविण्यासाठी आवश्यक असलेले असंख्य हात, या सर्वांचे कौतुक आहे. ती चळवळ परिघावर राहून वंदना अत्रे पहात होत्या. ती बघत असताना त्यातील वेगळेपण ओळखून त्याची नोंद पुस्तकरूपाने ठेवणे गरजेचे व आवश्यक आहे हे 
त्यांच्यातील  सजग, हाडाच्या  पत्रकाराला जाणवले, त्यांच्या या दृष्टीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. चळवळ समजून घेणे, बागवे आणि इतर उद्योजकांच्या मुलाखती घेणे हे कष्टमय काम त्यांनी हसत हसत केले आणि त्याचे सोपे रूप आपल्यासमोर ठेवले.