Home | Magazine | Madhurima | teen-marriage-balika-wadhu

बालिका वधू?

मृण्मयी रानडे | Update - Jun 03, 2011, 07:19 PM IST

आपण आपल्या देशाला विकसित समजत असलो तरी आपल्याकडे आजही अनेक लाजिरवाण्या प्रथा रूढ आहेत. त्यातलीच एक म्हणजे बालविवाह. भारतातल्या जवळपास निम्म्या महिलांचा विवाह१८ व्या वाढदिवसापूर्वीच लावून दिला जातो. पाकिस्तानचे रेकॉर्डही याबाबतीत आपल्यापेक्षा चांगले आहे.

 • teen-marriage-balika-wadhu

  कव्हर स्टोरी

  अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'बालिका वधू' ही मालिका सध्या एका रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. बालवयात लग्न झाल्यानंतर घरी आलेली आणि जिवाभावाची सखी झालेली आनंदी ही पत्नी, दुसरी मुलगी आयुष्यात आल्यानंतर, जगतला अचानक गावंढळ आणि नकोशी वाटू लागली आहे. आमचं लहान वयात लग्न लावून तुम्ही मोठी चूक केली आहे आणि ती मी अजिबात खपवून घेणार नाही, मी माझ्या पसंतीच्या मुलीसोबतच राहणार आहे,' असं त्याने आईवडिलांना ठणकावून सांगितलं आहे. गावात राहणा:या आनंदीवर यामुळे आभाळ कोसळलं. आनंदीचं पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागून राहिली आहे. आनंदीचा प्रश्र मालिकेपुरताच असल्यामुळे सुटेल आणि शेवट गोडच होईल, पण भारतातल्या अशा लाखो आनंदी बालवयातच विवाह झाल्याने अत्यंत कष्टाचं आणि दुखाचं आयुष्य जगत आहेत, त्यांचा प्रश्र कसा आणि कधी सुटणार याची काळजी करणं महत्त्वाचं आहे. लग्न म्हणजे काय याचा जराही अंदाज नसणा-या अल्पवयीन मुलामुलींचे चार हात करून टाकायचे, ही प्रथा भारतात एकविसाव्या शतकातही चांगलीच पाय रोवून आहे हे आता आकडेवारीनिशी जगासमोर आलं आहे. जगातील महिला आणि मुली २०११ असा एक अहवाल संयुक्त राष्ट्रांनी नुकताच प्रसिद्ध केला असून त्यातील माहितीनुसार भारतातील २५ ते ४९ टक्के मुलींचा विवाह वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधी होतो, असे उघडकीस आले आहे. केवळ नऊ देश, तेही मुख्यत: आफ्रिका व आशिया खंडातील, या बाबतीत भारतापेक्षा पिछाडीवर आहेत. अगदी पाकिस्तान आणि श्रीलंकासुद्धा या फळीवर आपल्यापेक्षा चांगले रेकॉर्ड ठेवून आहेत. बालविवाहाचे सामाजिक परिणाम बालिका वधू मालिकेतून दिसतायत. परंतु त्याचे मुलींवर होणारे शारीरिक आणि मानसिक परिणाम मालिकेतून दाखवण्याइतके गोड गोड नाहीत.. बालवयात विवाह झालेल्या मुलींना कमी वयात शारीरिक संबंधांना आणि त्यातून पदरी पडणा-या मातृत्वाला सामोरे जावे लागते. स्वत:चं बालपण, अल्लडपणा विसरून पोटच्या पोरांची काळजी घ्यावी लागते. त्यांचे स्वत:चे बालपण कोमेजून जातेच, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही खीळ पडते..
  शिक्षणाअभावी आत्मविश्वास गमावल्याने, यातूनच आपण परिस्थिती बदलू शकतो, याहून चांगली जीवनशैली आपल्यालाही मिळू शकते यावर त्यांचा विश्वासच उरत नाही. बालविवाहानंतर काही वर्षे गेली, थोडे समजू लागले की इतक्या वर्षांच्या पत्नीला (वा पतीला) स्वीकारण्यातही थोडी काचकूच होऊ शकते. ही पत्नी वा पती आपल्यावर लादली आहे, आपल्याला इतरांसारखी आपला जोडीदार निवडायची संधीच मिळाली नाही, असं वाटायला लागतं.
  या दुष्परिणामांची जाणीव हळूहळू आपल्या समाजाला होऊ लागली असावी कारण नुकत्याच झालेल्या अक्षय्य तृतीयेला उत्तर भारत व राजस्थानात दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बालविवाह पार पडल्याचे वाचनात वा ऐकिवात आले नाही. या वेगाने बदल होऊ लागला तरी जिथे जवळपास निम्म्या महिलांचा विवाह १८ व्या वर्षापूर्वी होतो, तिथे ही परिस्थिती आदर्शवत होण्यासाठी अनेक दशके वाट पाहावी लागेल, यात शंका नाही.
  संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालात एक प्रकरण आहे पत्नीला मारणं कितपत स्वीकारार्ह आहे याबद्दलचे. यातही भारतीय पुरुष व महिलांचा वरचा नंबर आहे. या दोघांनाही अशी मारहाण योग्यच वाटते, कित्येकदा पुरुषांपेक्षा महिलांना जास्तच. भारतातील अनुक्रमे 30 आणि 26 टक्के महिला व पुरुषांना पत्नीला केलेली मारहाण चुकीची वाटत नाही. नव-याशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर मारहाण योग्यच आहे, असेही मानणा-या पुरुष व महिलांचा समावेश आहे. या अहवालात इतरही काही अस्वस्थ करणारी आकडेवारी आहे. २
  ११ च्या मध्यावर भारतातील महिलांची संख्या ५९५.५ दशलक्ष इतकी असेल. त्यातील निम्म्या महिला १५ ते ४९ या वयोगटातील आहेत. यातल्या सहा टक्के महिला या १५ ते १९ या वयोगटात असतानाच माता होतात. जन्माच्या वेळी कुशल व्यावसायिक
  म्हणजे दाई, परिचारिका वा डॉक्टर जवळपास असण्याचं भाग्य केवळ 47 टक्के महिलांच्या नशिबात असतं. म्हणजे निम्म्याहून अधिक महिलांची प्रसूती घरीच, कोणाही प्रशिक्षित दाईच्या अनुपस्थितीत होत असते. आपल्याकडे माता व बालमृत्युदर म्हणूनच अधिक आहे...
  या आकडेवारीच्या पाश्र्वभूमीवरच आपल्याला मुलींच्या घटत्या संख्येकडे पाहावे लागेल. भारतात १९६१ मध्ये दर एक हजार मुलांमागे ९७६ मुली होत्या, त्या आता २
  ११ च्या जनगणनेनुसार ९१४ झाल्या आहेत. राजस्थानात हे प्रमाण सर्वात कमी म्हणजे ९ पेक्षाही कमी आहे. मुलगाच हवा या अट्टहासापायी गर्भ मुलीचा आहे हे लक्षात आल्यावर पोटातच तिला मारून टाकण्याच्या क्रूर प्रथेमुळे हे प्रमाण काही देशांमध्ये १.२ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारतातील हे प्रमाण १.८ टक्के इतके स्थिर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आपण लवकर शहाणपण शिकणार नाही, यावरचे हे शिक्कामोर्तबच जणू.

  मुख्य उपसंपादक/ दिव्य मराठी

Trending